Guru Purnima 2025 : अकाली पोटची पोरं गेली, पतीचेही निधन झाले! झोकून दिलं स्वत:ला समाजासाठी
Updated:July 4, 2025 17:54 IST2025-07-04T15:45:45+5:302025-07-04T17:54:51+5:30
Guru Purnima 2025: Draupadi Murmu inspiring story, President of India : Guru Purnima 2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष अत्यंत प्रेरणादायी.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. भारतातील सर्वोच्च पदावर आज विराजमान आहेत. त्यांचं कर्तृत्त्व आणि जीवनसंघर्ष अत्यंत प्रेरणादायी. भारतात पहिल्यांदाच एक आदिवासी आणि महिला राष्ट्रपतीपदी आहे. भारतीय लोकशाहीचं हे यशही आहे की एका लहानशा आदिवासी खेड्यातली मुलगी जिद्दीने, हिमतीने आणि आपल्या कर्तबगारीने देशाची राष्ट्रपती होऊ शकली.
२० जून १९५८ ला ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या आदिवासी संथाल कुटुंबात द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. रामादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली. गरीबीचे चटके तर सोसलेच पण त्यांच्या गावातील महिला शिक्षण घेत नव्हत्या. त्यामुळे त्या गावातील महाविद्यालयात जाणारी आणि शिक्षण पूर्ण करणारी पहिली महिला ठरत त्यांनी आपल्यापाठीमागून येणाऱ्या मुलींसाठी एक वाट निर्माण केली.
ओडिशामधील सिंचन आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यकाची नोकरी त्यांना मिळाली. त्या ठिकाणी त्यांची भेट श्यामचरण मुर्मू यांच्याशी झाली. पुढे त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले-एक मुलगी झाली. मग त्यांनी ऊर्जा विभागातील काम सोडून गरीब-आदिवासी मुलांना मोफत शिक्षणही दिले.
१९९७ मध्ये त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश घेतला आणि रायरंगपूरच्या नगरसेविका झाल्या. पुढे आमदारही झाल्या. अभ्यासू विधानसभा सदस्य म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी सर्वोत्कृष्ट आमदार हा पुरस्कारही मिळाला होता.
मात्र २००९ साली द्रौपदी मुर्मूंच्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर पतीचेही निधन झाले. हे दु:ख भयंकर होते. दुर्देवानं दुसरा मुलगा सिपूनचेही एका अपघातात निधन झाले.
नवरा आणि मुलांच्या अकाली निधनाच्या दु:खातून सावरतच होत्या तर आई आणि भावाचाही मृत्यू झाला. नशिब त्यांची परीक्षा पाहत होतं. लेकीसाठी त्या जगत होत्या. दु:खातून सावरण्यासाठी त्यांनी ब्रह्मकुमारी या संस्थेत ताणमुक्ती, ध्यान यांचाही सराव केला.
आपलं दु:ख सावरत त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून दिले. हक्क अधिकारासाठी संघर्ष केला. एवढ्या मानसिक ताणातून गेल्यावर लोक म्हणत होते की कसं जगणार ही बाई! पण त्यांनी आपल्या जगण्याची परीक्षा देत समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतले. खूप दु:ख सोसले आणि इतरांसाठी कष्ट वेचले. त्यांचं सारं जीवनच प्रेरणादायी आहे.