गौरी कुलकर्णी
सारा. मुंबईतल्या गोंगाटात अडकलेली एक कॉर्पोरेट मुलगी. आयुष्याच्या सततच्या धावपळीपासून थोडा “श्वास घेण्यासाठी” ती ऋषिकेशला आली होती. आणि केशव, वर्षभर फिरायचं ठरवलेला एक भटक्या. ज्याचं घर म्हणजे रस्ता आणि साथीदार म्हणजे निसर्ग.
तिथेच ते दोघे भेटले.. पण ती भेट जगणं बदलून टाकणारी होती. सगळं बदललं.. आणि..
त्या रात्री हॉस्टेलच्या कॅम्प फायरजवळ सगळे जमले होते. हातात गिटार. मागे वाहणारा गंगेचा आवाज, मंद प्रकाशात साराच्या हसऱ्या गप्पा.
केशवने शेरशाह मधील एक गाण वाजवलं. “राता लंबिया लंबिया रे..”
साराने नकळत हसत त्याच्याकडे पाहिलं. आणि त्या क्षणापासून काहीतरी बदललं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती एकांतात बसली होती, तेव्हा केशवने तिच्यासमोर चहा ठेवला.
“तुला गप्प राहायला आवडतं का?” त्याचा प्रश्न साधा पण अर्थपूर्ण होता.
ती काही बोलली नाही. नुसती गालातल्या गालात हसली आणि निघून गेली.
तिच्या या वागण्याचा काय अर्थ लावावा हे केशवला समजलेच नाही.
त्यानंतर रोज सकाळी हॉस्टेलच्या समोरच्या अंगणात सारा बसणार आणि केशव तिच्यासाठी चहा आणून ठेवणार असं आपोआप घडत राहिलं. हळूहळू बोलणंही सुरु झालं. राजकारण, अध्यात्म, ते फिलॉलॉफी अशा अनेक विषयांवर ते गप्पा मारायचे.
केशव जास्त बोलायचा. ती ऐकत राहायची. तो तिला अनेक गोष्टींबद्दल सांगायचा.
त्याचं भरभरुन बोलणंही तिला आवडू लागलं आणि हळूहळू तो ही आवडू लागला.
सात दिवसांचा हा सिलसिला.
कॅम्प संपला. सुट्टी संपली. सात दिवस कसे गेले समजलेच नाही.
आठवडाभरानंतर सारा घरी जायला लागली.
ती गंगेच्या काठावर उभी राहिली होती, आणि केशव तिच्याकडे पाहत होता. काही न बोलता.
“मी परत येईन..” सारा हसत म्हणाली.
“तू जा मी तुझ्यासाठी अशीच वाट पाहीन..”
-केशव एवढंच बोलला.
भेट संपली. ना कुठली वचनं, ना कसले प्रॉमिस.
पण एक नातं निर्माण झालं..
कदाचित मैत्रीचं.. कदाचित प्रेमाचंही..
पुढे?
पुढे काय हे त्या दोघांनाही ठरवता आलं नाही..
