उन्हाळ्यात होऊ शकतो फ्रिजचा स्फोट, स्वयंपाकघरातील ४ चुका म्हणजे संकटाला आमंत्रणच
Updated:April 10, 2026 21:00 IST2026-04-10T21:00:00+5:302026-04-10T21:00:02+5:30
Kitchen appliance safety guide marathi: Maintaining refrigerator in summer: जाणून घेऊया अशा कोणत्या ४ चुका आहेत ज्या फ्रिजसाठी घातक ठरू शकतात.

उन्हाच्या झळा वाढू लागल्या की घराघरात फ्रीजचा वापर प्रचंड प्रमाणात वाढतो. थंड पाणी, आइस्क्रीम आणि अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रीज २४ तास सुरु असतो. पण याच वेळी फ्रिजशी संबंधित अपघातांच्या बातम्याही कानावर पडतात. अनेकदा फ्रिजचा स्फोट झाल्यामुळे घराचे मोठे नुकसान झाल्याचे किंवा जीवितहानी झाल्याचे आपण ऐकतो. पण आपल्याला माहितीये का? फ्रिजचा हा स्फोट होण्यामागे फ्रिजची चूक नसून, आपल्या काही छोट्या पण चुका कारणीभूत असतात. (Kitchen appliance safety guide marathi)
उन्हाळ्यात आपल्या काही सवयी बदलणे आणि फ्रिज वापरण्याचे नियम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या ४ चुका आहेत ज्या फ्रिजसाठी घातक ठरू शकतात. (Maintaining refrigerator in summer)
फ्रिज भिंतीला चिकटवून ठेवणे ही सर्वात सामान्य पण सगळ्यात मोठी चूक आहे. फ्रिजच्या मागे असलेल्या कॉम्प्रेसरमधून सतत उष्णता बाहेर पडत असते. जर फ्रिज आणि भिंतीमध्ये पुरेशी जागा नसेल, तर ही गरम हवा बाहेर पडू शकत नाही आणि क्रॉम्प्रेसर ओव्हरहीट होतो. अशावेळी फ्रिज आणि भिंतीमध्ये ६ ते ८ इंच अंतर ठेवा, ज्यामुळे हवेचा प्रवाह योग्य राहिल.
अनेकदा घाईघाईत आपण गरम दूध किंवा जेवणाचे भांडे फ्रिजमध्ये ठेवतो. यामुळे फ्रिजच्या आतील तापमानात अचानक मोठी वाढ होते. हे तापमान पुन्हा खाली आणण्यासाठी कॉम्प्रेसरला दुप्पट वेगाने काम करावे लागते. यामुळे कॉम्प्रेसरवर प्रचंड ताण येतो आणि तो गरम होऊन निकामी होऊ शकतो किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते. पदार्थ थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा.
अनेकदा आपण फ्रिजसाठी साध्या बोर्डचा किंवा पातळ वायर्सचा वापर करतात. उन्हाळ्यात लोड वाढल्यामुळे या वायर्स गरम होऊन वितळतात आणि शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता अधिक वाढते. फ्रीजसाठी नेहमी १५ एम्पियरचा पॉवर प्लग आणि आयएसआय (ISI) मार्क असलेली वायरच वापरा.
जागा वाचवण्यासाठी अनेकदा फ्रिजच्या वर मायक्रोवेव्ह ओव्हन, स्टॅबिलायझर किंवा एखादा जाड कापड ठेवतात. यामुळे फ्रिजमधील उष्णता बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. फ्रीजचा वरचा भाग नेहमी मोकळा आणि स्वच्छ ठेवा. त्यावर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका.
आपल्या इथे लाईट कमी-जास्त होत असेल तर चांगल्या दर्जाचा स्टॅबिलायझर नक्की वापरा. फ्रीजच्या मागच्या बाजूची धूळ वेळोवेळी साफ करा, जेणेकरून कॉम्प्रेसरला थंडावा मिळेल.
फ्रिजमधून जळाल्याचा वास येत असेल किंवा कुलिंग अचानक बंद झाले असेल, तर फ्रीजचा प्लग ताबडतोब काढा आणि मेकॅनिकला बोलवा.