Join us  

तू माझे व्हॉट्सॲप स्टेटस इग्नोर करतोस/ तू ‘त्याच्या’ स्टेटसला ‘बदाम’ देतेस!-यावरुन भांडता तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 6:13 PM

आपले सेल्फी कसे येतात आणि कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/ न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण एरवी आवडलेल्या माणसांना जोखत राहणार आहोत?

ठळक मुद्देछोट्या छोट्या गोष्टी आणि लहान सहान मुद्दे कुरतडण्यापासून जरा दूर जाऊ! (सर्व छायाचित्रे-गुगल)

प्राची पाठक

"माझं व्हॉटस् अप स्टेट्स पाहिलं नाही?" - तू माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतोस."माझ्या डीपीला भारी म्हंटलं नाही?"- तुला माझं काहीच आवडेनासं झालंय. तुझ्या डोक्यात वेगळं काही सुरु असेल, लक्षात येतंय मला."मी मेजेस केला की ते ब्लू टिकमार्क अलीकडे खूप उशिराने येतात. माझे मेसेजेस तू चटकन वाचत नाहीस. आधीसारखी उत्तरं देत नाहीस"..."मला सध्या जास्त पॅकेज नाही जॉबमध्ये, म्हणून तू असं वागत आहेस","मी सांगितलेला ड्रेस मुद्दाम घालत नाहीस तू, कळलं आहे मला"...एक ना अनेक लहान मोठ्या शंका असतात मनात. प्रत्येक वागण्याबद्दल काहीतरी मत तयार झालेलं असतं. या सर्व शंका आपल्यामते आधी सुरळीत असलेलं नातं कुरतडायला लागतात. सगळं नीट सुरु होतं. हे -हे आणि हे अमुक ढमुक घडलं म्हणून सगळं हातातून जात चाललं आहे, अशी फिलिंग मनात येते. माझी किंमत तुला दाखवूनच देईन, असे खेळ मनात सुरु होतात. प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये मला कसं वागवलं, नीट भाव दिला की नाही, नीट वेळ दिला की नाही, यावर मनात आपलीच मतं, नात्यातली असंख्य गणितं, हेवेदावे, शंका- कुशंका ह्यांचं तांडव नृत्य सुरु होतं. ठरवून वेगळं वागणं सुरु होतं. मनात जे सुरु असतं, ते समोर दाखवायचं नाही, नीट मनमोकळं बोलायचं नाही. वरतून, समोरच्याने काय करावं, कसं वागावं ह्याची आपल्या सोयीनुसारची भली मोठी जंत्रीच सतत तयार असणं. त्या नात्यामध्ये तेढ निर्माण होईल नाहीतर काय?

 

मग येतो तो स्ट्रेस. मला वाटतंय तेच खरं आहे, असं जाणवून देणारी एखादी घटना घडली, तरी आधी एकदम "जनम जनम का साथ" वगैरे वाटलेलं नातं पटरीवरून खाली घसरतं. मग ते घरात गुमसुम वगैरे बसून राहणं, काहीच सुचेनासं होणं, काही करावंसं न वाटणं, झोप उडणं, भूक उडणं सगळं चक्र आलंच. निमित्त काय असतं, तर माझ्या मेसेजला ब्लू टिक उशिरा आल्या. त्या त्या वेळी आपल्यासाठी ते ते कारण अतिशय महत्वाचं आणि अतिशय मोठ्ठं असतं सुद्धा. पण नंतर मात्र हे आपल्याच मनात फुगवलेलं कारण असू शकतं कदाचित, अशीही विचारांची गाडी जराशी फिरून यायला हवी. नसेल वेळ मिळाला, वेळ मिळूनही नसेल वेळेत उत्तर द्यायला जमलं, वाट पाहू जरा किंवा चक्क स्पष्ट बोलूनच सॉर्ट आऊट करून घेऊ हे सगळं, हे न करता मनातला कडवटपणा वेगाने वाढत जातो. त्यात आणखीन आपल्याच मनात ठाण मांडून बसलेल्या शंका-कुशंका- दुसऱ्याकडूनच्या अपेक्षा आणि स्वतःचं ते सर्व बरोबरच आहे, असं ठामपणे वाटणं ...फारच केमिकल लोचा होऊन जातो हा!मुळात कोणी आपल्याला कसं आणि का क्लिक होतं ह्याचा तरी नीटसा विचार केलेला असतो का? अमुक व्यक्ती आपल्याला आवडते, तर का आवडते? आपण तिला आवडतो का? बरं, ह्या आवडीनिवडी पलीकडे आयुष्य बरंच मोठं आहे, तर त्यातले काय काय आपण एकमेकांच्या साथीने एकमेकांसाठी करू शकतो? आपलं शिक्षण, आपलं करिअर, आपल्या सवयी आणि आपल्याला आवडणारी व्यक्ती ह्याबद्दल किती स्पष्टता आहे आपल्या मनात? आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या साथीने आपण काय-कसं जगणार आहोत, याबद्दल विचार करतो का आपण? की केवळ आता आवडलं आहे ना कोणी, मग आता आपले सेल्फी कसे येतात आणि कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/ न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण एरवी आवडलेल्या माणसांना जोखत राहणार आहोत? सिनेमांत दाखवतात तसं तू माझ्याकडे पाहिलं आणि मी तुझ्याकडे पाहिलं, म्हणून प्रेम म्हणायचं का त्या नात्याला?

नेमकी काय आहे आपली प्रेमाची व्याख्या, कधी विचार केलाय? बरं सगळं व्याख्येत बसलेलं असून सुद्धा स्ट्रेस का वाटतोय मग? का येतात मनात अनेक शंका-कुशंका? पक्का विश्वास का वाटत नाही समोरच्यावर? प्रत्येक गोष्टीत "तो असा असता तर" आणि "ती तशी असती तर", अशी हातघाईची लढाई का होतेय? आपलं नातं एक छान बुके का नाही होऊ शकत? एक फुल माझं- एक तुझं असा... म्हणजे प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहेच आणि सोबत येऊन सुद्धा आणखीन काही सुंदर समृद्ध व्हायची शक्यता असलेलं?या मुद्द्यांचा नीट विचार केला, तर नात्यांमधला अनावश्यक स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत होईल. जरा लार्जर, बिगर आणि बेटर आयुष्य आपण समजून घेऊ शकू. छोट्या छोट्या गोष्टी आणि लहान सहान मुद्दे कुरतडण्यापासून जरा दूर जाऊ! मुळात आपलं एकमेकांसोबत जमतंय ते का ह्याची चांगली स्पष्टता येईल. हा सगळा "केमिकल लोचा" एकमेकांच्या प्रगतीसाठी वापरता येईल!विचार तर करा...

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :रिलेशनशिपसोशल मीडिया