चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
Updated:November 8, 2025 17:32 IST2025-11-08T17:19:11+5:302025-11-08T17:32:26+5:30
सर्वजण मोठ्या आवडीने खात असलेले चॉकलेट आणि बिस्किट आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत आणि सर्वात धोकादायक काय हे जाणून घेऊया...

आजकाल लाईफस्टाईलमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. लोक आधी घरी बनवलेल्या जेवणावर जास्त फोकस करायचे आणि बाहेरचं कमी खायचे. पण आता लोकांना चॉकलेट आणि बिस्किट खायला जास्त आवडतं. पण हे दोन्ही आरोग्यासाठी धोकादायक आहे.
चॉकलेटमुळे लठ्ठपणा आणि शुगर वाढते, तर बिस्किटांमध्ये असलेले फॅट आणि रिफाइंड पीठाचा आरोग्याला जास्त धोका आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने खात असलेले चॉकलेट आणि बिस्किट आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत आणि सर्वात धोकादायक काय हे जाणून घेऊया...
चॉकलेट किती धोकादायक?
चॉकलेट पूर्णपणे वाईट नाही. तुम्ही कोणत्या प्रकारच्या चॉकलेटचं सेवन करता यावर ते अवलंबून असतं. मेडिकल न्यूज टुडेच्या एका रिपोर्टनुसार, डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लेव्होनॉल्ससारखे अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
काही अभ्यासात असंही आढळून आलं आहे की, डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. हे फायदे फक्त हाय कोको डार्क चॉकलेटमध्ये आढळतात. व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मिल्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण खूप कमी असतं.
चॉकलेटमध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असतं. मेडिकल रिपोर्ट्सनुसार, जास्त साखर आणि फॅट असलेल्या चॉकलेटचं जास्त सेवन केल्यास लठ्ठपणा, टाइप २ डायबेटीस आणि दाताच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
बिस्किटं किती धोकादायक?
बिस्किट हा जवळजवळ प्रत्येक घरातील एक सोपा नाश्ता आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका रिपोर्टनुसार, बाजारात विकले जाणारे बहुतेक बिस्किटे रिफाइंड पीठ, हायड्रोजनेटेड तेल आणि जास्त साखरेपासून बनवले जातात. ते ऊर्जा प्रदान करतात परंतु व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल्स यांसारख्या पोषक तत्वांचा अभाव असतो.
अल्ट्राह्यूमन ब्लॉगच्या रिपोर्टनुसार, बिस्किटांमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतं, ज्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढू शकते आणि भूक लागू शकते. या स्नॅक्सचं वारंवार सेवन केल्याने केवळ वजन वाढत नाही तर इन्सुलिन रेजिस्टेंस आणि हार्मोनल असंतुलन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
सर्वात धोकादायक काय?
सामान्य परिस्थितीत बिस्किटं ही चॉकलेटपेक्षा जास्त हानिकारक मानली जातात. कारण त्यात ट्रान्स फॅट, रिफाइंड पीठ आणि प्रिझर्वेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असतं. दुसरीकडे डार्क चॉकलेट मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास, त्यात कोकोचे प्रमाण असल्याने ते तुमच्या हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकतं.