कामात बुडून जाणं पडेल महागात! ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने होतात 'हे' १० गंभीर आजार
Updated:January 21, 2025 15:17 IST2025-01-21T15:02:44+5:302025-01-21T15:17:14+5:30
जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम केल्याने कोणते गंभीर आजार होऊ शकतात त्याबाबत जाणून घेऊया...

आजकाल कामाचे जास्त तास आणि प्रोडक्टव्हिटी याबद्दलच्या चर्चा जोरदार आहेत. मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही.
काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम केल्याने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो.
जास्त वेळ काम केल्याने हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका देखील वाढतो. जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम केल्याने कोणते गंभीर आजार होऊ शकतात त्याबाबत जाणून घेऊया...
मानसिक कार्यक्षमता कमी होणं
जास्त वेळ काम केल्याने मानसिक कार्यक्षमता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत मानसिक थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. हे जास्त काळ केल्याने चिंता, नैराश्य सारख्या गंभीर मानसिक समस्यांचा धोका वाढतो.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
जास्त वेळ काम केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे अनेक रोग आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. दीर्घकाळापर्यंत ताणतणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत राहते.
झोपेच्या समस्या
जास्त वेळ काम केल्याने झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये निद्रानाश, दिवसाचा थकवा आणि झोपेशी संबंधित इतर समस्यांचा समावेश आहे. जर हे दीर्घकाळ चालू राहिले तर मानसिक कार्यक्षमता कमी होण्याचा, मनःस्थितीत बदल होण्याचा आणि अपघात होण्याचा धोका वाढतो.
हृदयाशी संबंधित आजार
जास्त वेळ काम केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त वेळ बसून राहिल्याने ताण येतो आणि शारीरिक हालचालींचा अभाव येतो, ज्यामुळे हे आजार होऊ शकतात.
स्नायू आणि सांध्याच्या समस्या
बसून जास्त वेळ काम केल्याने स्नायू आणि सांध्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांमध्ये पाठदुखी, मानेचा ताण आणि कार्पल टनेल सिंड्रोम यासारख्या तक्रारी दिसून आल्या आहेत.
पचनाच्या समस्या
जास्त वेळ काम केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, जसं की आयरिटेबल बाउल सिंड्रोम, अॅसिड रिफ्लक्स आणि पोटात अल्सर. ताणतणाव, खराब आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे या समस्यांचं कारण असू शकतात.
मूडमध्ये बदल
जास्त कामाचे तास तुमच्या मूडवर वाईट परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत चिंता, नैराश्य आणि चिडचिडेपणा येऊ लागतो. जर तुम्ही सतत जास्त वेळ काम करत असाल तर यामुळे थकवा, निराशा येऊ शकते.
मधुमेह
जास्त वेळ बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये टाइप २ मधुमेहाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर मधुमेही रुग्णांसाठी, जास्त वेळ काम केल्याने धोका वाढू शकतो. जास्त वेळ बसून राहणे, खराब आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मधुमेह, मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
प्रजनन समस्या
जास्त वेळ काम केल्याने प्रजनन समस्या उद्भवू शकतात, जसे की वंध्यत्व, गर्भपात आणि जन्मजात दोष. जास्त वेळ काम केल्याने ताण येऊ शकतो, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
अकाली वृद्धत्व
जास्त वेळ काम केल्याने सुरकुत्या, पांढरे केस आणि वयाशी संबंधित आजार यासारख्या वृद्धत्वाची लक्षणे अकाली दिसून येतात. ताणतणाव वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करू शकतो.