नुकत्याच झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि अख्ख्या देशात आनंदाची लाट पसरली...सगळ्या भारतीयांसाठी, तो सामना खेळणाऱ्या खेळाडूंसाठी तर हा विजय महत्त्वाचा होताच, पण विराट कोहलीसाठी मात्र अतिशय खास होता. कारण मागच्या कितीतरी सामन्यांपासून विराटला त्याचा फॉर्म सापडत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर भरपूर तोंडसूखही घेतले जात होते. पण अखेर त्याचा स्वत:शीच सुरू असणारा झगडा संपला आणि त्याला त्याचा सूर गवसला. तो सूर त्याने असा काही पक्का पकडला की शतकी खेळी करूनच तो थांबला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याचे ५१ वे शतक होताच त्याने त्याच्या गळ्यातले लॉकेट वर काढले आणि त्याला जोडलेल्या त्या अंगठीचे विजयी चुंबन घेतले. त्याच्या या कृतीने अवघ्या जगाचेच लक्ष वेधून घेतले. अशी काय खास गोष्ट आहे बरं त्या लॉकेटमागची?
विराटसाठी ते लॉकेट अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्याच्या आयुष्यातल्या एका खास व्यक्तीने दिलेली खास गोष्ट त्या लाॅकेटमध्ये आहे. ती खास व्यक्ती म्हणजेच अर्थातच त्याची पत्नी अनुष्का शर्मा. तिने त्यांच्या लग्नापुर्वी विराटला एक अंगठी दिली होती.
ती अंगठी एका साखळीमध्ये घालून विराटने आजवर ती अगदी शब्दश: आपल्या हृदयाशी कवटाळून ठेवली आहे. सगळ्यात आधी त्याचं हे 'लॉकेट लव्ह' सराव सामन्यांच्या काळात काही जणांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त खेळी करत शतक झळकावले होते. त्यावेळी पहिल्यांदा त्याने गळ्यात घातलेली ती लॉकेटमधली अंगठी वर काढून समोर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्काकडे पाहात तिचे चुंबन घेतले. त्यावेळी त्याच्या अंगठीची खास गोष्ट सगळ्यांसमोर आली.
आजही विराटने तेच केलं. त्याची ही कृती खूपच अर्थपूर्ण आहे. पतीच्या वाईट काळात पत्नी त्याच्यामागे अनेकदा खंबीरपणे उभी असतेच.. पण किती जणांना त्याची जाणीव असते? त्याच्या अडचणीच्या काळात तिलाही खूप सोसावं लागतं, कित्येक गोष्टींना तोंड द्यावं लागतं, अनेक बाबतीत तडजोडी करून परिस्थिती सांभाळून घ्यावी लागते.
व्हिटॅमिन B12 कमी आहे, खूप अशक्तपणा आलाय? ७ शाकाहारी पदार्थ खा- थकवा कमी, वाढेल ताकद
पण तिच्या या गोष्टींची कोणी दखलही घेत नाही. पण विराट मात्र तसा नवरा नाही. तिने त्याला दिलेली भक्कम साथ, तिचा आधार, तिने वेळोवेळी दिलेली हिंमत, कठीण काळात दिलेला पाठिंबा याची त्याला जाण आहे; हेच त्याने त्या अंगठीचं चुंबन घेऊन दाखवून दिलं आहे. पत्नी म्हणून तिला चारचौघात बरोबरीचा दर्जा द्यायलाही अनेक जण टाळतात, तिथे विराट त्याच्या विजयाचं श्रेय तिला दिलखुलासपणे देऊन टाकतो, म्हणूनच तर तो 'man in love' ठरतो. नाही का?