1 / 12नातं म्हणजे आधार, आनंद आणि सुरक्षिततेची भावना देणारं एक सुंदर बंधन...पण काहीवेळा हेच नातं आपल्यासाठी ओझं बनू लागतं. सततचा ताण, गैरसमज, दुखावणारे शब्द किंवा स्वतःची किंमत कमी होत असल्याची भावना - हे सगळं काहीतरी बिनसलंय याचे संकेत असू शकतात. अनेकवेळा आपण प्रेमाच्या नावाखाली या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण प्रत्येक नातं आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळेच आपण टॉक्सिक नात्यात आहोत का हे ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं. आपण अशाच काही खास टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचं नातं हेल्दी आहे की टॉक्सिक, हे सहज ओळखू शकाल.2 / 12नात्यामध्ये प्रेम, आदर आणि एकमेकांचा विकास असणं गरजेचं असतं. मात्र, कधीकधी आपल्याला कळतही नाही की आपण अशा नात्यात अडकलो आहोत जे आपल्याला आतून पोखरत चाललं आहे. 'टॉक्सिक रिलेशनशिप' म्हणजे केवळ भांडण नव्हे, तर ती एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे तुमच्या आनंदापेक्षा तुमच्या मानसिक तणावाची पातळी जास्त असते.3 / 12एक हेल्दी नातं टिकवण्यासाठी प्रेमाबरोबर विश्वास आणि आदरही तितकाच महत्त्वाचा असतो. पण प्रत्येक नातं नेहमीच निरोगी असेल असं नाही. अनेक वेळा नातं अशा स्वरूपात बदलतं, ज्यामध्ये आपण स्वतःला थकलेलं, त्रस्त किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटू लागतो. आपण सतत विचार करत राहतो की “कदाचित चूक माझीच आहे”, “कदाचित सगळं ठीक होईल”, किंवा “प्रेमात इतकं चालतंच”, पण खरं म्हणजे जे नातं तुमची शांतता हिरावून घेतं, तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम करतं आणि तुम्हाला स्वतःपासून दूर नेतं, ते नातं निरोगी नसतं.4 / 12आपल्या जोडीदारावर प्रेम असणं स्वाभाविक आहे, पण त्या प्रेमाच्या बदल्यात जर तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवावा लागत असेल, तर मात्र विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही सध्या ज्या नात्यात आहात ते तुम्हाला आधार देणारं आहे की तुमच्यातील ऊर्जा शोषून घेणारं? हे कसं ओळखायचं?5 / 12एका चांगल्या नात्यात तुम्हाला नेहमी आनंद मिळतो. पण जर एखाद्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटत असेल, तर ते धोक्याचे लक्षण आहे. समोरची व्यक्ती कधी रागावेल किंवा कोणत्या गोष्टीवरून भांडण होईल, यासाठी तुम्हाला सतत सावध राहावे लागत असेल, तर समजून जा की हे नाते तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करत आहे.6 / 12 टॉक्सिक नात्यात 'ब्लेम गेम' हे फार कॉमन लक्षण आहे. चूक कोणाचीही असो, पण प्रत्येक वादात जर तुम्हालाच दोषी ठरवले जात असेल, तुमचा जोडीदार स्वतःची चूक मान्य करत नसेल आणि प्रत्येक वेळी तुम्हालाच अपराधी वाटेल असे वागत असेल, तर तुम्ही एका टॉक्सिक नात्यात आहात.7 / 12एका चांगल्या आणि सुदृढ नात्यात एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य असते. मात्र, जेव्हा नाते 'टॉक्सिक' होऊ लागते, तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उदा. कोणाशी बोलायचे, कोणते कपडे घालायचे, कुठे जायचे किंवा सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे आणि काय नाही, यावर बंधने घातली जातात. जर तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक पावलावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे वागणे सामान्य नक्कीच नाही.8 / 12जर तुमच्या नात्यात विश्वास उरला नसेल आणि तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक फोन कॉलवर, मेसेजवर किंवा भेटीगाठींवर संशय घेत असेल, तर ते नाते टॉक्सिक झाले आहे असे समजावे. सतत स्पष्टीकरण द्यावे लागणे हे एका चांगल्या नात्याचे लक्षण नाही.9 / 12 भांडण झाल्यावर चर्चा करून प्रश्न सोडवण्याऐवजी, जर तुमचा जोडीदार अनेक दिवस तुमच्याशी बोलणं बंद करत असेल आणि तुम्हाला शिक्षा दिल्यासारखं वागत असेल, तर हे भावनिक शोषण आहे.10 / 12 एक चांगला जोडीदार तुमच्या यशात आनंदी होतो. पण टॉक्सिक नात्यात जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं साध्य करता, तेव्हा तुमचा पार्टनर तुमचं कौतुक करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा तुमच्या यशाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो.11 / 12 काहीजण वादात अशा प्रकारे बोलतात की तुम्हाला तुमच्याच आठवणींवर किंवा निर्णयांवर शंका येऊ लागते. 'मी असं कधी बोललोच नाही' किंवा 'तू उगाच विचार करतोयस' असं म्हणून तुमच्या भावनांना डावलले जाते. जाहीरपणे किंवा चार चौघांत तुमचा अपमान करणे हे देखील याचेच एक लक्षण आहे.12 / 12 जर तुम्हाला असं वाटू लागलं असेल की या नात्यात राहण्यासाठी तुम्ही स्वतःचे छंद, मित्र-मैत्रिणी आणि स्वतःचं व्यक्तिमत्व विसरत चालला आहात, तर समजून जा की हे नाते तुमच्यासाठी योग्य नाही.