अकबराने बिरबलाला बोलावून घेतले. बिरबलाला उशीर झाला. अकबराने जाब विचारला. बिरबलाने मुलांच्या हट्टाचे कारण पुढे केले. तेव्हा अकबर म्हणाला, मुलांना सांभाळणे कठीण नाही. त्यावर बिरबलाने एक दिवस मूल बनून अकबराला पालक होण्यास सांगितले. अकबराने होकर दिला. बिरबलाने उसाचा हट्ट केला. अकबराने गाडाभर ऊस मागवला. बिरबलाने उसाचे कर्वे मागितले. अकबराने ते तोडून दिले. बिरबलाने तोच ऊस अक्खा खाण्याचा हट्ट धरला. अकबराने समजूत काढली, बिरबल ऐकेनासा झाला. अकबराला चूक कळली. बालहट्ट सोपा नाही हे त्याने मान्य केले. ही गोष्ट बालपणी आपण ऐकली आणि आता प्रत्यक्ष जीवनात ती अनुभवत आहोत. आताच्या मोबाईल युगातली पिढी आणि त्यांचे हट्ट पुरवता पुरवता त्यांना संस्कारक्षम बनवणे ही पालकांसाठी तारेवरची कसरत असते. एका व्याख्यानात आयएस अधिकारी डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी याच विषयावर मार्गदर्शन केले आहे.
डॉ. विकास म्हणतात, 'मुलांना सांभाळणे सोपे नाही, शिकवणे त्याहून सोपे नाही आणि संस्कारक्षम बनवून भावी नागरिक म्हणून घडवणे ही पालकांसाठी मोठी परीक्षा असते. यासाठी पालकांनी काही बाबतीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पूर्वी आपले पालक लाड, प्रेम आणि धाक याबाबतीत संतुलन ठेवून असायचे. बाबांचा धाक असायचा, त्यामुळे अनेक गोष्टी आईशी मोकळेपणाने बोलल्या जात होत्या. परिणामी मागची पिढी संतुलित विचारांची घडली.
'ए बाबा' म्हणण्याचा ट्रेंड आल्यापासून वडील आणि मुलांमधले अंतर कमी झाले ही आनंदाची बाब असली तरी दुसरीकडे मुलं पालकांना ऐकेनाशी झाली. आई जवळची असतेच म्हणून आणि बाबा लाड करतो म्हणून! मुलांवर धाक कोणाचा नसला की स्वाभाविकच ते बिघडतात. डॉ. विकास सांगतात, घराघरातील संवाद खुंटत चालला आहे. आई वडील दोघेही कामात व्यग्र असल्यामुळे मुलांना आपले मन मोकळे करता येत नाही. वाढत्या वयात अनेक प्रकारच्या ऐकीव माहितीमुळे मनात संभ्रम निर्माण होतो. मुलांना लागणाऱ्या वस्तू देऊन पालक मोकळे होतात, जबाबदारी संपल्यासारखे वागतात. मात्र पाल्याला गरज असते, भावनिक आधाराची. आई किंवा बाबा दोघांपैकी एकाकडे तरी तो मिळावा अशी त्याची अपेक्षा असते. ज्या घरात मूल त्याच्या बाबतीत वाईटात वाईट चूक मोकळेपणाने घरात बोलून व्यक्त होते, त्या घरातले वातावरण निरोगी आणि संस्कार क्षम पिढी घडवण्यासाठी अनुकूल असते असे समजावे.
दिवसभरात थोडा वेळ तरी मुलांना द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांचे कुठे चुकतेय हे योग्य शब्दात सांगा, एखादी मोठी गोष्ट घडली असेल आणि त्यातून त्यांना सावरायचे असेल तर 'हे आमच्याही बाबतीत घडले', 'त्यातून आम्ही कसे शिकलो', 'आमची प्रगती कशी झाली', 'पालकांचा ओरडा कसा मिळाला' हे सांगून त्यांना धीर देण्याची नितांत गरज असते. जेव्हा पाल्याला आपल्या पालकांशी बोलताना कोणताही विषय त्याज्य वाटत नाही तेव्हा पालक सुजाण पालकत्त्व निभावत असल्याची ती खूण समजावी.
मुलांना धाकात ठेवू नये, पण त्यांच्या मनात पालकांबद्दल आदरयुक्त भीती असावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे असेल तरच मुलं उद्धटपणे बोलणार नाहीत किंवा नैराश्यात जाणार नाहीत. घरातले वातावरण आनंदी राहील आणि पुढची पिढी चांगली घडेल.