lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुलगा शिक्षणासाठी घराबाहेर पडला, माधुरी दीक्षितही टेन्शनमधे! डॉक्टर नेने सांगतात 6 गोष्टी

मुलगा शिक्षणासाठी घराबाहेर पडला, माधुरी दीक्षितही टेन्शनमधे! डॉक्टर नेने सांगतात 6 गोष्टी

शिक्षणासाठी बाहेरगावी एकट्यानं राहाणारी मुलं आपलं खाणं पिणं, झोपणं उठणं, स्वत:ची काळजी घेणं हे कसं सांभाळतील याची काळजी आईला वाटणं साहजिकच. तशी काळजी अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही वाटली. पण डॉ. श्रीराम नेने म्हणतात 6 गोष्टी जमल्या तरच मुलं जबाबदारीनं आणि आत्मविश्वासानं एकटी राहू शकतील. काय आहेत त्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 08:13 PM2021-12-15T20:13:34+5:302021-12-16T17:52:37+5:30

शिक्षणासाठी बाहेरगावी एकट्यानं राहाणारी मुलं आपलं खाणं पिणं, झोपणं उठणं, स्वत:ची काळजी घेणं हे कसं सांभाळतील याची काळजी आईला वाटणं साहजिकच. तशी काळजी अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही वाटली. पण डॉ. श्रीराम नेने म्हणतात 6 गोष्टी जमल्या तरच मुलं जबाबदारीनं आणि आत्मविश्वासानं एकटी राहू शकतील. काय आहेत त्या?

Madhuri Dixit was in tension when Arin live alone for education... Dr. Shriram Nene tell 6 skills for teenagers who live long from their parents. | मुलगा शिक्षणासाठी घराबाहेर पडला, माधुरी दीक्षितही टेन्शनमधे! डॉक्टर नेने सांगतात 6 गोष्टी

मुलगा शिक्षणासाठी घराबाहेर पडला, माधुरी दीक्षितही टेन्शनमधे! डॉक्टर नेने सांगतात 6 गोष्टी

Highlightsमुलांना हिशोब करणं, आपल्याकडील पैसे योग्य रीतिने खर्च करणं, पैसे आणि गरजा याचा ताळमेळ लावता येणं जमायला हवं.ऐनवेळी आलेल्या अडचणीला सामोरं जातांना कशी मदत मागायची हे मुलांना जमायला हवं.एकटे राहाण्यातल्या स्वातंत्र्याचा अर्थ आणि ते उपभोगताना असणारी जबाबदारी याची जाणीव मुलांना असणं गरजेचं.

 मुलं मोठी झाली की बर्‍याचदा त्यांना शिकायला बाहेरगावी जावं लागतं. तिथे ग्रूपने किंवा एकट्यानं राहावं लागतं. शिक्षण, स्वत:ची काळजी हे सर्व त्यांना एकट्यानं सांभाळावं लागतं. अशा परिस्थितीत आपल्या मुलाला हे जमेल का? तो एकट्यानं कसं निभावून नेईल याचं जास्त टेन्शन मुलग्यांच्या आयांना येतं. हे फक्त सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं आणि आयांच्या बाबतीतच घडतं असं नाही तर सेलिब्रेटी असलेल्या आईलाही ही काळजी असते. अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमधे ही काळजी व्यक्त केली.

Image: Google

झालं असं की माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा अरिन हा कॉलेजला शिकत असून तो कॅलिफोर्नियाला असतो. पण अरिन जेव्हा एकटाच कॅलिफोर्नियाला राहाणार या विचारानं माधुरीच्या पोटात काळजीचा खड्डा पडला. माधुरी ही लहानाची मोठी भारतात झाली. इकडे मुलं मोठ्यांच्या सहवासात मोठी होतात. मुलांच्या बर्‍याचशा गोष्टी घरातील मोठी माणसं मॅनेज करुन घेतात. पण परदेशात मुलांना त्यांना कळू लागल्यापासूनच स्वतंत्र राहायला शिकवतात. त्यांना त्यांच्या वयानुसार जबाबदार्‍या घ्यायला आणि निभवायला शिकवतात. त्यामुळे ही मुलं जेव्हा बाहेर शिकायला एकटी राहातात तेव्हा त्यांना बर्‍याच गोष्टी एकट्यानं जमवून आणणं माहीत असतं. त्यांना एकट्यानं वागण्या वावरण्याचा आत्मविश्वास असतो. माधुरीची दोन्ही मुलं परदेशात वाढली आहेत. तरीही एक भारतीय आई म्हणून माधुरीला काळजी वाटली आणि तिनं ती शेअर केली.

एक आई म्हणून माधुरीनं व्यक्त केलेली काळजी , मनातली घालमेल प्रत्येक आईला स्पर्शून जाणारी आहे. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. काळजी वाटणं, घालमेल होणं हे ठीक पण भविष्यात आपली मुलं बाहेर शिकायला जातील, त्यांना एकट्यानं राहावं लागेल याचा विचार आधीच करुन मुलग्यांच्या आई बाबांनी मुलांकडून काही प्राथमिक गोष्टींची तयारी आधीच करुन घ्यायला हवी असं माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने म्हणतात. अरिनला एकट्यानं राहाताना शिकवलेल्या गोष्टी इतर किशोरवयीन मुलग्यांच्या पालकांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी त्या सार्वजनिकही केल्या. त्यांच्या मते काही गोष्टी मुलांना आधीपासूनच शिकवल्या, त्यांना त्याबाबत जाणीव करुन दिली तर मुलं एकट्यानं आत्मविश्वासानं आणि जबाबदारीनं राहू शकतात.

Image: Google

किशोरवयीन मुलं आणि गरजेची कौशल्यं

1. शिकायला म्हणून मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांना त्यांच्याकडे असलेले पैसे हाताळावे लागतात. शिकणं, राहाणं, खाणं पिणं आणि थोडी मौज मजा अशा गोष्टींमधे त्यांना त्यांचा खर्च विभागायचा असतो. ही विभागणी चुकली तर पैसे पुरत नाही. असं होवू नये म्हणून मुलांना आधीपासूनच पैशांचा हिसोब कसा ठेवायचा, आपल्या गरजा आणि आपल्याकडे असलेले पैसे यात ताळमेळ कसा बसवायचा, आपल्या महिन्याच्या बजेटवर कसं लक्ष ठेवायचं याचं कौशल्य आई बाबा मुलांना शिकवू शकतात. अर्थात हे तोंडी सांगून जमत नाही. त्यासाठी मुलांकडे पैसे देणं, त्यांना बाजारहाट करायला पाठवणं, त्यांनी केलेल्या खर्चाचा हिशोब मागणं, आपल्या घराच्या गरजा, उपलब्ध बजेट , पैसे आणि गरजांची तोंडमिळवणी आपण कसे करतो, काय अनुभव येतात, अडचणी काय येतात, त्यातून आपण कसा मार्ग काढतो याबाबत आई बाबांनी मुलांशी बोलायला हवं.

2. मुलं एकट्यानं राहातात तेव्हा स्वत:च्या गोष्टींची काळजी त्यांनाच घ्यावी लागते. कपड्यांची स्वच्छता कशी ठेवावी, नीटनेटकेपणा कसा राखावा, कपड्यांना इस्त्री कशी करावी या गोष्टी त्यांना जर आधीच येत असतील तर बारीक सारीक गोष्टींसाठी त्यांना बाहेर पैसे मोजावे लागत नाही. हे सर्व न जमल्यामुळे एकटे राहाताना येणारा अव्यवस्थितपणा टाळला जातो.

Images: Google

3. बाहेर मुलं शिकायला गेली की आधी चांगली मेस पाहून त्यांना घरगुती जेवण कसं मिळेल याची आई बाबा काळजी घेतात. पण काही अडचणींमुळे एखाद्या दिवशी मुलांना डबा मिळत नाही. अशा वेळेस बाहेर पोटाला अयोग्य असं काही बाही न खाता घरातल्या घरात सोपे पण पौष्टिक पदार्थ करुन कशी भूक भागवता येते हे मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी मुलांना वरण भात , पोहे, उपमा, दलिया, पौष्टिक खिचडी कशी करायची हे शिकवायला हवं. एखाद्या दिवशी मुलांनाच जेवणातला एखादा पदार्थ करायला लावून मुलांना प्राथमिक पाककौशल्याचे; महत्त्वाचं म्हणजे उदरभरणाचे धडे देता येतात.

4. लैंगिक गोष्टींबाबत किशोरवयीन मुलांशी बोलायला पालक अजूनही कचरतात. पण पालक जर कचरले तर मग एकट्यानं राहाणार्‍या मुलांना याबाबतची त्यांची जबाबदारी कशी कळेल. म्हणून मुलं मोठी होत असताना त्यांच्या वयानुसार आवश्यक ते शारीरिक आणि लैंगिक गोष्टींबाबत मोकळा संवाद साधायला हवा. वयानुसार शरीर मनात, भावनात होणारे बदल, ते कसे ओळखावेत, कसे हाताळावेत याबाबत मुलांशी घरात चर्चा व्हायला हवी. कोणी आपल्याला आवडू लागलं तर ते आकर्षण कसं हाताळावं हे मुलांना तेव्हाच जमेल जेव्हा आई बाबा लैंगिक गोष्टींबाबत मुलांशी मोकळेपणानं बोलतील.

Image: Google

5. एकट्या राहाणार्‍या मुलांना त्यांच्या गरजेनुसार पैसे दिलेले असले तरी ऐनवेळी पैशाच्या किंवा इतरही काही अडचणी उभ्या राहू शकतात. अशा अडचणींना सामोरं जातांना मुलांना कोणाची तरी मदत लागते. मुलांना मदत तेव्हाच मिळते जेव्हा त्यांना ती योग्य व्यक्तीकडे योग्य रितीने व्यक्त करता येते. मदत मागणं, त्याद्वारे अडचण सोडवणं हे देखील एक कौशल्य आहे. त्यासाठी मुलांना नम्र भाषेतला संवाद साधता येणं गरजेचं आहे. ही नम्रता, वागण्यातील अदब मुलांकडे असेल तर एकट्यानं राहाताना ती अडचणीच्या काळात मदत करणारी माणसं स्वत:साठी शोधू शकतात. संवाद कौशल्य मुलांमधे विकसित होण्यासाठी घरात मुलांसोबत हसत खेळत मोकळा संवाद होणं गरजेचं आहे.

6. मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर एकटी राहू लागली किंवा आई वडिलांपासून लांब समवयस्कांसोबत राहू लागली की त्यांना घरच्या बंधनातून मुक्त झाल्यासारखं वाटतं, आता आपण मुक्त, आपल्यावर काहीच बंधणं नाहीत असं मुलांना वाटतं. पण मुलांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कळाला तरच ते स्वातंत्र्य जबाबदारीने हाताळू शकतील. यासाठी मुलांना एकटं राहातांना आपली वेळेत झोपण्याची, वेळेत उठण्याची, नीटनेटकेपणा ठेवण्याची, खाण्यापिण्याची, बरं नसलं तर स्वत:ची काळजी कशी घ्यायची याबाबतच्या जबाबदारीची जाणीव मुलांना आधीच असली तर मुलं जबाबदारीनं राहातात, इतरांशी देखील जबाबदारीनं वागतात.

Web Title: Madhuri Dixit was in tension when Arin live alone for education... Dr. Shriram Nene tell 6 skills for teenagers who live long from their parents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.