Join us  

चुकीच्या आहारामुळे मुलांची उंची होतेय कमी, संशोधकांचा दावा- खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयींमुळे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2023 4:11 PM

Know How Junk Food Affect on Your Hight : चुकीचा आहार, जंक फूड-वेळी अवेळी खाणे याचा थेट परिणाम मुलांच्या वाढीवर होत असल्याचा अभ्यासकांचा दावा

आहार हा आपल्या एकूण आरोग्याशी निगडीत असणारा अतिशय महत्त्वाचा घटक असतो हे आपल्याला माहित आहे. आरोग्य उत्तम ठेवायचं तर चांगला आहार घेणे गरजेचे असते. आहारामुळे शरीरातील हाडं, पेशी आणि सर्व अवयवांचे पोषण होते. चुकीचा आणि जास्त प्रमाणात आहार घेतला तर वजनावर त्याचा परीणाम होतो हे आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे जर आहारात जंक फूड जास्त प्रमाणात घेतले तरी त्याचेही शरीराला तोटे होतात. या तोट्यांमध्ये एका गोष्टीची भर पडली आहे ती म्हणजे जंक फूडमुळे उंचीची वाढ होण्यात अडथळे निर्माण होतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

(Image : Google)

मुलं अनेकदा बिस्कीटं, वेफर्स, ब्रेड यांसारख्या गोष्टींवर तुटून पडतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर चुकीचा परीणाम होतो. उंची ही आपल्या अनुवंशिकतेवर आणि एकूण पोषणावर अवलंबून असली तरी ब्रिटनने गेल्या काही वर्षात खानपानाच्या बाबतीत अमेरीकन ट्रेंडचा अवलंब केला. यामुळे लठ्ठपणाच्या समस्येमध्ये तर वाढ झालीच पण जास्त कॅलरीज आणि अपुरे पोषण यामुळे मुलांच्या उंचीवरही त्याचा परीणाम झाला. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील चाइल्ड ग्रोथ एक्सपर्ट प्राध्यापक टिम कोल यांनी त्याबाबत काही निष्कर्ष मांडले. विविझ आजारांचे संक्रमण, ताणतणाव आणि झोपेची गुणवत्ता यामुळेही उंची वाढण्यावर परीणाम होत असावा असे मत त्यांनी मांडले.   

यामुळे युरोपियन मुलांच्या तुलनेत ब्रिटनमधील मुलांची उंची ७ सेंटीमीटरने कमी असल्याचे या अभ्यासात मांडण्यात आले आहे. जागतिक स्तरावर होणाऱ्या हाइट रँकींगमध्ये ब्रिटन खाली घसरले असल्याचे यामुळे दिसून आले आहे. ग्रोथ हार्मोन्ससाठी आवश्यक असणारे झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमसारखे घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळत नसल्याने अशी अवस्था झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलांना योग्य वयात योग्य आहार दिला तरच त्यांचे वजन, उंची आणि एकूण शारीरिक वाढ चांगली होते. जंक फूड जीभेला चांगले लागत असले तरी त्यातून शरीराला आवश्यक ते घटक मिळत नाहीत, त्यामुळे जंक फूडचा आहारातील समावेश बंद किंवा शक्य तितका कमी करावा.

टॅग्स :पालकत्वलहान मुलंजंक फूड