कोणताही पदार्थ तळण्याआधी लक्षात ठेवा ६ टिप्स, तेल कमी शोषतो - पदार्थ तेलकट होत नाही
Updated:October 9, 2025 14:34 IST2025-10-09T14:30:02+5:302025-10-09T14:34:48+5:30
Remember these 6 tips before frying any food, it absorbs less oil - the food does not become oily : तळणीचे पदार्थ करताना पाहा काय लक्षात ठेवायला हवे.

तळणीचे पदार्थ सगळेच आवडीने खातात. मात्र त्या पदार्थांत शोषले गेलेले तेल आरोग्यासाठी फार वाईट. वजन तर वाढतेच शिवाय घसाही खराब होतो. तळणीचे पदार्थ करताना या ६ टिप्स लक्षात ठेवा. पदार्थ तेल कमी पितो.
१. तेलाचे तापमान योग्य ठेवा:
तळणी करताना तेलाचे तापमान योग्य ठेवणे खूप महत्त्वाचे असते. तेल थंड असल्यास पदार्थ जास्त वेळ तेलात राहतो आणि जास्त तेल शोषतो, तर तेल खूप गरम असल्यास बाहेरुन करपतो आणि आतून कच्चा राहतो. योग्य तापमानासाठी तेलात छोटा तुकडा सोडून पाहावा, तो लगेच वर आला तर तेल योग्य तापलेले आहे असे ओळखता येते.
२. पदार्थात पाणी कमी ठेवा:
तळायच्या पदार्थातील आर्द्रता कमी असावी. पदार्थ तळण्यापूर्वी जरा कोरडे असावेत. भाज्या असल्यास त्यांना थोडा वेळ मीठ लावून ठेवल्यास त्यातील पाणी बाहेर पडते, ते पाणी काढून टाका. ओलसर पदार्थ जास्त तेल पितात आणि तेल उडतेही.
३. योग्य कोटिंग वापरा:
तळायच्या पदार्थावर योग्य पिठाचे कोटिंग केल्यास तो कमी तेल शोषतो. बेसन, तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर यांचे मिश्रण कोटिंगसाठी वापरल्यास पदार्थावर एक आवरण तयार होते जे तेल आत जाण्यापासून रोखते आणि पदार्थ कुरकुरीत ठेवते.
४. एकावेळी जास्त पदार्थ तळू नका:
तळताना एकावेळी जास्त पदार्थ तेलात घातल्यास तेलाचे तापमान अचानक कमी होते आणि त्यामुळे पदार्थ जास्त तेल पितात. म्हणून थोड्या थोड्या प्रमाणात तळणे नेहमीच योग्य ठरते.
५. तळून झाल्यावर तेल नीट निथळू द्या:
तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर किंवा जाळीदार प्लेटवर ठेवावेत, ज्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाते. तळलेले पदार्थ लगेच बंद डब्यात ठेवू नयेत, कारण त्यामुळे ओलसरपणा येतो आणि पदार्थ तेलकट होतो.
६. योग्य तेल निवडा:
तळणीसाठी योग्य तेल वापरणेही महत्त्वाचे आहे. कोणत्या पदार्थाचे तेल वापरता तसेच कोणत्या कंपनीचे वापरता याला फार महत्व असते. त्याचा दर्जा पाहून मगच तेल वापरावे. तळणीसाठी खोबरेल तेल उत्तम मानले जाते. तसेच शेंगदाण्याचे तेलही वापरतात.