पुलाव, बिर्याणी ओलसर होते, चिकट, गचका होऊन लगदाच होतो? ५ टिप्स - प्रत्येक दाणा दिसेल मोकळा,सुटसुटीत...
Updated:November 22, 2025 13:24 IST2025-11-22T13:09:17+5:302025-11-22T13:24:43+5:30
How to cook pulav & biryani without making it sticky : how to prevent rice from sticking : पुलाव किंवा बिर्याणीचा भात प्रत्येक दाणा सुटा, मोकळा आणि रेस्टॉरंटसारखा परफेक्ट करण्यासाठी खास टिप्स...

पुलाव किंवा बिर्याणी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो प्रत्येक दाणा (biryani without sticky rice) वेगळा असलेला, सुवासिक आणि मोकळा भात! पण अनेकदा आपण घरी पुलाव बनवतो तेव्हा तो चिकट, गचका (Mushy) किंवा जास्त ओलसर होतो, ज्यामुळे पदार्थाची चव आणि सौंदर्य दोन्ही कमी होते. उत्तम पुलाव बनवणे हे एक कला आहे, ज्यात पाण्याचे प्रमाण आणि तांदूळ हाताळण्याची योग्य पद्धत माहीत असणे महत्त्वाचे आहे.
घरच्याघरीच पुलाव किंवा बिर्याणी तयार करताना तो चिकट, ओलसर, गचका होऊ नये (How to cook pulav & biryani without making it sticky) म्हणून काही खास घरगुती टिप्स वापरता येतात. या टिप्सच्या मदतीने पुलाव किंवा बिर्याणीचा भात प्रत्येक दाणा सुटा, मोकळा आणि रेस्टॉरंटसारखा परफेक्ट तयार करु शकता.
१. योग्य तांदुळाची निवड :-
पुलाव किंवा बिर्याणीसाठी नेहमी बासमती तांदुळाचा वापर करा, कारण त्याचे दाणे लांब आणि मोकळे होतात. तांदूळ किमान ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. स्टार्चमुळेच भात चिकट, गचका होतो. तांदूळ किमान ३० मिनिटे थंड पाण्यात भिजवा. भिजवल्यामुळे तांदूळ एकसमान शिजतो आणि शिजवण्यापूर्वी हे पाणी काढून टाका.
२. पाण्याचे अचूक प्रमाण :-
पुलाव किंवा बिर्याणी करताना तांदूळ आणि पाण्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे असते. शक्यतो १ कप तांदुळासाठी १.५ कप पाणी किंवा तुम्ही वापरत असलेल्या तांदळाच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण कमी, जास्त ते ठरवा. जास्त पाणी वापरल्यास भात गचका होतो. पुलावमध्ये नेहमी गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्यास शिजण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते आणि भात चिकट होण्याची शक्यता कमी होते.
३. शिजवण्याची योग्य पद्धत :-
पुलाव भातासाठी मसाले आणि भाज्या परतून झाल्यावर भिजवलेला तांदूळ तेलात/तुपात हलक्या हाताने एक ते दोन मिनिटे परतून घ्या. यामुळे तांदळाच्या दाण्यांवर एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत. पाणी घालताना अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. आम्ल तांदळाचे दाणे तुटण्यापासून आणि चिकट होण्यापासून वाचवते.
४. भात शिजल्यानंतर :-
भात पूर्ण शिजल्यावर लगेच झाकण काढू नका. गॅस बंद केल्यावर झाकण न काढता १० ते १५ मिनिटे भाताला हलक्या वाफेवर तसेच राहू द्या. यामुळे अतिरिक्त वाफ शोषली जाते आणि भात मोकळा होतो. भाताला वाफ लागल्यावर भात लगेच चमच्याने ढवळू नका. नेहमी काटा चमच्याचा वापर करून भात हलक्या हाताने मोकळा करा, जेणेकरून त्याचे दाणे तुटणार नाहीत.
५. पुलावमधील भाज्यांचे पाणी भाताला चिकट करू शकते :-
साधारणपणे पुलाव, बिर्याणी करताना आपण त्यात टोमॅटो, मशरूम, गाजर, ढोबळी मिरची अशा विविध प्रकारच्या भाज्या घालतो. परंतु या भाज्या जास्त पाणी सोडतात. त्यामुळे, जर या भाज्या थेट तांदळात टाकल्या तर पुलाव ओलसर आणि चिकट बनू शकतो. म्हणूनच, या भाज्यांना आधी व्यवस्थित तेलात परतून घ्यावे यामुळे त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि पुलाव किंवा, बिर्याणी चिकट, गचका होणार नाही.