Join us  

बिगबाॅसलाही भारी पडतेय अनुज- अनुपमा लव्हस्टोरी! मिडल एज लव्हस्टोरीचा हा रोमँटिक ट्रेंड का गाजतोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 6:15 PM

अनुपमाच्या स्टोरीत एक नविनच पण प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच टीआरपीच्या बाबतीत टॉपवर असणारी अनुपमा (Anupama) आता बिगबॉस (Bigg Boss) समोरही कमालीचा भाव खाऊन जात आहे. 

ठळक मुद्देमध्यमवयात जुळून येणाऱ्या प्रेमाच्या गाठी अधिक प्रगल्भ असतात, असे मानणारे आणि मध्यमवयीन प्रेम समजून घेणारे प्रेक्षक निर्माण होत आहेत, ही खरोखरंच कौतूकाची बाब आहे. 

काही वर्षांपुर्वी असे वातावरण असायचे की बिगबॉसचा सिझन सुरू झाला की अनेक लोकप्रिय डेली सोप्सचे टीआरपी धाडधाड कोसळायचे. कारण नेहमीच्या त्याच त्याच मालिकांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या नाटकीपणापेक्षा प्रेक्षकांना बिगबाॅसमध्ये दाखविले जाणारे वास्तव जास्त आवडायचे. आता बिगबॉसच्या सध्याच्या सिझनदरम्यान मात्र उलट अनुभव येत असून टीआरपीच्या बाबतीत हा शो कमालीचा मागे पडला आहे. याउलट अनुपमा आणि अनुज यांची लवस्टोरी मात्र या आठवड्यातही त्यांचे अव्वल स्थान टिकवून आहे. याचाच अर्थ असा की आता बिगबॉसपेक्षाही अनुज- अनुपमा यांची मिडलएज स्टोरी बघायला प्रेक्षकांना जास्त आवडते आहे. 

 

खरं पाहिलं तर अनुपमा मालिकेत दाखविले जाणारे अनेक प्रसंग सर्वसामान्य घरांमध्ये होण्यासारखे नाहीत. अर्थातच म्हणूनच ती एक मालिका आहे, वास्तव नाही. एवढी साधी बाई कुठे असते का? कुणी एवढं चांगलं कसं काय असू शकतं? नवऱ्याच्या मैत्रीणीचा घरात असलेला मोकळाढाकळा वावर एखादी बाई एवढी कशी काय खपवून घेऊ शकते? नवऱ्याचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न होऊनही त्याच घरात केवळ सासू- सासऱ्यांच्या आग्रहाखातर राहणं खरंच एखादीला वास्तवात शक्य आहे का? असे अनेक प्रश्न अनुपमा या मालिकेबाबत नेहमीच विचारले जातात. त्याचं उत्तर कुणीही अगदी सहजपणे 'नाही' असंच देतं.

 

या सगळ्या सर्वसामान्य कुटूंबामध्ये अतिशयोक्ती किंवा जवळपास अशक्यच ठरतील, अशा या मालिकेतील गोष्टी जर सोडल्या तर मात्र दुसऱ्या बाजूला दाखविण्यात येणारी अनुपमाची लढाई, वयाच्या चाळीशीनंतरही तिने नव्या दमाने सुरु केलेलं तिचं करिअर, कितीही संकटं आली तरी देवावरचा विश्वास, श्रद्धा ढळू न देता आयुष्याकडे अतिशय सकारात्मकतेने पाहण्याचा तिचा दृष्टीकोन या सगळ्या गोष्टी खूपच छान पद्धतीने पडद्यावर दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच तर इतर अनेक निगेटीव्ह मुद्दे सोडून प्रेक्षक मालिकेतील चांगल्या बाजू उचलून धरत आहेत.

 

यामुळेच तर मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस चढता आहे. या टीआरपीला आणखी वर नेण्याचे काम केले ते अनुज कपाडियाच्या जबरदस्त एन्ट्रीने. अनुपमाच्या आयुष्यात सुखाचा धागा बनून आलेला अनुज दिवसेंदिवस प्रेक्षकांना खूपच आवडतो आहे. अनुजची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्याच्या लूक्सने सध्या अनेक जणींना दिवाने केले असून तरूणींमध्येही अनुज कपाडियाची प्रचंड चर्चा आहे. अनुज- अनुपमामध्ये फुलणारे प्रेम रसिकांना आवडते आहे. तारूण्याच्या प्रेमात असणारा उथळपणा किंवा याच मालिकेतील मिडल एज प्रेम कहाणीचेच एक उदाहरण असणाऱ्या वनराज- काव्या यांच्या प्रेमात असणारा भडकपणाही अनुज- अनुपमा यांच्या प्रेमात नाही. म्हणूनच तर प्रेक्षकांना अनुज- अनुपमा यांच्यामधले शांत, संयमी आणि अबोल प्रेम बघायला अतिशय आवडते आहे. 

 

दुसऱ्या बाजूला मराठी रसिकांनी तेवढ्याच प्रेमाने मीरा- आदिराज यांची लव्हस्टोरी उचलून धरली आहे. मराठीमध्ये ही मालिका सध्या टॉपला असून प्रेक्षक या जोडीवर भरभरून प्रेम करत आहेत. मीरा आणि आदिराज हे देखील काही पंचविशीतले जोडपे नाही. दोघांनीही वयाची पस्तिशी ओलांडली आहे. पण त्यांचे कॉलेजमधले प्रेम एवढी वर्षे एकमेकांपासून दूर राहूनही आता या वयातही कसे कायम आहे, हा या मालिकेचा मुख्य गाभा आहे. लव्हस्टोरीचा ट्रेण्ड बदलू लागला आहे की काय, असे या दोन्ही मालिकांची लोकप्रियता पाहून जाणवते.

 

याच धाटणीची म्हणजेच मिडल एज लव्ह स्टोरी असणारी 'बडे अच्छे लगते है.....' ही एक मालिका देखील काही वर्षांपुर्वी आली होती. या मालिकेलाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेत असणाऱ्या राम आणि प्रियाच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते. काही कारणामुळे लग्न लांबलेली ही दोघे मध्यमवयीन असताना एकत्र आली आणि मग त्यांची स्टोरी सुरू झाली. तरूण वयात फुलणारे प्रेम निश्चितच मोहक असते, पण मध्यमवयात जुळून येणाऱ्या प्रेमाच्या गाठी अधिक प्रगल्भ असतात, असे मानणारे आणि मध्यमवयीन प्रेम समजून घेणारे प्रेक्षक निर्माण होत आहेत, ही खरोखरंच कौतूकाची बाब आहे. 

 

टॅग्स :रिलेशनशिपबिग बॉस