दिवाळी पाडवा म्हणजे पतीपत्नीच्या नात्याचा रोमॅण्टिक सण. संसार करता करता वर्षभर होणाऱ्या कुरबुरी असो की कटकटी, पाडव्याला एकमेकांना पुन्हा सांगणं की एक वर्ष सोबतीनं सरलं आणि पुढच्या नव्या वर्षाची सुरुवात! नात्यातला हा रोमान्स टिकतो कसा? की रोजच्या संसारी कटकटीत आयुष्य रटाळ होऊन जातं? गृहित धरलं जातं एकमेकांना? लहानसहान गोष्टीतली काळजी करणंच विसरुन जातो आपण?
तुम्हाला आठवत असेल मागे एकदा विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मॅच सुरु असताना कोहली अनुष्काला काहीतरी विचारत होता.
‘जेवलीस का?’ - असं! विराट कोहलीने खाणाखुणा करत अनुष्का शर्माला जेवण झालं का विचारल्याचा व्हीडीओ तुफान व्हायरल झाला. भारतातच नव्हे तर भारतीय उपखंडात अगदी शेजारी बांगलादेश -पाकिस्तानातही हा व्हीडीओ गाजलं. अनेक महिलांनी त्यावर आपली मतं लिहीली. एका पाकिस्तानी ब्लॉगरची प्रतिक्रिया मात्र भारी बोलकी होती. ती म्हणते, ‘ एँ...? ये कोहली तो अजब शोहर है? ऐसा भी कोई करता है? हमारे शोहर तो हम मर जाए, तो पानी ना पुछे !’
- तिच्या या वरकरणी विनोदी मात्र वास्तव सांगणाऱ्या पोस्टवर पाकिस्तानातल्याच नाही तर भारतातल्याही अनेकींनीच नव्हे तर अनेकांनी लिहिलं की, बायकोला जेवलीस का असं विचारावं असं आपल्याकडे नवऱ्यांच्या डोक्यातही येत नाही. तिनं ताट हातात आयतं वाढून द्यायचं आणि त्यानं भाजीला नावं ठेवायची हीच घरघर की कहानी.
जेवलीस का खाणाखुणांचं आणि नवरा मोठ्या काळजीनं विचारतोय म्हणून खुश झालेल्या अनुष्काचं मोठ्ंठ हसू व्हायरल झालं तेव्हा अनेकांना ते क्यूट, रोमॅण्टिक वाटलंच. कारण घरोघर बायकांचा अनुभव असा नसतो. अनेकदा नवऱ्यांच्या हातातल्या हातात सगळं आयतं द्यावं लागतं. साधारणं या पुरुषी वृत्तीला ‘तौलिया लाव टाईप्स’ म्हणतात. म्हणजे आंघोळीच्या टॉवेलपासून पाण्याच्या ग्लासपर्यंत सगळं ‘दे’ म्हणत बायकोला ऑर्डर सोडणारे.
म्हणून तर कोहलीचं कामाचं टोकाचं प्रेशर पुढ्यात उभं असून बायकोला जेवलीस का विचारणं हे ‘बातमी’ होतं.
तारे जमींपर नावाच्या आमीर खानच्या सिनेमातला एक फार गाजलेला डायलॉग आहे, खयाल रखना और खयाल करना यात फरक आहे, अंतर आहे.
ते अंतर नवरा बायकोच्या नात्यातून निदान या दिवाळी पाडव्याला तरी कमी व्हावं!