1 / 7गणपती अगदी काही दिवसांवर आहेत. काहींकडे पाच दिवसाचे तर काहींकडे अगदी बारा दिवसांचेही असतील. रोज प्रसादाला काय वेगळे करायचे असा प्रश्न पडतो का? घाईच्या वेळी नक्की काय करावे काय नाही अगदी गोंधळ उडतो. 2 / 7रोज काही तरी वेगळे खास करा. त्यासाठी पाहा कोणते पदार्थ आहेत जे करणे एकदम सोपे तर असतेच मात्र चविष्टही असतात. प्रसादासाठी गोडाचे पदार्थ करण्यासाठी तासंतास कष्ट घ्यायला लागतातच असे नाही. काही पारंपरिक रेसिपी आहेत ज्या मोजून पाच मिनिटांत होतात.3 / 7अगदी वेगळा आणि मस्त पदार्थ म्हणजे साखरेतला पपनस. या दिवसांमध्ये पपनस फार ताजा आणि मस्त गोड मिळतो. पपनस, साखर, नारळ असे मिश्रण तयार करुन ते प्रसादासाठी घ्यायचे. त्यात लिंबाचा रस पिळला तर चव फारच छान लागते. 4 / 7देवासमोर अनेक प्रकारची फळे ठेवली जातात. त्याचाच मस्त प्रसाद करता येतो. विविध फळे जसे की केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब यांचे लहान तुकडे करायचे आणि ते एकत्र करुन त्याला मीठ आणि साखर लावायची. जरा साखरेत मुरले की त्याला वेगळी चव येते. प्रसादासाठी नक्की करा. 5 / 7प्रसादासाठी भारतात खास केला जाणारा पदार्थ म्हणजे पंचामृत. पंचामृत ऐकल्यावर करायला कठीण असेल असे वाटले तरी अगदी सोपा पदार्थ आहे. दूध, दही, मध, साखर, तूप हे पाच पदार्थ एकत्र करायचे. शिवाय फार पौष्टिकही असते. 6 / 7नारळ-गूळाचे लाडू पटकन करता येतात. नारळ आणि गूळ मस्त तुपावर परतायचे एकदम मस्त खमंग परतल्यावर गार करत ठेवा आणि मग झटपट लाडू वळा. काही दिवस टिकतातही त्यामुळे आधीच करुन ठेवायचे. लहान लहान लाडू वळायचे. त्यात वेलची पूडही घाला. 7 / 7डेसिकेटेड कोकोनटचे लाडू करणे अगदी सोपे आहे. मोजून पाच मिनिटांत होतात. प्रसादासाठी उत्तम पदार्थ आहे. आजकाल डेसिकेटेड कोकोनट सगळीकडे आरामात मिळतो. साखर, दूध, मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट पाच मिनिटे परतायचे आणि मग गारकरुन त्याचे लाडू वळायचे.