- सायली कुलकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ)
मुलं मोठी होतात, प्रेमात पडतात. त्यांना कुणीतरी आवडू लागतं आणि आईबाबांना भलतंच टेन्शन येतं. अनेकदा ते वयानुरूप मुलांना वाटणारं आकर्षण स्वीकारतात, त्यांच्याशी बोलतात; पण तरुण मुलांची ही नातीही ‘कॉम्प्लिकेटेड’ झाली की पालकांना कळत नाही की नेमकं म्हणजे चाललंय काय? कुणी आवडतं का, तर हो? प्रेमात आहे का? तर नाही. पुढे लग्नाचा विचार, इतक्यात नाही! कमिटेड आहे का, तर तसंही नाही ! मग नेमकं काय हा प्रश्न पालकांना छळतो तेव्हा सिच्युएशनशिप, बेंचिंग असे (Fear of commitment in relationships) काही शब्द ऐकावे लागतात आणि त्यानंही घरातला ताण वाढतो.
ऋचा (नाव बदललेलं आहे.) १८ वर्षांची हुशार, चुणचुणीत, इमोशनल मुलगी. ऋचा माझ्या क्लिनिकमध्ये आली तेव्हा पुरती गोंधळलेली वाटली. थोडी रिलॅक्स झाल्यावर ती म्हणाली, ‘मॅडम, आम्ही (Commitment issues in young couples) फिरायला जातो. एकमेकांना आवडतो. कधी मिठी मारतो, बरेचदा किसिंगही झालं. पण तो म्हणतो, तू माझी फ्रेंड आहे. गेली दोन वर्ष आमचं हे असंच चाललंय. तो म्हणतो आपण फक्त सिच्युएशनशिपमध्ये आहोत. मला काहीच समजत नाही, त्याचं माझ्यावरच प्रेम आहे की नाही?’
ही गोष्ट फक्त ऋचाची नाही. सध्या ही अनेक तरुण-तरुणींची आहे. ‘सिच्युएशनशिप’ आणि ‘बेंचिंग’ ही नात्यांची नवीन नावं सर्रास आढळतात. सुरुवातीला ही नाती फारशी धोकादायक वाटत नाहीत. कोणतंही दडपण नाही, नात्याला नाव द्यायचं बंधन नाही आणि दोघंही वेळ घालवतात. पण हळूहळू असुरक्षितता आणि गोंधळ वाढतो.
सिच्युएशनशिप म्हणजे काय?
दोघांमध्ये जवळीक, कधी शारीरिक जवळीकही असते. अनेक प्रेमासारखे क्षणही असतात. पण नात्याचं नाव, बांधिलकी किंवा दिशा नसते. बरेचदा एकजण भावनिक गुंतलेला असतो, दुसऱ्याला स्पष्टता नसते किंवा ती नकोच असते.
बेंचिंग म्हणजे काय?
कुणाला तरी ‘बॅकअप’ म्हणून ठेवणं. म्हणजे म्हटलं तर प्रेमासारखं नातं आहे, म्हटलं तर नाही. पर्याय म्हणून ठेवणं; पण कमिटमेंट न करणं. त्याचवेळी अन्य पर्यायही तपासून पाहणं.
मुलंमुली असं का वागतात?
१. अनेकांना कमिटमेंटची भीती वाटते. नातं हवं असतं; पण जबाबदारी नको. त्यामुळे नात्याला नाव दिलं जात नाही.
२. शारीरिक जवळीकही हवी असते; पण त्यासाठीची जबाबदारी, भावनिक गुंतवणूकही नको असते.
शारीरिक जवळीक हवी असते; पण तिच्यामागची भावना आणि जबाबदारी नको वाटते.
३. ‘No labels please’, ‘We’re just chilling’ हे संवाद म्हणजे कामापुरता दृष्टिकोनही असतो आणि सोयही. न अडकण्याची.
४. अनेकांचा निर्णयच होत नाही म्हणून नकार देण्याचीही भीती वाटते. पिअर प्रेशरमध्ये मिरवायचं म्हणूनही अशी नाती सोयीची वाटतात.
नेमका घोळ कुठं होतो?
माणूस नात्यांमध्ये गुंततो कारण त्याला जुळणं, जवळीक आणि प्रेम ही मूलभूत गरज वाटते. पण सिच्युएशनशिपसारख्या नात्यांमध्ये जवळीक असते; पण नात्याला नाव नसतं. त्यामुळे गोंधळ वाढतो. अनेकदा या नात्यात आत्मसन्मानालाही धक्का बसतो. आपलं मन फसवणूक ओळखतं म्हणूनच, जिथे स्पष्टता नाही, तिथे जवळीक निकोन नसेल. शेवटी, नातं टिकतं विश्वासावर आणि जर विश्वासच धूसर असेल, तर नात्याची इमारत उभीच राहत नाही.
नातं आहे किंवा नाही हे स्पष्ट असावं. नात्याच्या गोंधळात स्वतःला हरवून बसणं योग्य नाही!
गोंधळलेल्या नात्यांचा मनावर काय परिणाम होतो?
१. तरुण मुलामुलींच्या मनात भावनिक गोंधळ आणि अपराधी भावना तयार होते. नातं टिकलं नाही की आपण चूक केली आहे या विचारांनी अपराधी वाटू शकतं.
२. स्वत:विषयी शंका घेणं सुरू होतं. मनात अपुरेपण, कमीपणाची भावना घर करत जाते.
३. अतिविचार आणि चिंतेचा ताण रोजचं जगणं अवघड करतं. मेसेजला रिप्लाय न मिळणे यांसारख्या अगदी अशा साध्या घटनांमुळेदेखील सतत विचार सुरू होतो.
४. कुणावरही विश्वास ठेवणं अवघड होत जातं. प्रत्येक नात्याबाबत शंका आणि भीती वाटू लागते. इतरांसह स्वत:वरचा विश्वासही डामाडौल होतो.
५. भावनिक थकवा येतो. भावनिक घुसमटही वाढते.
६. धोक्याचे संकेत मिळतात; पण त्याकडे दुर्लक्ष होतं. पुढे बदल होईल या भावनेतून टॉक्सिक वागणूक सहन केली जाते.
७. नातं अधिकृत नसल्यामुळे ते इतरांना सांगता येत नाही. लपूनछपून गोष्टी कराव्या लागतात. जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा एकटेपण जाणवते.
८. सेल्फ डाउट, चिंता, डिप्रेशन अशा स्थिती निर्माण होतात. अशावेळी समुपदेशन किंवा थेरपीची गरज भासते.
९. जर नात्याबद्दल स्पष्टता नसेल तर शारीरिक जवळीक म्हणजे भावनांशी खेळ करणं ठरू शकतं.
१०. अटॅचमेंट थिअरी सांगते की माणसाला जवळीक हवी असते. पण ती स्पष्ट आणि सुरक्षित हवी असते. त्यामुळे सुरुवातीलाच मर्यादा ठरवा.
११. मनोविकारतज्ज्ञ डॉ. हेन्री क्लाउड यांच्या मते, वैयक्तिक सीमा हे मानसिक आरोग्याचं मूलभूत तत्त्व आहे. नात्यातही ‘कुठे थांबायचं?’ हे स्पष्ट असायलाच हवं.
१२. ‘नाही’ म्हणणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं. ठाम असणं महत्त्वाचं, नाही म्हणायला शिकणं, आत्म-सन्मानाची परिभाषा ठरवणंही आवश्यकच असतं.