Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शांत राहणं दुबळेपणा नाही तर मोठ्ठी ‘पॉवर!’ कमी बोलणाऱ्या व्यक्तींकडे असतात खास गुण, शांत राहून जिंकतात जग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2026 21:05 IST

1 / 11
आजच्या काळात जास्त बोलणाऱ्या आणि सतत स्वतःकडे लक्ष वेधून घेणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. पण याच गर्दीत काही लोक असेही असतात जे कमी बोलतात, शांत राहतात आणि फक्त आवश्यक तेव्हाच आपले मत व्यक्त करतात. विशेष म्हणजे अशा व्यक्ती अनेकदा अधिक समजूतदार, निरीक्षणक्षम आणि प्रभावी मानल्या जातात. त्यांची शांतता ही कमजोरी नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास ताकद असते. मानसशास्त्रानुसार कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये काही असे गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवतात.
2 / 11
आपण अशा जगात राहतो जिथे जो जास्त बोलतो, त्यालाच जास्त महत्त्व दिलं जातं. सतत बडबड करणं, स्वतःची मतं ठामपणे मांडणं किंवा चर्चेच्या केंद्रस्थानी राहणं हेच आत्मविश्वासाचं लक्षण मानलं जातं. पण याच गर्दीत काही लोक असे असतात, जे अत्यंत शांत असतात. ते उगाच बडबड करत नाहीत, कोणाच्या वादात पडत नाहीत आणि समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतात. अशा 'कमी बोलणाऱ्या' लोकांना अनेकदा लाजाळू किंवा अबोल समजून दुर्लक्षित केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? शांत राहणं ही त्यांची कमजोरी नसून ते त्यांचं सर्वांत मोठं सामर्थ्य असतं. कमी बोलणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात असे काही विशेष गुण दडलेले असतात, जे त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवतात.
3 / 11
नेमके कोणते आहेत ते ८ गुण जे शांत स्वभावाच्या व्यक्तींना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात आणि त्यांची छाप इतरांवर पाडतात ते पाहूयात.
4 / 11
शांत राहणाऱ्या व्यक्ती जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्यावर भर देतात. संवादा दरम्यान ते केवळ समोरच्याचे शब्दच ऐकत नाहीत, तर त्यांचे हावभाव, भावना आणि एकूण परिस्थितीचेही सूक्ष्म निरीक्षण करतात. यामुळेच, जेव्हा ते शेवटी आपले मत मांडतात, तेव्हा ते अतिशय व्यवस्थित आणि विचारपूर्वक वाटल्यामुळे लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करते.
5 / 11
शक्यतो समाजात असं मानलं जातं की, जो व्यक्ती जास्त बोलतो तोच जास्त आत्मविश्वासी असतो. परंतु संशोधनानुसार, शांत राहणाऱ्या अनेक व्यक्तींचे विचार अत्यंत खोल आणि प्रगल्भ असतात. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी, ते आधी विषय समजून घेतात, त्यावर विचार करतात आणि मगच बोलतात. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांच्या शब्दांना एक वेगळे वजन प्राप्त होते.
6 / 11
शांत स्वभावाचे लोक सहसा दिखाव्यापासून दूर राहतात. ते स्वतःला प्रत्येक ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत, म्हणूनच त्यांचे नातेसंबंध अधिक सच्चे आणि खोल असतात. मानसशास्त्रानुसार, असे लोक खूप कमी मित्र बनवतात, परंतु ज्यांच्याशी ते जोडले जातात, त्यांच्याशी पूर्ण प्रामाणिकपणे आणि विश्वासाने नातं निभावतात.
7 / 11
शांत स्वभावाचे लोक अनेकदा उत्कृष्ट निरीक्षक असतात. ते अशा लहान-सहान गोष्टी आणि भावना टिपतात ज्याकडे इतर लोक दुर्लक्ष करतात. हीच संवेदनशीलता त्यांना इतरांसाठी विश्वासार्ह आणि खास बनवते. अनेकदा लोक आपल्या खाजगी गोष्टीही शांत स्वभावाच्या व्यक्तींशी सहज शेअर करतात, कारण त्यांना खात्री असते की ही व्यक्ती आपल्याला 'जज' न करता आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेईल.
8 / 11
खरंतरं, शांत राहणे ही कमजोरी नसून ते आत्मनियंत्रण, भावनिक समज आणि सखोल विचारांचे लक्षण आहे. जे लोक सतत बोलण्याऐवजी योग्य वेळी योग्य गोष्ट बोलणे जाणतात, ते अनेकदा इतरांवर अधिक कायमस्वरूपी आणि चांगली छाप पाडतात.
9 / 11
शांत लोक कोणत्याही परिस्थितीचा खूप सखोल विचार करतात. ते घाईघाईत किंवा भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाहीत. परिस्थितीचं शांतपणे विश्लेषण केल्यामुळे त्यांचे निर्णय अनेकदा अचूक ठरतात. ते संकटाच्या वेळी गोंधळून न जाता शांत राहून चांगला मार्ग काढण्याचा विचार करतात.
10 / 11
शांत व्यक्तींना आनंदी राहण्यासाठी सतत कोणाच्या तरी सोबतीची किंवा मनोरंजनाची गरज नसते. त्यांना स्वतःच्या सहवासात वेळ घालवायला आवडतं. या गुणामुळे ते कोणावरही मानसिकदृष्ट्या अवलंबून राहत नाहीत, ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व अधिक स्वतंत्र आणि खंबीर बनतं.
11 / 11
जेव्हा आपण शांत असतो, तेव्हा आपलं मन नवनवीन कल्पनांवर विचार करू शकतं. शांत राहणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या विचारांच्या जगात जास्त वावरत असल्यामुळे त्यांच्याकडे कमालीची कल्पनाशक्ती असते.
टॅग्स : मानसिक आरोग्यसोशल व्हायरल