शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक, स्त्रीवादी कार्यकर्त्या)
Downton Abby नामक ब्रिटिश मालिका आहे.१९१२/१३ ते १९२० या कालावधीतील एक उमराव आणि त्याचे आयुष्य. त्याचं घर आणि त्याची देखरेख करायला एक हाउसकिपर असते आणि बाकी अन्य मदतनीसही.(value of homemaker) म्हणजे चित्र असं की भलेभले राजा-महाराजा ते आताचे अतिश्रीमंत लोक पूर्णवेळ घरी नोकरचाकर ठेवत असत.(unpaid work of housewives)आता काळ बदलला.नुकतीच एक बातमी वाचली. आयटीत काम करणाऱ्या एका जोडप्याने त्यांचे घर सांभाळायला महिना तब्बल एक लाख रुपये पगार देऊन एक व्यक्ती होम मॅनेजर म्हणून तैनात केली. समाजमाध्यमावर गदारोळ झाला, बरीच चर्चाही घडली. वास्तविक मदतनीस म्हणून व्यक्ती तैनात करणे नवे नाही.अतिशय श्रीमंत घरांत म्हणजे अंबानी/अडाणी इत्यादी किंवा मोठे खेळाडू, अभिनेते /अभिनेत्री यांचे घर सांभाळायला असा स्टाफ असतो. नाय तर तुम्हाला काय वाटते की कॅटरिना/करिना आदल्या दिवशी चवळी भिजत घालतात, उद्याच्या डब्याची तयारी रात्री करून ठेवतात की काय? गमतीचा भाग सोडा, पण लक्षात घ्या की मुद्दा असा आहे की गृह व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे!व्यावहारिक जगात त्या कामाचा किती मोबदला मिळू शकतो.मात्र, इतके दिवस पिढ्यान्पिढ्या ही कामं घरातील बायका बिनबोभाट करतच होत्या. अजूनही गृहिणी असलेल्या बाईला ऐकावेच लागते की, तू काय करते घरात दिवसभर? काय सांगतेस, काम फार असतं. माझी आई, आजी, पणजी पण घरीच सगळं करायच्या.. तू काय जगावेगळे करतेस? आयता चहा ढोसत असे शेरे मारत पचकणाऱ्या माणसांच्या तोंडावर खरं तर ही चपराक आहे!
घरातील काम किती महाप्रचंड आहे हे घरात ते काम करणारी बाई नसली की जाणवते आणि ती नोकरी करणारी असेल तर अधिकच. स्वयंपाक हा विषय आपण भारतीय इतका महत्त्वाचा करतो की, असे वाटते फक्त जेवणासाठीच आपण जन्म घेतलाय.तिन्ही त्रिकाल बायका फक्त स्वयंपाक घरात आणि बाकी कामात, हात मोकळा नाहीच.
त्यातही पुन्हा भारतीय घरात मुले, त्यांचे शिक्षण, अभ्यास, डबे, प्रोजेक्ट हे फक्त आईची जबाबदारी असते. म्हणजे समजले जाते. शब्दशः बाई अष्टभुजा होऊन सर्व सांभाळत असते, चपाती लाटतालाटता पाढे म्हणवून घेते, भांडी घासत उत्तरे पाठ करवते, कपडे धुताधुता साफसफाई करते, रात्री ओटा आवरून घेताना दुसऱ्या दिवसाची तयारी करते. त्यात मुलांच्या शाळेतील फॅन्सी ड्रेस तयारी ते नवऱ्याच्या डब्यात काय द्यायचे ते सासू-सासऱ्यांची औषधी संपलीय इथपासून असते. पुन्हा सणवार, पै पाहुणे, नातेवाईक असतातच. तरी यात अनेक कामे गृहीत धरली नाहीत.
आता कल्पना करा..
घरातली बाई करते ती सर्व कामं करायला जर पगारी व्यक्ती ठेवली तर? कल्पना करा किती पगार द्यावा लागेल?त्याचीच झलक तर व्हायरल बातमीत दिसतेच. लाख रुपये मोजून होम मॅनेजर नेमायला लागेल. तू काय करते घरात दिवसभर? असे तोंड वर करून बाईला विचारणाऱ्या माणसाच्या, समाजाच्या श्रीमुखात ही सणसणीत चपराक आहे आणि हो फक्त शहरी, निमशहरी नाही तर अगदी ग्रामीण स्त्रियांच्या बाबतीतही हे खरंच आहे.नवरा उठून शेतात-बाजारात जातो. बाई घरकाम-स्वयंपाक आटोपून शेतातल्या कामाला जाते. भाजी विकायला जाते किंवा एखादी लहानशी टपरी चालवते.दिसवभराचं काम संपवून घरी जाते संध्याकाळी घरी तेच पुन्हा थेट भाकरी भाजायला! घरातील कामे वाटच पाहत असतात.आणि बाई हा भार शतकानुशतके बीन तक्रार पेलतेय.
आपली जबाबदारी आहे, आपलंच घर आहे म्हणून ती राबत असते. तिची फार अपेक्षा नसते, फक्त थोडी सहानुभूती आणि आदर हवा असतो. तेही मिळणं अशक्य आहे असं दिसलं की मग मात्र ती प्रश्न करते तेव्हा पितृसत्ताक समाज खवळून उठतो. तिलाच धारेवर धरतो. आपली आजी, आई, मावशी, बहीण असे जगत आहेत हे बघून काही मुली लग्न नाकारतात. तेव्हा दोषही त्यांनाच दिला जातो. मुलींना जास्त शिकवू नये इथपर्यंत बोलले जाते. त्यांना घरकामालाच बांधू इच्छिणाऱ्या आणि तू दिवसभर घरात करतेसच काय, असं विचारणाऱ्या समाजव्यवस्थेला मिळालेले सडेतोड उत्तर म्हणजे ही लाख रुपये पगाराची होम मॅनेजर बातमी. ही सुरुवात आहे. बदलांची आणि कामाची कदर असण्याचीही..
Web Summary : Housewives' work is invaluable, yet unpaid, unlike home managers earning lakhs. Society undervalues their relentless efforts in managing household chores, childcare, and family needs, a stark contrast to paid domestic help.
Web Summary : गृहिणियों का काम अनमोल है, फिर भी अवैतनिक, जबकि होम मैनेजर लाखों कमाते हैं। समाज घरेलू कामकाज, बच्चों की देखभाल और परिवार की जरूरतों के प्रबंधन में उनके अथक प्रयासों को कम आंकता है, जो कि घरेलू सहायकों के वेतन के बिल्कुल विपरीत है।