डॉ. स्वाती गानू (समुपदेशक)
दहावीची परीक्षा झाली. आता फुल टाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा मुलांचा प्लॅन असूच शकतो. वर्षभर क्षणाचीही उसंत न घेता अविरतपणे झपाटल्यासारखं दहावीचा अभ्यास अनेक मुलं करतात. पण दहावीची परीक्षा झाली की भलीमोठी सुट्टी वाट्याला येते. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर रिकामपण जाणवू लागतं. व्हिडीओ गेम्स, रील्स, चॅट आणि बाकी सारंही करून करून किती वेळ करणार? मध्येच रिझल्टची आठवण येऊन पोटात फुलपाखरं उडतात. अनेक मुलांना आणि पालकांनाही हा प्रश्न पडतोच की, आता या सुट्टीत करायचं काय?मुलांचा माइंडसेट तयार करणं, काही कौशल्य शिकणं यासाठी ही सुट्टी अतिशय महत्त्वाची. मोलाचा वेळ हाताशी असतो. भविष्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या नवीन गोष्टी शिकण्यासाठीही खूप महत्त्वाचा असतो. योग्य प्रकारे हा वेळ वापरला तर योग्य करिअरची दिशा मिळू शकते.
दहावीच्या सुट्टीत मुलांना काय करता येईल?
१) सर्वप्रथम एक कागद आणि पेन घ्या. एक यादी तयार करा. ज्यातून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करता येतो.मला काय आवडतं? मी कोणत्या गोष्टीत चांगला/चांगली आहे? हे लिहून काढायचं. खरंखुरं. काहींना विज्ञान आवडतं, काहींना कला, तर काहींना व्यवसाय क्षेत्र. यासाठी इंटरनेटवर छोट्या छोट्या ॲप्टिट्यूड टेस्टही देऊन पाहू शकता. पालकांशी बोलून आवडीनिवडीचा विचार करु शकता.
२) नवीन कौशल्य शिकणं. कोडिंगची सुरुवातही करू शकता. यूट्यूब किंवा फ्री ऑनलाइन कोर्सच्या, एआयच्या मदतीने हे सहज शक्य आहे.
३) संवाद कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स): इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये नीट बोलता येणं खूप महत्त्वाचं आहे. इंग्रजी बोलण्याचा उत्तम सराव करा.
४) चांगली पुस्तकं वाचल्याने ज्ञान वाढतं आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. या सुट्टीत आपण काय काय वाचणार, हे ठरवा.
५) वेळेचं नियोजन (टाईम मॅनेजमेंट) शिकणं आवश्यक. तेही आता ऑनलाइन सहज शिकता येईल, सराव करता येईल.
६) लहान लहान प्रोजेक्ट्स करा. उदाहरणार्थ, एखादा सायन्स एक्सपरिमेंट, छोटा व्यवसाय, वस्तू बनवून विकणं, बागकाम. यामुळे सृजनशीलता वाढते आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळते.
७) शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी. दररोज व्यायाम करा, योगा करा किंवा खेळा. मेडिटेशन शिकून घ्या. त्यानं मन शांत राहतं आणि लक्ष केंद्रित होतं.
८) सामाजिक कामात भाग घ्या. आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, किंवा तुम्हाला योग्य वाटतील ते उपक्रम करा.
९) TED Talks म्हणजे छोटे पण खूप प्रभावी व्हिडीओ असतात, ज्यात जगातील तज्ज्ञ लोक त्यांचे अनुभव आणि कल्पना शेअर करतात. हे व्हिडीओज साधारण १०-१५ मिनिटांचे असतात आणि खूप प्रेरणा देणारे असतात, तुम्हाला आवडत्या विषयातले टेडटॉक पाहा. TED-Ed हे छोटे विषय शिकवणारे व्हिडीओ पाहा. सोप्या भाषेत अवघड विषय समजतात.
१०. Coursera सारख्या साइट्सवर अनेक कोर्सेस मोफत करता येतात.
११. सुट्टीचा सदुपयोग करत स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांशी तुलना करू नका. उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त वेळ घालवण्याची नाही, तर स्वतःला घडविण्याची संधी आहे.
Web Summary : Post-10th grade, students can explore interests, learn skills like coding, improve communication, read books, and manage time. Projects, health, social work, TED Talks, and free courses offer self-improvement opportunities. Believe in yourself and utilize time effectively.
Web Summary : 10वीं के बाद, छात्र रुचियाँ तलाशें, कोडिंग जैसे कौशल सीखें, संचार सुधारें, किताबें पढ़ें और समय का प्रबंधन करें। परियोजनाएँ, स्वास्थ्य, सामाजिक कार्य, टेड वार्ता और मुफ्त पाठ्यक्रम आत्म-सुधार के अवसर प्रदान करते हैं। खुद पर विश्वास रखें और समय का सदुपयोग करें।