Join us

Gardening Tips: कमी खर्चात छोटीशी बाल्कनीही दिसेल आकर्षक; फॉलो करा 'या' बजेट फ्रेंडली टिप्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 13:03 IST

1 / 7
बाग केली, की तिची मशागत करणे ओघाने आले. गार्डनिंग अर्थात बागकाम करणे हा कोणाचा छंद असू शकतो तर कोणासाठी जबाबदारी! मात्र रोपट्यांची नीट काळजी घेतली नाही तर ती लवकर खराब होतात आणि बाल्कनीची शोभा जाते. यासाठी वेळेचे, जागेचे आणि कामाचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते कसे करायचे ते जाणून घेऊ.
2 / 7
छोट्याशा जागेचा पुरेपूर वापर करायचा असेल तर अस्ताव्यस्त मांडणी न करता रोपटी कशी रचून ठेवायची याचे पूर्वनियोजन करा. जसे की,बाल्कनीचे माप घ्या. तुम्हाला रोपांसाठी किती जागा हवी आहे, कोणते रोप कोणत्या रोपट्याच्या बाजूला ठेवले तर आकर्षक दिसेल, सूर्यप्रकाश कसा मिळू शकेल, सावलीत वाढतील अशी रोपटी यांची वर्गवारी करून घ्यावी. रोपट्यांची वाढ लक्षात घेता त्याला किती जागा सोडणे आवश्यक आहे याचाही अंदाज घ्या. चित्रकलेचे शिक्षक सांगायचे तसे, सगळीच जागा भरून टाकू नका, तर थोडी फार मोकळी जागा इतर गोष्टींचे महत्त्व जास्त अधोरेखित करेल हे लक्षात घ्या.
3 / 7
सध्या बाजारात अनेक आकर्षक आणि नानाविध आकाराच्या कुंड्या मिळतात. पूर्वी प्लास्टीक, पत्र्याचे डबे, बादल्या रोप लागवडीसाठी वापरले जात असे. आता आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार छोट्या, मोठ्या आकाराच्या, आकर्षक रंगाच्या कुंड्यांची निवड करता येते. जागा वाचवण्याच्या दृष्टीने काही कुंड्या गजाला अडकवता येतात तर काही लट्कवता येतात. शिवाय मोठ्या कुंड्या फळीवर, जमिनीवर आकर्षक पद्धतीने रचून ठेवता येतात. त्यासाठी तुम्ही वॉल प्लांटर्स, रेलिंग प्लांटर्स वापरू शकता किंवा स्टँडचा वापर करू शकता. बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासाठी, टेराकोटाची भांडी, सिरॅमिक आणि फंकी रिसायकल केलेले कंटेनर यासारख्या गोष्टीदेखील वापरता येतील. ज्यामुळे कमी खर्चात आकर्षक बाल्कनी मिळेल.
4 / 7
बागकाम करणे हे केवळ काम नाही तर मन आनंदी ठेवण्याचा सोपा उपाय आहे. नव्हे तर ती एक प्रकारही थेरेपी आहे. थेट निसर्गाच्या सान्निध्यात जाणे शक्य झाले नाही तरी बागकाम करण्याच्या निमित्ताने निसर्गाला आपल्या घरात आणता येते. 'नो स्क्रीनटाईम' साठी तर तो उत्तम पर्याय आहे. बागकाम करणे हे ध्यानधारणा करण्याइतकेच तना-मनाला तजेला देणारी प्रक्रिया आहे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. यासाठी बागकाम किचकट न करता आनंददायी कसे करता येईल आणि बाल्कनी आकर्षक कशी दिसेल यासाठी महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया.
5 / 7
पाणी, सूर्यप्रकाश आणि मातीच्या गरजेनुसार रोपट्यांची विभागणी करता येते. तसेच शोभेची फुलझाडं, सुवासिक फुलझाडं, औषधी फुलझाडं अशीही विभागणी करता येते. काही रोपटी आकर्षक नसतात पण त्याचे लाभ अनेक असतात. तर काही रोपटी नुसती आकर्षक असतात पण उपयोगी नसतात. त्यानुसार मांडणी ठरवता येऊ शकते आणि ती आकर्षक बनू शकते.
6 / 7
बाग तयार करूनही छोटीशी जागा उरत असेल तर तिथे एखादे टेबल खुर्ची मांडता येईल. त्यावर सुंदर कापड अंथरून फुलदाणी ठेवता येईल. तुम्हाला झोका आवडत असेल आणि जागा असेल तर सळीचे झोके किंवा सिंगल चेअर झोका लावून घेता येईल. भिंतीला जोडून आकर्षक दिव्यांची रोषणाई केली, जमिनीवर कार्पेट अंथरले तर छोटीशी जागा तुमच्या घराचा सुखद कोपरा होऊ शकेल.
7 / 7
तुमची बाल्कनी नीट नेटकी दिसावी यासाठी रोपट्यांची मांडणी त्यांच्या उंचीनुसार करावी. पुदिना, कोथिंबीर, ओवा यांसारखी रोपटी ट्रे मध्येही लावता येतात. तुळस, गुलाब, मोगरा ही माध्यम उंचीची रोपटी मधल्या फळीवर ठेवता येतात, तर केळी, कढीलिंब, जास्वंद ही मोठ्या उंचीची रोपटी मागे ठेवता येतात. आजूबाजूला आकर्षक वेली सोडता येतात. तुळशीजवळ एखादा लामण दिवा किंवा नंदादीप, उदबत्ती लावून बाल्कनीची छोटीशी जागा अधिक प्रसन्न करता येऊ शकते.
टॅग्स : बागकाम टिप्सगृह सजावटहोम अप्लायंसनिसर्गसाधना