Winter Special Super food : थंडीतली आजारपणं टाळून तब्येत कमवायची तर ५ पदार्थ खा, ते ही न चुकता..
Updated:December 9, 2022 15:38 IST2022-12-09T12:58:43+5:302022-12-09T15:38:22+5:30

१. हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढू लागला की सर्दी, खोकला, कफ असे त्रास एका मागे एक सुरू होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आणि थंडीचा कडाका वाढल्याने तर लहान मुलं या दिवसांत वारंवार आजारी पडतात.
२. म्हणूनच आजारपण टाळून हिवाळ्यातही ठणठणीत रहायचं असेल तर ऋतुमानानुसार आहारात काही बदल करणं आवश्यकच आहे. आहारात नेमके कोणते बदल केल्याने या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होऊ शकते, याविषयीची एक महत्त्वाची पोस्ट सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
३. यामध्ये त्यांनी हिवाळ्यात खायलाच पाहिजे असे ५ पदार्थ सांगितले आहेत. यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बाजरी. हिवाळ्याचे २- ३ महिने सोडले तर एरवी आपण बाजरी खात नाही. कारण ती उष्ण असते. पण या दिवसांत मात्र बाजरी आवर्जून खायला पाहिजे. कारण त्यामध्ये मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. शिवाय बाजरीमध्ये असणारे काही घटक हिवाळ्यात वाढणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
४. गूळ आणि तूप हे मिश्रणही हिवाळ्यातले अनेक आजार पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतं. सायनसचा आणि सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी त्याचा विशेष उपयोग होतो. जेवणानंतर गूळ आणि तूप एकत्रित करून खाणे उत्तम. बाजरीच्या भाकरीसोबतही तुम्ही गूळ आणि तूप खाऊ शकता.
५. थंडीमध्ये डोक्याची त्वचा तसेच सगळं अंग कोरडं पडतं. हा त्रास टाळण्यासाठी कुळीथ खाणं फायदेशीर ठरतं. किडनीस्टोनचा त्रास कमी करण्यासाठीही कुळीथाचा उपयोग होतो. भात आणि तुपासोबत कुळीथ खावं.
६. घरी तयार केलेलं लोणीही हिवाळ्यात आवर्जून खावं. हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोणी नियमितपणे खावं. यातून सांधेदुखीलाही आराम मिळतो शिवाय त्वचेसाठी नॅचरल माॅईश्चरायझर म्हणूनही त्याचा उपयोग होतो.
७. तिळामध्ये असणारे काही पौष्टिक घटक डोळे, त्वचा आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.