Join us

लग्न करताना तरुण मुलींना नेमकं कशाचं टेंशन येतं? तिशी येते तरी लग्न ठरत नाही कारण..

By manali.bagul | Updated: July 8, 2023 11:49 IST

Issues of Unmarried Equality : लग्नानंतर बदललेल्या आयुष्याशी कसं जुळवून घेणार याचं टेंशन मुलींना असतंच, पण तेवढ्यापुरताच आता ही धास्ती मर्यादित नाही. लग्न जमण्यापासूनच टेंशन येतं त्याची अनेक कारणं आहेत.

मनाली बागुल

काय मग आता कधी देणार लाडू? असा प्रश्न विशीतल्या मुलींना विचारणारे नातेवाईक-शेजारीपाजारी-ऑफिसमधले पण विचारतातच. आईबाबांनाही वाटतं चांगलं स्थळ आलं-जमलं तर उडवून टाकावा बार. अनेक सल्लेही लोक देतात की वय वाढल्यावर चांगलं स्थळ मिळणार नाही. लग्न वेळेत केलं नाहीस तर मूलं व्हायलाही त्रास होईल. चेहऱ्यावरच तेज कमी होत जातं. लग्न कर म्हणून घाई.  जसजसं वय वाढत जातं तसतसं ही घाई आणि लग्नासंदर्भातले शंभर प्रश्न डोक्यात काहूर करतात. त्यातही तरुण मुलींना आजही लग्नाचं टेंशन येतंच, डोक्यात किती प्रश्न. काय होणार आपलं लग्नानंतर. जोडीदार, नाती-करिअर-नोकरी-सासरचे-जबाबदारी अनेक प्रश्न असतात.  म्हणून तर शोधून पाहिलं की लग्न करायचं म्हंटल्यावर तरुण मुलींना नेमकं कसलं टेंशन येतं?

टेंशन तर येतंच कारण..

लग्न हा एक मोठा निर्णय असतो. लग्न करायचं म्हणजे मुलीच नाही तर मुलांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सिंगल राहायला अनेकांची हरकत नसते, पण नातेवाईक आणि घरातील मंडळी आपल्या निर्णयाचं स्वागत करतील ही अपेक्षा करणंही शक्य नाही.  नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणींना जणू एकच चिंता की अमका/अमकी सिंगल आहे तर त्यांचं लग्न कधी जमणार? काही तरूण-तरूणी कॉलेज लाईफपासून किंवा अगदी शाळेपासून रिलेशनशिपमध्ये असतात तर ते आपण मुलाशी लग्न करणार हे त्याचं ठरलेलं असतं.

काहींची नाती यशस्वी होत नाही, ब्रेकअप-त्यातून आलेलं नैराश्य या सगळ्यातून जावं लागतं.  मात्र जे सिंगल असतात त्यांचं काय? एकीकडे वय मात्र वाढत जातं. अशावेळी लग्नासाठी मनासारखा मुलगा मिळणं हे महत्वाचं असतं. असा मुलगा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुलींचं आणि मुलांचं लग्नाला नकार देणं सुरूच असतं.  

अपेक्षांचा डोंगर, त्याचं काय करायचं?

लोक म्हणतात हल्ली मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. पण ते कितपत खरं म्हणायचं? कारण पूर्वी मुली पालक म्हणत त्याला हो म्हणत पण आता त्या आपल्या अपेक्षा बोलून दाखवतात. हा बदल चांगलाच म्हणायला हवा. पूर्वी मुलींना चूल आणि मूल अशा जबाबदाऱ्या होत्या. समाजात मान, आणि आर्थिक स्वातंत्र्य बरोबर नव्हते. आज तसे नाही. मुली स्वतंत्र आहेत आणि ते स्वातंत्र्य जपण्याचा विचार त्या करतात.  आपला जोडीदार कसा असावा या त्यांच्या अपेक्षाही त्यांना स्पष्ट आहे. मुलांनाही चांगलं कमावणारी, संसाराला हातभार लावणारीच मुलगी हवी असते. लग्नानंतर मुलींनी नोकरी सोडल्यास बऱ्याच नवऱ्यांची निराशा होते.  त्यामुळे आर्थिक बाजू दोन्ही बाजूनं चांगली असणं ही नव्या पिढीत दोघांची अपेक्षा दिसते. आणि हे सारं कसं जमेल, आणि जमलंच नाही तर याचं टेंशन मुलींना येतं.

आधी स्वत:ला ओळखा : - सांगतात मॅरेज काउन्सिलर लीना कुलकर्णी

सध्या मुलामुलींचेही उशिरा लग्न करण्याचं प्रमाण वाढलंय. काहींना जबाबदारी आणि कौटुंबिक बंधनं ऐन तारुण्यात नको वाटतात. समाज कुटुंब केंद्रीत होता आता व्यक्ती क्रेंद्रीत होत चालला आहे. रिलेशनशिपमध्ये असलेली काही मुलं तर लग्न नको म्हणतात. आपण आपल्या घरी आणि जोडीदार त्याच्या घरी असं नातंही सोयीचं वाटतं. लग्नबंधन नको असंही अनेकांना वाटतं.एकावेळी अनेकांशी संबंध ठेवणं खूपच कॉमन झालंय. लग्नसंस्थेला निष्ठा नावाचे मूल्य होतं. आता ते शून्य झाले आहे.

लहानपणापासून नोकरी, शिक्षणाबाबत छोट्या छोट्या गोष्टींचा विचार पालक आणि मुलं करतात. पण तरुण होताना लग्नाबद्दल आणि लग्नानंतरचा काळ याबाबत विचार केला जात नाही. म्हणूनच सुरूवातीपासूनच सेल्फ अवेअरनेस असायला हवा. जे लोक स्वत:लाच व्यवस्थित ओळखू शकलेले नाहीत ते पार्टनरची निवड कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आधी स्वत:ला ओळखा. त्यातून अपेक्षांचे डोंगर प्रॅक्टिकल टप्प्यात येऊ शकतात.

टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यरिलेशनशिपरिलेशनशिप