अश्विनी बर्वे (मुक्त पत्रकार)
“दहावी, बारावीत गेलेल्या मुलांच्या पालकांची परीक्षा सुरू झाली, शांतता महत्त्वाची आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणारे फोन घ्यायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे संपर्क करू नये.”नातेवाईक, मित्रमैत्रिणींना मी असे स्पष्टच बजावले आहे.माझी एक मैत्रीण मलाही स्पष्टच सांगत होती. खरंतर मूल आठवीत गेले की, तेव्हापासूनच तिने बरेच ऐकले होते.लोक काय कमी सल्ले देतात का, अनेकांनी तिला सांगितलं, ‘आठवी हा दहावी-बारावीचा पाया आहे. नीट लक्ष दे मुलांकडे, समजून घे, अभ्यास कर.’म्हणजे आजकाल परिस्थिती अशी की, पालकसुद्धा मुलांबरोबर त्या-त्या इयत्तेत जातात आणि अदृश्य रूपाने त्यांच्याजवळ सतत बसलेले असतात. आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून काही म्हणजे काहीही सुटू नये, अशी त्यांची अपेक्षा असते, हट्ट असतो. पालकांच्या या पॅनिक होण्याच्या स्वभावापायी मुलं मग अनेक गोष्टी त्यांच्यापासून लपवायला शिकतात.
मुलांनी अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावेत, अशी पालकांची इच्छा असणे चूक नाही; पण ती जबाबदारी मुलांची आहे आणि आपण त्यांना लहान वयापासून ती शिकवायला हवी, मुळात जबाबदारी कशी घ्यायची, हे आपल्या वर्तनातून मुलांना दाखवायचे आहे, हेच पालक विसरलेले असतात. बहुतांश वेळा पालक मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी स्वत: घेतात आणि त्यात इतके अडकतात की, मुलांनी परीक्षेत काही प्रश्न सोडून दिले तर घरात मोठमोठ्याने रडारड होते. आई-वडील आपलंच काहीतरी चुकलं असं वागू लागतात.खरंतर पालकांनी अभ्यास कसा करावा, याचा मार्ग मुलांना दाखवावा; पण त्यांचा अभ्यास त्यांना करू द्यावा. आपण करू नये.मूल कोणत्याही इयत्तेत असो त्याचे शिक्षण होते आहे का, हे पाहावे. शिक्षण होणे म्हणजे त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देणे, भरपूर मार्क्स मिळवणे नाही, तर ज्या क्षमतांचा उपयाेग व्यक्तीच्या आयुष्याची उभारणी होण्यासाठी होतो अशा क्षमता आणि कौशल्य संपादन करणं. त्या क्षमता आणि कौशल्य संपादन करण्याची संधी पालकांनी दिली पाहिजे. असं म्हणतात की, तुमचे मूल तुम्हाला ज्या दिशेला जावे असे वाटते त्या दिशेला आधी तुम्ही गेलं पाहिजे.
दहावी-बारावीच्या परीक्षाकाळातही पालकांनी हे लक्षात ठेवायला हवे की, परीक्षा त्यांची आहे, आपली नाही. आपली प्रतिष्ठा म्हणजे मुलांचे मार्क नव्हे.आजकाल अनेक पालकांना हे मान्य असतं की मुलांना मारू नये; पण आपण मुलांना भावनिक मारपीट करत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांनी केलेली लहानशी चूकही मोठी केली जाते. थोडेसे मार्क कमी मिळवले तरी ‘तुझ्यामुळे माझी समाजात नाचक्की झाली’ असं ऐकवलं जातं. ‘तू माझ्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही, तू बावळट ध्यान आहे, म्हैस आहे, बैल आहे,’ अशी असंख्य वाक्ये पालकांच्या शब्दकोशात असतात.पालकांचे मुलांच्या परीक्षेच्या वेळी बीपी वाढतो. पित्त वाढल्याच्या अनेक तक्रारी येतात. कारण ही आपली परीक्षा नाही हेच पालकांना मान्य नसते. मुलांना त्यांच्या हिशेबाने अभ्यास करू द्यावा आणि स्वतः शांत राहावे. आपली अभ्यास करण्याची वेळ गेली आहे आता मुलांना त्यांच्या कलाने अभ्यास परीक्षाचे चक्र अनुभवू द्यावे. मुळात हे लक्षात घ्यावे की, अभ्यास कसा करावा, तो स्वतंत्रपणे स्वत:चा स्वत: करावा हे आधीपासूनच मुलांना शिकवले नसते तर ऐन दहावीच्या परीक्षेवेळी त्याच्या अभ्यासाची जबाबदारी घेऊन काय फायदा. निदान आता तरी मुलांना त्यांचं ते पाहतील म्हणून स्वत:च्या मनानं अभ्यास करू द्यावा.शांत राहावे, सोबत असावे हे बरे.
पालकांनी काय करावं?
पालक म्हणून आपण काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत.१. कोणी माझ्या मुलाचे कौतुक करत असेल तेव्हा मी उदासीन असतो/असते का? की ते यश माझंच मानते/मानतो?२) माझ्या मुलाची मला बऱ्याचदा लाज वाटते का? विशेष करून मार्क्स कमी मिळाल्यावर, त्याला अपयश आल्यावर?३) दुसऱ्या मुलांशी किंवा मुलांच्याच भावंडांशी मी मुलाची/मुलीची सतत व उगीचच तुलना करीत असते/असतो का?४) मला नावडत्या असणाऱ्या इतर कोणातरी व्यक्तीच्या काही लकबी, स्वभाव माझ्या मुलात आहे असे मला वाटते का? त्याचा मला त्रास होतो का?५) मी मुलावर सतत रागावत असते का? माझ्या अपेक्षा मुलांनी पूर्णच करायला हव्या म्हणून त्यांच्या मागे लागते का?उत्तर काय..असे अनेक प्रश्न आहेत; पण या पैकी जास्त प्रश्नाची उत्तरे जर होकारात्मक असतील तर पालक म्हणून तुम्ही स्वतःला सावरायला हवं. स्वतःत बदल करायला हवा. तुमचे पालकसुद्धा तुम्हाला असे बोलत असतील कदाचित, तुम्ही बोलणी खाऊन आता काहीतरी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असाल कदाचित; पण ही साखळी इथेच तुटायला हवी. मुलांसोबत संवादाची आणि समजुतीची साखळी बांधली गेली पाहिजे. मुख्य म्हणजे आपलं मूल ही स्वतंत्र व्यक्ती आहे. आपण त्यांना मदत करायची आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल असं वागून आणि शांत राहून त्यांच्या विकासाला हातभार लावायचा आहे. आणि आपलं मूल आपलं प्रगती पुस्तक नाही हे मान्य करून त्यांच्यावर प्रेम करायचं आहे.
Web Summary : Parents should support children during exams, not pressure them. Focus on their overall development and skill-building, not just marks. Avoid comparisons and emotional manipulation. Encourage independence and open communication to foster confidence and well-being. Remember, your child is an individual, not a report card.
Web Summary : परीक्षाओं के दौरान माता-पिता को बच्चों का समर्थन करना चाहिए, दबाव नहीं डालना चाहिए। केवल अंकों पर नहीं, बल्कि उनके समग्र विकास और कौशल-निर्माण पर ध्यान दें। तुलना और भावनात्मक हेरफेर से बचें। आत्मविश्वास और कल्याण को बढ़ावा देने के लिए स्वतंत्रता और खुले संचार को प्रोत्साहित करें। याद रखें, आपका बच्चा एक व्यक्ति है, रिपोर्ट कार्ड नहीं।