श्रीखंड केलं पण चवीला आंबट आणि पातळ होतं? ८ टिप्स - विकतसारखे घट्ट, दाटसर श्रीखंड होईल छान...
Updated:October 16, 2025 14:38 IST2025-10-16T14:23:37+5:302025-10-16T14:38:14+5:30
tips to make thick shrikhand : how to make creamy shrikhand : delicious shrikhand recipe : perfect shrikhand at home : shrikhand making tips : श्रीखंड अगदी मलईदार, कमी आंबट आणि जाडसर व्हावे यासाठी खास टिप्स...

दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज यांसारख्या महत्त्वाच्या सणांना अनेक घरांमध्ये (shrikhand making tips) श्रीखंड-पुरीचा खास बेत केला जातो. बाजारात तयार श्रीखंड विकत मिळत असले तरी, घरच्याघरी तयार केलेल्या श्रीखंडाची चव, टेक्श्चर आणि सुगंध काही औरच असतो. पण, घरच्याघरी श्रीखंड तयार करताना अनेकींची दमछाक होते. श्रीखंड कधी खूप आंबट किंवा पातळ होत, इतकंच नाही तर दही योग्य प्रकारे घट्ट न झाल्यास, पाण्याचे प्रमाण जास्त राहिल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने साखर मिसळल्यास श्रीखंडाची चव बिघडते.
यासाठीच, यंदाच्या दिवाळीत श्रीखंड - पुरीचा बेत शंभर टक्के यशस्वी व्हावा (perfect shrikhand at home) आणि श्रीखंड अगदी मलईदार, कमी आंबट आणि जाडसर व्हावे यासाठी खास टिप्स पाहूयात...
१. श्रीखंडासाठी नेहमी ताजे, चवीला आंबट नसलेलं आणि फुल फॅट म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या दह्याचा वापर करावा. दही जेवढे ताजे असेल, तेवढे श्रीखंड चवीला गोड होईल. दही एक दिवस जुने झाल्यास आंबटपणा वाढू शकतो.
२. दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाकणे (चक्का तयार करणे) ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. दही एका स्वच्छ सुती कापडात घट्ट बांधून किमान ५ ते ६ तास लटकवा. चक्का तयार करण्याची ही प्रक्रिया फ्रिजमध्ये केल्यास दह्याचा आंबटपणा वाढत नाही आणि चक्का थंड राहतो.
३. श्रीखंड पातळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे चक्क्यात पाणी राहणे. ५ ते ६ तासांनंतरही चक्का थोडा दाबून त्यातील जास्तीचे पाणी देखील काढून टाका. चक्का जितका कोरडा असेल, तितके श्रीखंड घट्ट व दाटसर तयार होते.
४. श्रीखंड तयार करण्यासाठी नेहमीची दाणेदार साखर वापरू नका. त्याऐवजी नेहमी पिठीसाखर वापरा. श्रीखंड तयार करताना चक्का, पिठीसाखर आणि वेलची पावडर एकत्र मिसळा. यामुळे साखर लगेच विरघळते आणि श्रीखंडाला परफेक्ट चव आणि टेक्श्चर येते.
५. श्रीखंड मऊ आणि मलईदार करण्यासाठी ते हाताने किंवा विस्कने ५ ते १० मिनिटे चांगले फेटून घ्या. यामुळे श्रीखंडात हवा भरली जाते आणि ते अधिक हलके आणि मऊसूत होते.
६. श्रीखंड तयार झाल्यावर लगेच खाऊ नका. त्याला २ ते ३ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर श्रीखंड अधिक घट्ट आणि चविष्ट लागते.
७. केशर किंवा रंग वापरत असाल, तर ते गरम दुधात भिजवून थंड झाल्यावरच श्रीखंडात मिसळा. गरम दूध श्रीखंडात ओतल्यास ते पातळ होऊ शकते.
८. श्रीखंड तयार करताना चक्क्यात साखर, वेलदोड्याची पूड, केशर दुध यासोबतच २ टेबलस्पून मिल्क पावडर घाला देखील घालावी. मिल्क पावडरमुळे श्रीखंडाची कंसिस्टन्सी घट्ट राहते आणि आंबटपणा नियंत्रणात येतो हेच आहे परफेक्ट श्रीखंड तयार करण्याचे खरे सिक्रेट.