Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फक्त १० रुपयांत होईल दह्याचं फर्स्टक्लास फेशियल! टॅन, निस्तेज त्वचाही दिसेल सुंदर - ५ मिनिटांत येईल चमचमता ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 18:05 IST

1 / 6
उन्हाळा आला की शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांकडे आपला कल आपोआपच वाढतो आणि त्यातही दही हा सर्वात उत्तम पदार्थ मानला जातो. दही केवळ खाण्यासाठीच नाही, तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही तितकंच फायदेशीर आहे. नैसर्गिक कूलिंग एजंट असलेलं दही त्वचेला हायड्रेशन देतं, टॅनिंग कमी करतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करतं. यंदाच्या उन्हाळ्यात महागड्या पार्लर ट्रीटमेंटऐवजी घरच्याघरीच दह्याचं फेशियल केल्यास कमी खर्चात सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळू शकते(easy curd facial for glowing skin at home).
2 / 6
कोणत्याही फेशियलची सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे 'क्लींजिंग'. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर 'फेस क्लींजर' म्हणून करू शकता. एका वाटीत दोन चमचे घट्ट दही घ्या. हे दही संपूर्ण चेहऱ्याला लावून किमान २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. मसाज पूर्ण झाल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. दह्याने क्लींजिंग केल्यामुळे त्वचेवर साचलेली धूळ, माती आणि डेड स्किन सहज निघून जाते. यामुळे तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ आणि टवटवीत होतो.
3 / 6
चेहरा स्वच्छ केल्यानंतरची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे 'स्क्रबिंग'. फेशियलचा हा दुसरा टप्पा असून उन्हाळ्यात तो अत्यंत आवश्यक असतो, कारण कडक उन्हामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढते. एका वाटीत दोन चमचे दही आणि एक चमचा कॉफी पावडर एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. हे तयार झालेले थोडे खडबडीत मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटे अगदी हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. दही आणि कॉफीच्या या स्क्रबमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते आणि डेड स्किन सहज निघून जाते. तसेच, उन्हामुळे त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग कमी होण्यासही मोठी मदत होते.
4 / 6
फेस स्क्रबिंग केल्यानंतर फेशियलची पुढची आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप म्हणजे 'चेहऱ्याचा मसाज'. उन्हाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी ही स्टेप खूपच फायदेशीर ठरते. एका वाटीत २ चमचे दही घ्या. त्यात १ चमचा मध आणि १ व्हिटॅमिन 'ई' ऑईल कॅप्सूल मिक्स करा. हे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि ५ ते ८ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार दिशेत (Circular Motion) मसाज करा. मसाज पूर्ण झाल्यावर चेहरा साध्या पाण्याने धुवा. दह्याचा हा मसाज तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनवतो. तसेच, यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.
5 / 6
फेशियलची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे 'फेस पॅक'. हा पॅक लावल्यामुळे त्वचेची छिद्रे घट्ट होतात आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. एका वाटीत दोन चमचे दही, दोन चमचे बेसन आणि एक चमचा टोमॅटोचा रस घ्या. हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याची एक स्मूथ पेस्ट तयार करा. हा तयार झालेला पॅक आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि १५ ते २० मिनिटे सुकू द्या. पॅक पूर्णपणे सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा पॅक लावल्यामुळे उन्हामुळे काळवंडलेली त्वचा साफ होते आणि मऊमुलायम बनते. टोमॅटो आणि बेसनामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होऊन त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
6 / 6
अनेकदा कोणताही घरगुती उपाय किंवा फेशिअल केल्यानंतर त्वचा थोडी कोरडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फेसपॅक धुतल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि कोरडेपणा वाढत नाही. जर तुमची त्वचा ड्राय असेल, तर तुम्ही मॉइश्चरायझरमध्ये थोडे कोरफडीचा गर किंवा खोबरेल तेल मिक्स करून लावू शकता. जर तुमची त्वचा ऑयली असेल, तर तुम्ही हलके मॉइश्चरायझर किंवा गुलाब पाण्याचा वापर करू शकता.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी