Join us  

नववी-दहावीतली मुलं सतत दारं लावून खोलीत बसतात, आईबाबांपासून नक्की काय लपवतात, का चिडतात??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 4:50 PM

वयात येणाऱ्या मुलांना त्यांची स्पेस द्या असं म्हणणं योग्य की नवीन फॅड?

ठळक मुद्देआपल्या स्पेसचं स्वातंत्र्य घेताना आपल्या स्पेसचा जबाबदारीने वापर करणं हे जमायला हवं.

ईरा सारखी काय बेडरुममध्ये बसलेली असतेस? जरा चारचौघात येवून बस! घरात आलेल्या गेलेल्यांशी जरा बोल! इंदू ईराच्या वागण्याने वैतागलेली होती. आई वैतागली की ईराही चिडायची. 'आई मला घरात माझी काही स्पेस आहे की नाही?' ईराच्या या प्रश्नाने इंदूचा संताप आणखीनच वाढायचा. आत्ताशी नववीत गेली तर हिला हिची स्पेस हवी. एवढं मोठं घर आहे. आणि ही काय सारखी स्पेस स्पेस करतेय हेच इंदूला कळायचं नाही. शाळेतून आलं की थेट आपल्या बेडरुममध्ये. घरी मैत्रिण आली तर तिलाही आपल्या बेडरुममध्ये घेवून बसणार. इंदूला ईराच्या या वागण्याची काही टोटलच लागत नव्हती. पण आई आणि मुलीमध्ये 'स्पेस वाॅर' मात्र सुरुच होतं.एकदा इंदूची मैत्रिण अंजू घरी आली होती. ती काउन्सलर होती. कधीतरी ईराबद्दल अंजूशी बोलायला हवं असं इंदूला वाटायचंच. अंजूशी बोलता बोलता इंदूने ईराचे विषय काढलाच. ईराचं बदलेलं वागणं, तिचं स्पेस पुराण हे सगळं एका दमात सांगून टाकलं. एवढ्याशा मुलीला कशाला हवी स्वत:ची स्पेस सांग बरं? असा प्रश्न इंदूने विचारल्यावर अंजूला इंदूचं नेमकं दुखणं कळलं. तासनतास बेडरुममध्ये बसून आपली मुलगी काय करते याचं टेन्शन आई म्हणून इंदूला येणं स्वाभाविकच. पण या टेन्शनमुळे ईराची स्वत:च्या स्पेसची गरज नाकारणं हे मात्र अंजूला योग्य वाटत नव्हतं.मग अंजूने ईराच्या स्पेसची गरज इंदूला समजावून सांगितली.

(Image : google)

मुलांनाही स्पेस का हवी असते?१. स्पेसचा मुद्दा येतो तिथं लहान मोठं असं काही नसतं. प्रत्येकालाच त्याची त्याची स्पेस हवीच असते. आणि त्यात कोणी लुडबूड केली तर जसा मोठ्यांना राग येतो तसाच लहान मुलांनाही येणं स्वाभाविकच आहे.२. ईराला घरात जिथे 'कम्फर्टेबल' वाटतं तिथे ती जास्त वेळ राहते. अभ्यास करणे, चित्र काढणे, मैत्रिणींना घेवून बसणे या गोष्टी ती तिथे करते. ती तिची स्पेस आहे. तिच्या स्पेसमध्ये तिला मोकळेपणाने वागता येतं.३. स्पेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. स्पेस म्हणजे स्वातंत्र. स्पेस म्हणजे मोकळीक. अशी मोकळीक आणि स्वातंत्र्य असलं म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मुलांना त्यांची स्पेस असली की मुलं खुलतात, आनंदी राहातात.४. अंजूने जसं इंदूला स्पेसबद्दल समजावून सांगितलं तसंच ईरालाही स्पेसचं स्वातंत्र्य अनुभवताना त्यातल्या जबाबदारीविषयी समजावून सांगितलं. आपल्या स्पेसचं स्वातंत्र्य घेताना आपल्या स्पेसचा जबाबदारीने वापर करणं हे जमायला हवं. ते जमलं तरच आई-बाबांनाही विश्वास वाटेल. 

मुलांची स्पेस गरज आणि स्पेसच्या स्वातंत्र्यातील जबाबदारी याबाबत अधिक वाचाhttps://urjaa.online/kids-wants-their-own-space-but-why-why-parents-cant-understand-need-of-kids-space/

टॅग्स :पालकत्वलहान मुलं