Corona Virus : कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा
Updated:June 4, 2025 13:10 IST2025-06-04T12:51:40+5:302025-06-04T13:10:30+5:30
Corona Virus : फक्त मास्क लावणं आणि सोशल डिस्टंसिंग पुरेसं नाही. व्हायरससोबत लढण्यासाठी शरीर मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कोरोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढतं आहे. त्यामुळेच फक्त मास्क लावणं आणि सोशल डिस्टंसिंग पुरेसं नाही. व्हायरससोबत लढण्यासाठी शरीर मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते तेव्हा शरीर बाहेरच्या इन्फेक्शनशी चांगल्या प्रकारे लढू शकतं. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोरोनासारखे आजार टाळायचे असतील, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. ५ सोप्या आणि प्रभावी पद्धतीने तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता.
पौष्टिक आहार घ्या
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे संतुलित आहार. हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा, डाळी, दही यामध्ये शरीरासाठी आवश्यक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात.
व्हिटॅमिन सी (लिंबू, आवळा, संत्र) आणि व्हिटॅमिन डी (सूर्यप्रकाश) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पौष्टिक आहार हा निरोगी आरोग्यासाठी गरजेचा आहे.
नियमित व्यायाम करा
दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम, जसं की योगा, चालणे किंवा स्ट्रेचिंग करा. याने शरीर तंदुरुस्त राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. विशेषतः प्राणायाम आणि अनुलोम-विलोम हे फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यास मदत करतात.
पुरेशी झोप घ्या
रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगली झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते शरीराचं संसर्गापासून संरक्षण करतं. म्हणून झोपेची कमतरता नसावी.
हायड्रेटेड राहा
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या दिनचर्येत नारळ पाणी, हर्बल टी किंवा लिंबू पाणी समाविष्ट करा.
तणावापासून दूर राहा
जास्त ताणाचा रोग प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होतो. यासाठी मेडिटेशन, गाणी ऐका, आवडता छंद जोपासा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. मन शांत असणं आवश्यक आहे.
कोरोनासारख्या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी, केवळ बाहेरून खबरदारी घेण्यासोबतच स्वतःला आतून बळकट करणं देखील महत्त्वाचं आहे. हे ५ सोपे आणि नैसर्गिक उपाय तुम्हाला फक्त कोरोनापासूनच नव्हे तर इतर आजारांपासून देखील सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.