त्यांनी न लाजता सांगितलं आई झाल्यानंतरही रडलो-उदास झालो! पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी बोलणाऱ्या ६ अभिनेत्री...
Updated:November 28, 2025 17:11 IST2025-11-28T16:57:04+5:302025-11-28T17:11:46+5:30
postpartum depression bollywood actress : bollywood actresses postpartum depression : बॉलिवूड मधील या काही अभिनेत्रींनी पोस्टपार्टम डिप्रेशनवर कशी मात केली आणि आता त्या कशा जगत आहेत पाहा...

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद आणि महत्त्वाचा (bollywood actresses postpartum depression) अनुभव असतो. परंतु, या आनंदातच शरीरातील हार्मोनल बदलांमुळे आणि अचानक वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक स्त्रिया बाळंतपणानंतरच्या नैराश्याला (Postpartum Depression - PPD) बळी पडतात. ग्लॅमरच्या जगात वावरणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री देखील याला अपवाद नाहीत.
पडद्यावर नेहमी हसऱ्या आणि उत्साही दिसणाऱ्या अनेक अभिनेत्रींना देखील बाळाच्या जन्मानंतरच्या काळात मानसिक आरोग्याच्या मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांनी केवळ या नैराश्याचा स्वीकार केला नाही, तर कुटुंबाचा आधार, उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडून स्वतःला पुन्हा सावरले.
अशाच धाडसी बॉलिवूड सेलिब्रिटी आई कोणत्या आहेत ते पाहूयात, ज्यांनी आपल्या कठीण काळातून मार्ग काढला. बॉलिवूड मधील या काही अभिनेत्रींनी नैराश्यावर कशी मात केली आणि आता त्या कशा जगत आहेत ते पाहूयात.
१. समीरा रेड्डी (Sameera Reddy) :-
पहिल्या बाळंतपणानंतर वजन वाढल्यामुळे आणि सामाजिक दबावामुळे समीरा गंभीर नैराश्यात गेली होती. त्या दिवसात ती स्वतःला आरशात पाहणेही टाळत होती. तिने आपल्या संघर्षाबद्दल सोशल मिडियावर मोकळेपणाने बोलणे सुरू केले. नियमित व्यायाम, ध्यान आणि समुपदेशनाच्या मदतीने तिने नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवले आणि 'बॉडी पॉझिटिव्हिटी'चा संदेश दिला. समीरा आजही सोशल मिडियावर कोणत्याही फिल्टरशिवाय स्वतःचे फोटो शेअर करते आणि महिलांना वास्तववादी आणि नैसर्गिक सौंदर्य स्वीकारण्यास प्रोत्साहित करते.
२. मंदिरा बेदी (Mandira Bedi) :-
मुलगा वीर याच्या जन्मानंतर मंदिरा बेदी हिला पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. मुलाच्या जन्मानंतर सुमारे सहा आठवडे ती अत्यंत दुःखी आणि निराश होती. कोणत्याही गोष्टीचा आनंद वाटत नव्हता. तिला सतत रडू येणे, भावनिक चढ-उतार अनुभवणे आणि चिंताग्रस्त वाटणे अशा समस्या सतावत होत्या. पोस्टपार्टम डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तिला तिच्या पतीने खूप साथ दिली. मंदिरा बेदीने नियमित व्यायाम, धावणे आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करून स्वतःला या नैराश्यातून बाहेर काढले. शारीरिकरित्या अॅक्टिव्ह राहिल्याने तिला मानसिक शांतता मिळाली.
३. सोहा अली खान (Soha Ali Khan) :-
बाळंतपणानंतर सुरुवातीचे काही आठवडे सोहासाठी खूप कठीण होते. क्षणात आनंदी वाटणे आणि लगेच दुसऱ्या क्षणी रडू येणे, हा भावनिक चढ - उतार ती डिप्रेशन दरम्यान अनुभवत होती. पती कुणाल खेमूने घरातील जबाबदाऱ्यांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे सोहाला स्वतःसाठी वेळ मिळाला आणि तिने पुस्तक वाचणे तसेच योगा यावर लक्ष केंद्रित केले.
४. ईशा देओल (Esha Deol) :-
पहिल्या बाळंतपणानंतर ईशा ठीक होती, पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिला पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास सहन करावा लागला. तिची सतत चिडचिड होणे, रडणे आणि कामावर लक्ष केंद्रित न होणे अशा समस्या येत होत्या. ईशाची आई आणि पतीने तिला धीर आणि भक्कम पाठिंबा व भावनिक आधार दिला. त्यानंतर ईशाने आपल्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित केले आणि नियमित नृत्य करून आपले मानसिक आरोग्य सुधारले. ईशाने महिलांना भावनिक समस्यांबद्दल बोलण्याचे आवाहन केले आणि पोस्टपार्टम डिप्रेशनला लपवून न ठेवता, त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले.
५. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) :-
दीपिकाला बाळंतपणानंतरचे नैराश्य नाही, परंतु नैराश्य आणि चिंतेचा सामना केला आहे. या दिवसांत तिला सतत शारीरिक थकवा, रडू येणे आणि उठण्याची इच्छा नसणे अशा समस्या जाणवत होत्या. कुटुंब, मित्र आणि पती रणवीर सिंग याच्या आधाराने आणि योग्य उपचार व समुपदेशनाच्या मदतीने दीपिकाने नैराश्यावर मात केली. मानसिक समस्यांवर औषधे घेणे आवश्यक आहे हे देखील तिने सुचवले. या दरम्यान तिने लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन' (Live Love Laugh Foundation) या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ती मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करते आणि लोकांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करते.
६. कल्की कोचलीन (Kalki Koechlin) :-
कल्की हिने बाळंतपणानंतरच्या काळात आलेल्या मानसिक आणि भावनिक बदलांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. आई झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात सतत थकवा जाणवणे, नीट झोप न लागणे आणि चिंतेची भावना अशा मिश्र भावनांचा अनुभव घेतला. आई झाल्यानंतर येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या आणि समतोल साधण्याच्या प्रयत्नांमुळे मानसिक ताण खूप वाढला होता, असे तिने मुलाखतीत सांगितले. कल्की नेहमीच पॅरेंटिंग आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आपले मत मांडते. तिने नव्याने आई झालेल्या अनेकजणींना एक महत्वाचा सल्ला दिला की, मदत मागण्यास कधीही लाजू नका आणि स्वतःची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावले.