Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Updated:April 11, 2026 13:10 IST2026-04-11T13:03:36+5:302026-04-11T13:10:20+5:30
Tripti Kalhans : उत्तर प्रदेशची तृप्ती कलहंस हिने दिवसरात्र मेहनत केली, अनेक वेळा यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरली, पण हार मानली नाही.

देशात असे अनेक आयएएस-आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांच्या यशाची कथा लोकांना प्रेरणा देते. उत्तर प्रदेशची तृप्ती कलहंस ही देखील त्यापैकीच एक आहे. जिने दिवसरात्र मेहनत केली, अनेक वेळा यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरली, पण हार मानली नाही.
आपल्या चुकांमधून धडा घेतला आणि पुढे जात राहिली. अखेर तो दिवस उजाडलाच, जेव्हा तिने यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली आणि १९९ वी रँक मिळवून ती आयएएस अधिकारी बनली. चला तर मग जाणून घेऊया आयएएस तृप्ती कलहंसच्या या प्रवासाबद्दल...
तृप्ती उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी आहे. तिने आपलं सुरुवातीचं शिक्षण फातिमा स्कूलमधून पूर्ण केलं. शालेय जीवनापासूनच तिचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून ती दिल्लीला आली.
२०१७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कमला नेहरू महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली. पदवी पूर्ण केल्यानंतर तृप्तीने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र तिने कोणत्याही कोचिंगला जाण्याऐवजी 'सेल्फ स्टडी'वर भर दिला.
आपल्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये तृप्ती यूपीएससीची पूर्व परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकली नाही, ज्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली आणि तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागला.
आपल्याला हे जमणार नाही, असं तिला वाटू लागलं होतं. तीन वेळा प्रीलिम्स नापास झाल्यामुळे तिला कौटुंबिक दबावाचाही सामना करावा लागला. तरीही तृप्तीने स्वतःला सावरलं आणि आयएएस अधिकारीच व्हायचे, असा ठाम निर्धार केला.
यूपीएससी व्यतिरिक्त इतर कोणत्याही पर्यायाचा विचार केला नाही. तृप्तीने आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि चौथ्यांदा परीक्षा दिली. मात्र, चौथ्या प्रयत्नातही तिला यश मिळालं नाही.
अशा परिस्थितीत तिने काही काळ अभ्यासापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, जो तिच्यासाठी खूप आवश्यक होता. या विश्रांतीदरम्यान तिने विचार केला आणि आपल्या तयारीतील त्रुटी शोधून काढल्या. यामुळे तिला मानसिक शांतता मिळाली आणि तिने पुन्हा नव्याने तयारी सुरू केली.
तृप्ती कलहंसने आपला 'ऑप्शनल सब्जेक्ट' बदलला. 'पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन'ऐवजी 'अँथ्रोपोलॉजी' विषय निवडला आणि त्याचं चांगलं फळ तिला मिळालं.
अखेर तृप्तीने आपल्या पाचव्या प्रयत्नात यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये ऑल इंडिया १९९ वा रँक मिळवला आणि ती आयएएस अधिकारी बनली. अभ्यासादरम्यान लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिने सोशल मीडिया आणि फोनपासून स्वतःला लांब ठेवलं होतं.