Join us

कचरा समजून भोपळ्याच्या बिया फेकता? फायदे वाचाल तर कधीच फेकणार नाही!

By अमित इंगोले | Updated: May 9, 2025 14:02 IST

1 / 9
Pumpkin seeds benefits : भोपळा किंवा कोव्हळ्याची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात. ही भाजी टेस्टी तर असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भोपळा कापत असताना त्यातील पांढऱ्या बिया कचरा समजून जास्तीत जास्त लोक फेकून देतात. कारण अनेकांना या बियांचे फायदे माहीत नसतात. भोपळ्याच्या बिया इतक्या फायदेशीर असतात की, तुम्ही यापुढे कधीच फेकणार नाही. या बियांचे आरोग्याला काय काय फायदे होतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 9
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. म्हणजे तुम्हाला दिवसभर थकवा किंवा कमजोरी जाणवणार नाही.
3 / 9
कामाचा वाढता ताण, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचा ताण अशा इतरही अनेक कारणांनी अनेकांना रात्री चांगली झोप लागत नाही. अनेकांना रात्री झोपमोड होण्याची समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बिया नियमित खाल्ल्यानं झोपेसंबंधी इन्सोमेनियाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
4 / 9
डायबिटीसच्या रूग्णांनी भोपळ्याच्या बिया खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. कारण यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे टाइप 2 डायबिटीसमध्ये आराम देण्याचं काम करतं. तसेच या बियांमध्ये व्हिटामिन सी सुद्धा असतं जे डायबिटीसमध्ये रामबाण मानलं जाचं. यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
5 / 9
कोरोना काळ लोटून आता बराच वेळ गेला आहे. तेव्हापासून लोक इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यावर अधिक भर देतात. इम्यूनिटी बूस्ट झाल्यास वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटामिन ई आणि सी भरपूर असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
6 / 9
आजकाल लोकांवर कामाचं, परिवाराचं आणि आर्थिक प्रेशर खूप वाढलं आहे. ज्यामुळे लोक नेहमीच टेंशन आणि डिप्रेशनमध्ये असतात. मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी या भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर ठरतात. कारण यात मॅग्नेशिअम असतं ज्याने मेंदू शांत ठेवण्यास मदत मिळते. त्याशिवाय या बियांमध्ये झिंक आणि व्हिटॅमिन बी सुद्धा असतं ज्याने टेंशन दूर केलं जाऊ शकतं.
7 / 9
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भोपळ्याच्या बिया तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या बिया एक बेस्ट स्नॅक आहेत. कारण यातून तुम्हाला प्रोटीन आणि फायबर भरपूर मिळतं. ज्यामुळे भूक कंट्रोल होते. जास्त खाणंही टाळलं जातं. अशात तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
8 / 9
भोपळ्याच्या वाळवलेल्या बिया तुम्ही हलक्या भाजून थेट खाऊ शकता. तसेच तुम्ही सकाळच्या स्मूदीमध्ये मिक्स करूनही खाऊ शकता. इतकंच नाही तर भोपळ्याच्या भाजलेल्या बिया तुम्ही सलादसोबतही खाऊ शकता. तसेच सकाळी दही किंवा ओट्समध्ये टाकूनही खाऊ शकता. यावेळी बियांची टरफलं काढू नये याची काळजी घ्या. कारण त्यातही भरपूर पोषक तत्व असतात.
9 / 9
भोपळ्याच्या बिया खूप जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण जास्त खाल तर पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. इतकंच नाही तर मळमळ किंवा उलटीची समस्याही होऊ शकते.
टॅग्स : अन्नहेल्थ टिप्स