Join us  

विधवा आईने केले लेकीचे कन्यादान आणि विधवा सासूनेच केले स्वागताचे औक्षण, एका लग्नाची प्रेमळ गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 4:59 PM

साधा आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह करत टाळला अनावश्यक खर्च, बदलाचं एक सकारात्मक पाऊल..

ठळक मुद्देआपल्यावर माया करणाऱ्या आईनेच सारे प्रेमाने करावे, असा या मुलांचा आग्रह.

राजेश शेगोकार

कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा हे सर्व अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी जोतिबा फुले यांनी सत्यशोधक विवाह साेहळ्याचा प्रारंभ केला. काळाच्या ओघात विवाहचा हा सत्यशाेधक संस्कार मागे पडला. आता साधे-कमी पैशात लग्न ही बातमी होऊ लागली. कोरोनाकाळात सक्तीने विवाह सोहळे लहान झाले तेवढेच, पण एकूण लग्न म्हणजे प्रचंड खर्च आणि मानपान हेच सारे येते. खेडोपाडीही कर्ज काढून अशी थाटात लग्नं केली जातात. अकाेल्यातील एका उच्चशिक्षित जाेडप्याने मात्र महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच सत्यशाेधक पद्धतीने विवाह केला.सामाजिक कार्यकर्ता पत्रकार असलेला विशाल राजे बाेरे अन् आयटी अभियंता असलेली स्नेहल सुभाष औतकार. दाेघेही सर्वसामान्य कुटुंबातील, दाेघांच्याही डाेक्यावरचे वडिलांचे छत्र अकाली हरवले. कुटुंबाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आपल्या हिमतीवर आयुष्य बेतायला सुरुवात केली. दोघांचाही विवाह घरच्यांच्या संमतीने ठरला. मात्र, त्याचवेळी विशालने स्पष्ट सांगितले की कुठलेही कर्मकांड न करता, साधेपणाने आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह करायला. कुटुंबानेही संमती देत, त्यांना पाठिंबा दिला.त्यानुसार मग सत्यशोधक पद्धतीने हा विवाह झाला.

विवाहाच्या मंडपात छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि संविधानाची प्रत एवढेच त्यांनी ठेवले. महापुरुषांच्या प्रतिमाचे वर-वधूच्या हस्ते पूजन झाले अन् या दाेघांनीही खणखणीत आवाजात सत्यशाेधक शपथ घेऊन एकमेकांप्रति आयुष्यभर बांधिलकी जपण्याचे वचन वऱ्हाडींच्या साक्षीने दिले.महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित क्रांतिरत्न ग्रंथाचे प्रकाशनही याच सोहळ्यात करण्यात आले. सत्यशोधक समाजाचे वाशिम जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी हा ग्रंथ नवविवाहित दाम्प्त्याला भेट दिला. सत्य शाेधक मंगलाष्टकांचा प्रारंभ आमदार अमाेल मिटकरी यांनी केला. त्यांनी मंगलाष्टकाची दाेन कडवी म्हटली, त्यानंतर सत्यशोधक विवाह विधिकर्ते केशवराज काळे महाराज यांनी पुढची कडवी म्हटली.विशेष म्हणजे, यावेळी स्नेहलचे कन्यादान तिच्या विधवा आईने केले. स्नेहल सासरी औक्षण करून स्वागतही विशालच्या आईने केले. विधवांना शुभकार्यात मागे राहावे लागते हे टाळून आपल्यावर माया करणाऱ्या आईनेच सारे प्रेमाने करावे, असा या मुलांचा आग्रह. आपल्यापरीने त्यांनी बदलाची नवी वाट चालायला सुरुवात केली..

टॅग्स :रिलेशनशिपमहाराष्ट्र