Join us

नवरा-बायको एकमेकांचे जिवाभावाचे मित्र होऊ शकतात का? त्या मैत्रीसाठी काय करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 19:25 IST

आपलं लग्न झालं म्हणजे नातं कायम अपेक्षांच्या दावणीला बांधण्यापेक्षा नात्यात मैत्री कशी फुलेल याचा विचार केला तर? -प्रभातपुष्प

ठळक मुद्देलग्नाचं नातं फुलवणं, आनंदानं जपणं ही कला आहे. ती एकमेकांच्या मदतीनं शिकायला हवी..

अश्विनी बर्वे

“लग्न” ही आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते. आधुनिक काळातसुद्धा अनेकांना लग्न करावे वाटते किंवा जोडीदार असावा असं वाटत असतं. यात चूक बरोबर असं काही नाही. पण अनेक शतकांपासून पतीपत्नी अशा परिभाषेत आपण अडकलं आहोत. ज्यातून खूप संकुचित अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे नात्याची व्याप्ती कमी होते. समजा आपल्या शब्दकोशातून पती-पत्नी हे शब्द काढून टाकले आणि त्या जागी “जीवनभराचे मित्र” हे शब्द टाकले तर? आपण आपापल्या भूमिका जशा कधी आईची, वडिलांची, तर कधी छोट्या मुलाची, शिक्षकाची, सल्लागाराची भूमिका करत असतोच ना,आणि अर्थात आपण  पतीपत्नी सुद्धा असतोच. या नात्याची व्याप्ती जर वाढवली आणि ती वाढविण्यास मोकळीक दिली तर ?

 (Image : google)

वैवाहिक नात्याची प्रतिष्ठाही यातच असेल जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला केवळ शरीर न मानता एक पूर्ण, स्वतंत्र व्यक्ती मानतो. एकमेकांची विचार करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले, वैयक्तिक मुल्यांवर, दृष्टीकोनांवर, श्रद्धावर चर्चा केली, आणि एकमेकांच्या भावनांविषयी संवेदनशील राहिलो, आणि एकमेकांबरोबर शांततेने बसून योग्य विचारांची बैठक विकसित केली. तर नातं अधिक सजग होईल. व्यक्तीच्या पूर्णतेचा आदर केला आणि त्या व्यक्तीच्या गौण बाजू, त्याचे शरीर याचा विचार न करता त्या संपूर्ण व्यक्तीला जोडून घेतले तर नक्कीच सकारात्मक सुंदर नातं निर्माण होईल.हे सगळे जे दहा वर्षात करायचे आहे ते सगळे एका वर्षात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही, तसेच जे एका वर्षात करायचे आहे ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही. खुपजण या गोष्टी सुरुवातीला काही महिन्यात करतात आणि नंतरच्या जीवनात ह्या गोष्टी सोडून दिल्या जातात. मग ते मेलेल्या नात्याबरोबर रहातात. जर रोपटे लहान असतानाच मेले तर होईल. म्हणून या गोष्टी हळूहळू करायला हव्या म्हणजे त्या अधिक काळ टिकतील.जीवनात आणि चांगल्या नात्यात भूतकाळ हा अप्रासंगिक असतो. वर्तमान हा इमारत उभी करतो. भविष्य काळ हा खूप महत्वाचा असतो, ज्यात तुम्ही दोघं प्रवास करणार आहात. दैनदिन क्षुल्लक गोष्टीवर चर्चा केली तर तुम्ही प्रेमात पडाल. भविष्यावर बोला, स्वप्नांवर बोला, महत्वकांक्षेवर बोला. एकेमेकांच्या वाढीत वस्तुनिष्ठपणे आणि आतून सहभागी व्हा. हा प्रेम वाढण्याचा मार्ग आहे.एकमेकांची स्पेस जपा. तिचा आदर केला. तसेच एकमेकांच्या आवडी-निवडी, प्राथमिकता यांचा तुम्ही आदर करतात, सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुमची घुसमट होणार नाही हे पण पहा.चांगल्या विवाहाचे नीट संगोपन करावे लागते, लग्नाचं नातं फुलवणं, आनंदानं जपणं ही कला आहे. ती एकमेकांच्या मदतीनं शिकायला हवी..

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप