shafali verma : बॅडपॅचमधून शफाली वर्मा परत आली, वडिलांनी केला सपोर्ट! ‘या’ संधीचं सोनं करेल का?
Updated:October 29, 2025 18:13 IST2025-10-29T17:51:33+5:302025-10-29T18:13:20+5:30
Shafali Verma is back, her father supported her! Will she seize this opportunity? : शफाली वर्माला मिळाली एक मौल्यवान संधी.

शफाली वर्मा. अतिशय बेधडक खेळणारी गुणी खेळाडू. पण गुणवत्तेला सातत्याची जोड नसली तर संधीही आपला हात सोडून निघून जाते. शफालीचं तसंच झालं.
शफालीच्या बॅटर म्हणून गुणवत्तेवर कुणी स्वप्नातही शंका घेणार नाही, पण सातत्य या एका गोष्टीत ती काठावरही पास व्हायला तयार नाही. त्याचा फटका तिला महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत बसला. पण माणूस यशापेक्षा अपयशातूनच जास्त शिकतो तसं शफालीचं झालं!
ती स्वत:ही मान्य करते की, डावाची सुरुवात उत्तम करूनही. बोर्डावर चांगला स्कोअर लावूनही मोठी खेळी खेळण्यात ती अपयशी ठरली. तिच्या पोतडीत फटके अनेक आहेत, पण आपले सगळे फटके एकावेळी काढायचे नसतात, चेंडू खेळायचा असतो. फटके प्रदर्शन करायचं नसतं, हे क्रिकेटचं मूलभूत तत्त्व विसरल्यासारखी ती मारण्याच्या नादात बाद होत गेली.
त्याच काळात ती टी-२० संघात तरी होती पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही मुलगी तग धरेल, असं काही निवडकर्त्यांना वाटेना. शेवटी विश्वचषक संघात तिला स्थान मिळालं नाहीच. तिच्या ऐवजी ज्या प्रतिका रावलला संधी देण्यात आली, तिनं आपल्या संधीचं सोनंच केलं. पण मेहनत करणाऱ्या गुणी माणसाला नशीब साथ देतं म्हणतात.
क्रिकेटनं शफालीला एक संधी देण्याचं ठरवलंच. प्रतिकाला दुखापत झाली आणि शफालीला पुन्हा संघात जागा मिळाली. संघातून डच्चू मिळाला तो काळ शफालीसाठीही तसा अवघडच होता.
एकदिवसीय क्रिकेटचा शेवटचा सामना ती तीन वर्षांपूर्वी खेळली. त्याचकाळात तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्याच काळात ती संघाच्याही बाहेर गेली. पण वडिलांनी तिला जे सांगितलं ते तिनं केलं, खेळावर फोकस कर!
आणि शफालीकडे संधी आली ती त्याच मेहनतीच्या जोरावर. अन्याय झाला म्हणत रडत न बसता तिनं देशांतर्गत स्पर्धा खेळल्या. टी-२० संघात आपलं स्थानही पक्कं केलं. आणि एक मंत्र कायमचा गाठीशी बांधला, ‘बॅटिंगवर फोकस‘!
जेव्हा संघाला उत्तम ओपनिंग बॅटरची गरज होती तेव्हा पुन्हा व्यवस्थापनानं शफालीला संधी दिलीच.. आता त्या संधीचं ती काय करते, हे पुढचं पुढे..