Join us  

Parenting Tips : मुलं हट्टी झाली तर चिडू नका; करा 4 गोष्टी, हट्टीपणा होईल कमी मुलांचाही-पालकांचाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 6:01 PM

Parenting Tips : मुलांचा हट्टीपणा काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी पालक म्हणून आपण काही गोष्टी निश्चितच करु शकतो. त्या कोणत्या हे पाहूयात...

ठळक मुद्देमन वळवण्याचा प्रयत्न केलात तर त्यांचा हट्ट कमी व्हायला नक्कीच मदत होईल.मुलं हट्ट करायला लागली तर आपण त्यांच्यावर चिडण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार व्हायला हवा

ऋता भिडे

लहान मुलं आणि त्यांचा हट्टीपणा ही तमाम पालकवर्गाची नेहमी असणारी तक्रार आहे. मूल ऐकतच नाही, अमुक एक ऐकायचं असेल तर तमुक गोष्ट कर असं करुन पालकांनाच वेठीस धरतात. त्यांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय कॉमनपणे विचारले जाणारे प्रश्न. मुख्यत: मुलं हट्टीपणा का करतात, हट्टीपणा करतात म्हणजे काय? (Parenting Tips) त्याचे काय परिणाम होतात यांविषयी समजून घेणे महत्त्वाचे आहे. मूल हट्टीपणा करायला लागले की आपण एकतर त्याला ओरडतो किंवा सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे मारतो. आपण म्हणत असलेली गोष्ट त्याने गपचूप ऐकावी यासाठी आपला आटोकाट प्रयत्न सुरू असतो. 

(Image : Google)

पण दुसरीकडे मुलाला आपले म्हणणे काही केल्या ऐकायचे नसते. अशा या द्वंद्वामुळे घरातील वातावरण बिघडते आणि त्याचा घरातील इतरांवरही नकळत परिणाम होतो. त्यामुळे मूल हट्टीपणा करायला लागले की नेमके काय करायचे हे पालकांना माहित असायला हवे. म्हणजे परिस्थिती बिघडण्याऐवजी सुधरु शकते. “आई  मला आत्ताच्या आत्ता चॉकोलेट हवं आहे किंवा मला अजून टी .व्ही बघायचाय नाहीतर मी तुझं काहीच ऐकणार नाही, आता मला तू अभ्यास करायला लावलास तर नंतर मी अमुक गोष्ट करेन असे धमकी वजा हट्ट हल्ली मुलं करताना दिसतात. मुलांचा हट्टीपणा काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी आपण पालक म्हणून काही गोष्टी निश्चितच करु शकतो. त्या कोणत्या हे पाहूयात...

१. पालक व मुलं यांच्यातील संवांद महत्वाचा 

जर पालक किंवा घरातील कोणतीही व्यक्ती मुलांनी मागितलेली गोष्ट लगेच आणून देत असेल किंवा न मागताच वरचेवर मुलांना सहज गोष्टी मिळत असतील तर मुलांचा हट्ट वाढू शकतो. इतरांचं बघूनही काही मुलं एखादी गोष्ट हवी म्हणून हट्ट करतात. आपण ती गोष्ट दिली नाही तर तो किंवा ती  समोरच्याकडे ती वस्तू मागेल या भितीने अनेकदा पालक एखादी गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे आपण काहीही मागितलं तरी आपल्याला मिळतं असा मुलांचा समज होऊ शकतो. काही वेळा पालक बघ त्याच्यापेक्षा तुला आणलेलं जास्त छान आहे असंही मुलांना सांगतात, त्यामुळे इतरांपेक्षा मला नेहमीच सगळ्या चांगल्या गोष्टी मिळायला हव्यात यासाठी मुलांचा हट्ट चालू होतो. नकळत त्यांच्यात एक स्पर्धा चालू होते आणि मग सातत्याने काही ना काही मागण्याची सवय लागते.

२. मागेल ते लगेच मिळेल असे नको

बऱ्याचदा घाईच्या वेळात घरातील छोटी छोटी कामे आपण मुलांना सांगतो आणि म्हणतो तू हे काम केलस तर मी तुला अमुक गोष्ट देईन. आपल्याही नकळत आपण  त्यांना समोरच्याचे ऐकल्यावर काहीतरी मिळते अशी सवय लावतो. कित्येक मुलांना मित्रांबरोबर खेळताना त्यांच्याकडे आहेत तसेच्या तसे खेळ हवे असतात. आता अशावेळी काय करावे हे पाहूया. मुलांनी एखादी गोष्ट मागितली की त्याची खरंच गरज आहे का ह्याचा विचार करा, ती गोष्ट मुलांना सुद्धा समजावून सांगा. त्या वस्तू ऐवजी त्यासारखी दुसरी कोणती वस्तू आपल्याकडे आहे याचा विचार करा. मुलांचं कौतुक म्हणुन जर एखादी गोष्ट त्यांना दिलीत तर ती का दिली आहे ह्याबद्दल त्यांना सांगा. आपल्याकडे कोणी आलं तर पैशाचं पाकीट देण्याची पद्धत आहे हेच पैसे साठवून त्या पैशांमधून एखादी उपयोगी वस्तू कशी आणता येईल याबद्दल मुलांशी बोला. म्हणजे नकळत मुलांनाही सेव्हिंगची सवय लागेल .

३. हट्ट पुरवायला मर्यादा ठेवा

मुलाचे कोणते हट्ट पुरवायचे आणि कधी याला काही मर्यादा घालून घ्या. बऱ्याचदा माझ्या लहानपणी मला हे मिळाल नाही म्हणून माझ्या मुलाला त्याने मागितलं की लगेच द्यायला हवं यावर थोडं नियंत्रण ठेवा. एखादी गोष्ट आपण मागत आहोत ती आपल्याला त्वरित मिळवून घेण्यासाठी काहीवेळा मुलं मुद्दामहून हट्ट करतात. अशावेळेस काहीही प्रतिक्रिया न देता त्यांना प्रतिसाद द्या. काही गोष्टी आपणहून समजण्याची त्यांना सवय होऊ द्या . 

(Image : Google)

४. पर्याय द्या 

मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीसाठी आपणही काही काळ थांबणार आहोत ते त्यांना सांगा. तुला एखादी गोष्ट मिळेल पण लगेच नाही त्या ऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळं काय करू शकता हे त्यांना सांगा. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलात तर त्यांचा हट्ट कमी व्हायला नक्कीच मदत होईल.

rhutajbhide@gmail.com

टॅग्स :पालकत्वलहान मुलं