Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
Updated:October 8, 2025 17:28 IST2025-10-08T17:20:19+5:302025-10-08T17:28:09+5:30
Divya Tanwar : अवघ्या २१ व्या वर्षी दिव्या आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांच्या नावाची देशभर चर्चा रंगली.

हरियाणाच्या दिव्या तंवर यांनी दाखवून दिलं आहे की, दृढ निश्चय असेल तर कोणतंही ध्येय अशक्य आहे. शेतमजुराच्या लेकीने गरिबी, जबाबदाऱ्या आणि संघर्षांमध्ये दोनदा यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे मोठं स्वप्न पूर्ण केलं.
हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील निंबी या छोट्याशा गावातील रहिवासी दिव्या तंवर यांनी स्वप्न साकार केलं. दिव्या यांचं बालपण संघर्षांनी भरलेलं होतं. २०११ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांची आई बबिता तंवर यांच्यावर आली.
आई दिवसरात्र काम करत होती. कपडे शिवत होती आणि चार मुलांचे संगोपन करत होती. परिस्थिती कठीण होती, पण आईने कधीही आपल्या मुलीचं शिक्षण थांबवू दिलं नाही.
दिव्या लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होत्या. सरकारी शाळेत आणि नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलं. आर्थिक अडचणी असूनही तिने विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. तेव्हापासून तिने काहीतरी मोठे साध्य करण्याचा दृढनिश्चय केला.
दिव्या यांचं स्वप्न यूपीएससी उत्तीर्ण होणं आणि देशाची सेवा करणं हे होतं. बहुतेक विद्यार्थी महागड्या कोचिंग सेंटरवर अवलंबून असताना, दिव्या ऑनलाइन क्लासेस आणि मॉक टेस्टच्या मदतीने स्वतः तयारी करायच्या.
स्वतःच नोट्स बनवल्या, दररोज तासनतास अभ्यास केला आणि अनेक गोष्टींवर काम केलं. आपल्या आईच्या कठोर परिश्रमाने आणि स्वतःच्या समर्पणाने त्यांना कधीही हार मानू दिली नाही.
२०२१ मध्ये, दिव्या यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ४३८ चा ऑल इंडिया रँक मिळवला. इतक्या लहान वयात यूपीएससी उत्तीर्ण होणे ही एक उल्लेखनीय कामगिरी होती.
अवघ्या २१ व्या वर्षी दिव्या आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांच्या नावाची देशभर चर्चा रंगली. गावकऱ्यांनी अभिमानाने "बबिताच्या मुलीने चमत्कार केला आहे" असं म्हटलं. पण दिव्या यांचा हा प्रवास तिथेच संपला नाही.
आयपीएस अधिकारी झाल्यानंतरही त्यांचं स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. २०२२ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि एआयआर १०५ मिळवला. दुसऱ्या प्रयत्नात तिने लेखी परीक्षेत ८३४ आणि मुलाखतीत १६० गुण मिळवले. एकूण ९९४ गुणांसह दिव्या आयएएस अधिकारी झाल्या.
दिव्या तंवर मणिपूर कॅडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून काम करतात. दृढनिश्चयाने आणि धैर्यासमोर कोणतंही आव्हान मोठं नसतं हे दिव्या यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.