भाजी खारट झाली तर घाबरु नका; करा 'हे' उपाय- मीठ जास्त पडल्याचं लक्षातही येणार नाही
Updated:November 11, 2024 12:53 IST2024-11-10T09:14:34+5:302024-11-11T12:53:20+5:30

भाजी, वरण, आमटी, कढी अशा पदार्थांत नकळतपणे जास्त मीठ पडतं आणि जेवणाची सगळी मजाच जाते.
अशा पद्धतीने मीठ जास्त पडलं म्हणून जेवणाचा पचका होऊ नये, यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा. कधी ना कधी त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील.
भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास कणकेचे घट्ट गोळे करा आणि ते भाजीत ठिकठिकाणी ठेवा. भाजीमध्ये थोडं पाणी टाका कढईवर झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करून कणकेचे गोळे भाजीतून काढून घ्या. मीठ बॅलेन्स होईल.
दुसरा उपाय म्हणजे कणकेच्या गोळ्यांऐवजी बटाट्याचे मोठमोठाले काप करून भाजीमध्ये टाकणे. हा उपाय करण्यासाठी बटाट्याची सालं काढून घ्या आणि कणकेचे गोळे ज्याप्रमाणे वाफवून घेतले, त्याप्रमाणेच बटाटेही वाफवून घ्या.
शक्य असल्यास भाजीमध्ये थोडी कांदा- टोमॅटोची परतून घेतलेली ग्रेव्ही किंवा दाण्याचा कूट घाला. यामुळेही खारट झालेल्या भाजीची चव अगदी परफेक्ट होईल.