Join us  

लग्न करताना तरुण मुलामुलींच्या जोडीदाराकडून काय आहेत अपेक्षा? कंपॅटिबिलीटी टेस्ट पास की नापास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 1:06 PM

जोडीदारासोबत आयु्ष्य शेअर करणे आता आधीइतके सोपे नाही, तरुणांचा बदलता दृष्टीकोन समजून घ्यायला हवा...

ठळक मुद्देतरुण-तरुणी कंपेटॅबिलीटी म्हणजेच अनुरुपता आणि आवडीनिवडी यांच्या प्रामुख्याने विचार करत आहेतएका संकेस्थळाकडून नुकतेच याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आलेकंपेटॅबिलीटी नक्की पाहावी पण सर्व बाजूंनी त्याचा विचार आणि कृती व्हायला हवी.

लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा, या टप्प्यावर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत आपलं आयुष्य शेअर करणं ही संकल्पना असते. ही संकल्पना मागच्या काही काळात बदलत चालली आहे. आपला जोडीदार निवडताना तरुण वर्ग त्याबाबत बराच वेगळा विचार करताना दिसत आहे. एका लग्न जमविणाऱ्या एका संकेस्थळाकडून नुकतेच याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार लग्न करताना तरुण-तरुणी कंपॅटिबिलीटी म्हणजेच अनुरुपता आणि आवडीनिवडी यांच्या प्रामुख्याने विचार करत आहेत. पूर्वी लग्न करताना मुख्यत: कुटुंबाची पार्श्वभूमी, मुलाचे शिक्षण, नोकरी, उंची या गोष्टी पाहिल्या जात होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून हे समिकरण काहीसे बदलत असून तरुणांना जोडीदार आपल्याला अनुरुप आहे का हे पाहणे महत्त्वाचे वाटत आहे.

लव्ह मॅरेजमध्ये आपले आधीच त्या व्यक्तीशी विचार आणि आवडी-निवडी जुळलेल्या असतात आणि म्हणूनच आपण लग्नापर्यंत पोहोचतो. पण अॅरेंज मॅरेजमध्ये शहरी भागात मात्र अनुरुपता आणि आवडीनिवडी या गोष्टी पाहून लग्न करण्याला प्राधान्य दिले जाते. अशांची संख्या ८३ टक्के इतकी असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. यामध्ये पालकांचा विशेष सहभाग नसून जोडीदारच एकमेकांविषयीच्या अपेक्षा सांगत असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. यातील १० टक्के तरुणांना लग्न करताना जोडीदाराचे दिसणे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहणे महत्त्वाचे वाटते. तर जात, धर्म आणि कुंडली पाहणाऱ्यांची संख्या अवघी ५ टक्के इतकी असल्याचे यातून समोर आले आहे. तर केवळ ३ टक्के तरुण लग्न करताना समोरच्या व्यक्तीचे प्रोफेशन आणि पगार याकडे पाहतात.

(Image : Pixabay)

यामध्ये २२ ते २९ वयोगटातील पालकांसोबत राहणाऱ्या तरुणांबाबतची आकडेवारी देण्यात आली आहे. यातील सर्वाधिक तरुणांना लग्नानंतर आपल्या पालकांसोबतच राहायचे आहे. पण त्यांना पर्याय दिला तर ६३ टक्के तरुणांना आपल्या जोडीदारासोबत वेगळे राहायला आवडेल असे त्यांनी सांगितले. २७ टक्के जणांना पूर्वापार चालत आलेली मुलीने आपले घर सोडून मुलाकडे यायला पाहिजे ही संकल्पना मान्य नसल्याचे यामध्ये म्हणण्यात आले आहे. तर जवळपास १० टक्के जणांचे म्हणणे आहे की, मुलाने लग्नानंतर मुलीच्या घरी येऊन राहावे.

विचारांच्या पातळीवर बदल होतो पण कृतीची वेळ आली की...

या विषयाबाबत लग्न समुपदेशक लीना कुलकर्णी म्हणाल्या, लग्नसंस्था या विषयाबाबत बरीच चर्चा होताना दिसते. तरुण लग्न या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचे पाहायला मिळते.  मागच्या काही वर्षात ठरवून लग्न करणाऱ्या तरुणांमध्ये इतर गोष्टींबरोबरच एकमेकांसोबतची अनुरुपता आणि आवडीनिवडी याला ते जास्त प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते, ते योग्यही आहे. ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य जगायचे आहे तो व्यक्ती आपल्याला कंपॅटीबल असणे गरजेचे आहे ही समज तरुणांना आली आहे. मात्र हे बघतानाच करीयर सारखे असेल तर आम्ही एकमेकांशी विचार शेअर करु शकतो, दिसायला शोभनीय असेल तर माझ्या पार्ट्यांना मी तिला नेऊ शकतो यापलिकडेही विचार होणे गरजेचे आहे. विचारांच्या पातळीवर बदल होत असला तरी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की मात्र कच खाल्ली जाते. म्हणजेच घरच्या आणि कुटुंबाच्या पातळीवर सगळ्या गोष्टी आल्या की मात्र ही कंपॅटिबिलीटीची व्याख्या सोयीस्कररित्या बदलते. बाहेर आपल्याला हवी तशी असणारी जोडीदार मुलगी तरुणांना टिपिकल, घरातले सगळे करणारी, सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागणारी अशीच हवी असते. मुलीकडून असणाऱ्याया अपेक्षा आजही तशाच आहेत. कंपॅटिबिलीटी नक्की पाहावी पण सर्व बाजूंनी त्याचा विचार आणि कृती व्हायला हवी.

( Image : Google)

१०० टक्के चूक आणि बरोबर असे कोणीच नसते. परफेक्शनपेक्षा बेटरमेंटकडे जाणारा रस्ता हवा. लग्नाच्या आधी किंवा नंतर जोडीदारांमधील दोघांनीही आपल्या नात्याची चाचपणी करणे गरजेचे आहे. कालपेक्षा आपले नाते आज आणखी चांगले आहे का याचा विचार, उजळणी प्रत्येकाने आपल्या मनात करायला हवी. हे नाते आणखी छान होण्यासाठी काय करता येईल याचाही विचार करायला हवा. अनुरुपता ही एक लर्निंग प्रोसेस असून ती समजून त्यादृष्टीने विचार व्हायला हवा. तसेच सेक्सच्या बाबतीतली अनुरुपता आपल्याकडे तपासली जात नाही, त्याला आजही म्हणावे तितके महत्त्व नाही, त्यामुळे त्याबाबतही योग्य तो विचार तरुणांनी करायला हवा असे लीना कुलकर्णी सांगतात. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलग्न