भाऊबीजेला करा मराठवाडी चवीच्या झणझणीत वांग्याच्या भाजीचा बेत, घ्या अस्सल रेसिपी
Updated:October 22, 2025 12:35 IST2025-10-22T12:30:59+5:302025-10-22T12:35:01+5:30

भाऊबीजेला तुमच्या लाडक्या भावासाठी अतिशय चवदार अशी ही वांग्याची भाजी करून बघाच..
ही भाजी करण्यासाठी २ ते ३ मध्यम आकाराचे कांदे, २ ते ३ टेबलस्पून खोबऱ्याचे काप, अर्धा टेबलस्पून बडिशेप, अर्धा टेबलस्पून धणे आणि जिरे, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ इंच आल्याचा तुकडा, लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या, ६ ते ७ मध्यम आकाराचे वांगे, एक वाटी कोथिंबीर, ४ ते ५ हिरव्या मिरच्या असं साहित्य घ्या.
कांद्याची टरफलं काढून टाका गॅसवर भाजून घ्या. तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घालून खोबरे, लसूण, मिरची, आले, कोथिंबीर, दालचिनी, बडिशेप, जिरे, धणे असं सगळं एकेक करून तळून घ्या.
यानंतर भाजून झालेले कांदेही तळून घ्या. कांदे आणि तळून घेतलेले इतर पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. यानंतर हे वाटण वांग्यामध्ये भरून घ्या आणि भरलेले वांगे थोडा वेळ वाफवून घ्या.
यानंतर त्यामध्ये बाकीचे राहिलेले वाटण, गरम मसाला, कोमट पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून भाजी मंद आचेवर शिजू द्या. सगळ्या शेवटी गॅस बंद करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झणझणीत वांग्याची भाजी तयार.