lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण..

नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण..

आज दिवाळी पाडवा. पती-पत्नीच्या नात्यात आर्थिक विश्वासही हवाच, कुटुंबासाठी ते फार महत्त्वाचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 07:00 AM2023-11-14T07:00:00+5:302023-11-14T07:00:07+5:30

आज दिवाळी पाडवा. पती-पत्नीच्या नात्यात आर्थिक विश्वासही हवाच, कुटुंबासाठी ते फार महत्त्वाचं!

Partner and financial secrecy, how to be more communicative about money | नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण..

नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण..

Highlightsआज दिवाळी पाडवा. पती-पत्नीच्या नात्याचा सण. चला तर आज पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पती-पत्नी एकमेकांच्या सहकार्याने आपल्या कुटुंबाचे उज्ज्वल आर्थिक भविष्य घडविण्यासाठी वचनबद्ध होऊया.

- प्राची देशमुख

मैत्रिणींनो, दिवाळी म्हटलं की सगळीकडे दिव्यांची रोषणाई, गोडाधोडाचे वास आणि नुसता उत्साह! लक्ष्मीपूजनाला देवीची आराधना, पाडव्याला पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान आणि भाऊबीजेला बहीण-भावाच्या नात्याचा एक वेगळा गोडवा अनुभवायला मिळतो. दिवाळीत स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपांचा गौरव होतो. २१व्या शतकात तर स्त्रीचे अजून एक उज्ज्वल रूप म्हणजे आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर स्त्री!
पूर्वी भारतीय घरांमध्ये कामाची विभागणी अशी होती की, पुरुष अर्थार्जनाची धुरा सांभाळत तर स्त्रिया कुटुंब व्यवस्थापनाची! त्यामुळे अगदी मागील काही दशकांपर्यंत स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेरच पडल्या नाहीत. अर्थार्जन बव्हंशी पुरुष करत असल्यामुळे आर्थिक बाबींचे व्यवस्थापनही पुरुषच करत. अलीकडच्या काळात स्त्रिया शिकू लागल्या आणि कुटुंबासाठी अर्थार्जनाची जबाबदारी पुरुषांच्या बरोबरीने उचलू लागल्या. परंतु, आर्थिक व्यवस्थापनामध्ये मात्र आजही स्त्रियांचा सहभाग नगण्य आहे.
पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था असल्यामुळे घरातील आर्थिक बाबीविषयी स्त्रिया अनभिज्ञ असल्या, तरी कुटुंबातील इतर लोक संकट काळात खंबीर आधार देत. परंतु, आता ‘हम दो हमारे दो’ किंवा ‘हमारा एक’च्या काळात आर्थिक बाबींविषयीचे सर्वच ज्ञान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक झाले आहे.

(Image :google)

आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी काय करायला हवे?

१. कुटुंब व्यवस्थापन आणि अर्थार्जनाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या भारतीय स्त्रियांनी आता कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारीही तितक्याच सहजतेने उचलायला हवी. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती नवरा - बायकोमध्ये आर्थिक बाबींवर सामंजस्य असण्याची!
२. भारतात बव्हंशी घरात रोजचे बजेटिंग, दैनंदिन खर्च ह्यांची जबाबदारी स्त्रियाच सांभाळताना दिसतात. परंतु, घरातील मोठे आर्थिक निर्णय (जसे की होम लोन घेणे, ते मॅनेज करणे, इतर छोटे-मोठे लोन्स घेणे आणि मॅनेज करणे, इन्वेस्ट्मेन्ट्स प्लानिंग इत्यादी) घेताना मात्र स्त्रियांचा सहभाग नगण्य आहे.
३. हे चित्र बदलण्यासाठी आर्थिक बाबतीत पती-पत्नीच्या नात्यात मोकळा संवाद महत्त्वाचा आहे. आर्थिक उद्दिष्टे, प्राधान्यक्रम आणि चिंतांवर मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
४. एकमेकांशी संवाद साधून अंदाजपत्रक बनवणे आणि आर्थिक नियोजनाचे प्लानिंग करणे यामुळे कुटुंबातील व्यक्तींचे सामायिक खर्च आणि वैयक्तिक खर्च यांचा योग्य अंदाज बांधता येतो. पती व पत्नी दोघांनीही मोठ्या आर्थिक निर्णयांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यात सहभाग घेतला पाहिजे.
५. कुटुंबाची सामायिक आर्थिक उद्दीष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने पतीपत्नींमधील आर्थिक बाबींवरचा संवाद निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. आर्थिक बाबींवरची पारदर्शकता कुटुंबात विश्वासाचे वातावरण निर्माण करते आणि यामुळे एकता आणि सामायिक जबाबदारीची भावना वाढीस लागते.
६. आर्थिक आव्हाने किंवा अपयशाच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने एकजुटीने उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे. दोषारोप करण्याऐवजी एक टीम म्हणून आर्थिक अडचणींचा सामना केल्यास पारदर्शकता आणि मजबूत संबंध निर्माण होऊ शकतात.
७. शेवटी आर्थिक शिक्षण, संसाधनांची उपलब्धता आणि कौशल्य विकासाच्या संधींद्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण केल्यास त्यांचा आर्थिक आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य आणखी वाढू शकते.
आज पाडवा
आज दिवाळी पाडवा. पती-पत्नीच्या नात्याचा सण. चला तर आज पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पती-पत्नी एकमेकांच्या सहकार्याने आपल्या कुटुंबाचे उज्ज्वल आर्थिक भविष्य घडविण्यासाठी वचनबद्ध होऊया. दोघांचे आर्थिक व्यवहार, जबाबदाऱ्या, कर्ज हे एकमेकांना माहिती हवे. परस्परांची नॉमिनी म्हणून नोंद असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, त्याविषयीही सतर्क राहू. समृद्ध होऊ!

(लेखिका फायनान्शिअल लिटरसी प्रशिक्षक आहेत.)
prachido@gmail.com

Web Title: Partner and financial secrecy, how to be more communicative about money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.