1 / 7अनेकदा घाईघाईत कुकरमध्ये भात लावताना तो एकतर कच्चा राहतो, त्यात पाणी राहते किंवा चिकट होतो. हॉटेलमध्ये मिळणारा भात जसा सुटसुटीत आणि दाणेदार असतो, तसा घरी का होत नाही. असा प्रश्न अनेकांना पडतो. कुकरमध्ये भात शिजवणे म्हणजे ज्यात पाण्याचे प्रमाण आणि वाफेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. (Perfect Pressure Cooker Rice)2 / 7जर आपलाही भात चिकट होत असेल किंवा त्यात पाणी जास्त राहत असेल तर काळजी करु नका. आपण ५ सोप्या ट्रिक्स पाहूया. ज्यामुळे रोजचा भातही मऊ- मोकळा आणि सुटसुटीत होईल. (Non-sticky Rice Tips)3 / 7भाताचा चिकटपणा कमी करण्यासाठी त्यातील अतिरिक्त स्टार्च काढून टाकणं महत्त्वाचं आहे. तांदूळ हलक्या हाताने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवा. त्यानंतर तांदूळ किमान १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजवा. यामुळे तांदूळ पाणी शोषून घेतो आणि शिजवताना तुटत नाही. 4 / 7कुकरमध्ये भात लावताना १ कप तांदळासाठी २ कप पाणीचे प्रमाण ठेवा. तांदूळ जुना असेल तर थोडे जास्त पाणी लागू शकते. पण नवीन तांदळासाठी पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवायला हवे. पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी नेहमी वाटी किंवा कपाचा वापर करा. 5 / 7तांदूळ कुकरमध्ये शिजायला घालण्यापूर्वी त्यात अर्धा चमचा तूप किंवा तेल आणि ४ ते ५ थेंब लिंबाचा रस घालावा. तुपामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत आणि लिंबामुळे भात एकदम पांढराशुभ्र दिसतो. लिंबाच्या रसामुळे भाताची चव बदलत नाही. 6 / 7कुकरच्या शिट्ट्या किती करायच्या हे आपल्या गॅस फ्लेमवर अवलंबून असते. मध्यम आचेवर कुकरच्या ३ शिट्ट्या पुरेशा असतात. शिट्ट्या झाल्यावर लगेच कुकर उघडू नका. कुकरमधील वाफ आपोआप पूर्णपणे निघून जाऊ द्या. वाफेमध्येच भात शेवटपर्यंत शिजतो. ज्यामुळे तो मऊ पण मोकळा होतो. 7 / 7कुकर उघडल्यानंतर लगेच चमचा घालून भात हलवू नका. वाफेमुळे दाणे मऊ असतात. त्यामुळे ते तुटतात. कुकर उघडल्यानंतर ५ मिनिटे तसेच ठेवा. काट्याच्या चमच्याने कडेने भात हलक्या हाताने मोकळा करा. यामुळे वाफ बाहेर पडते.