Join us  

Parenting Tips: पालकांच्या 4 सवयींमुळेच मुलं होतात हट्टी आणि चिडचिडी, बघा या सवयी तुम्हाला तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 5:06 PM

Why kids become stubborn: मुलं ऐकतंच नाहीत, खूपच हट्टी झाली आहेत, अशी तक्रार करणारे पालक आज खूप आहेत. पण का झाली आहेत मुलं अशी, त्यासाठी पालकच तर जबाबदार नाहीत ना?

ठळक मुद्देमुलांमधला  हट्टीपणा वाढवण्यासाठी पालकांना असलेल्या काही सवयी कारणीभूत ठरत आहेत.

अगदी ५- ६ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते कॉलेज गोईंग मुलांपर्यंत प्रत्येकाच्याच पालकांची तक्रार असते की मुलं ऐकतंच नाहीत. 'खूपच हट्टी झाली आहेत...', 'त्यांना पाहिजे ती गोष्ट आणून दिल्याशिवाय ते काही शांतच होत नाहीत..' अशी वाक्ये २- ४ पालक एकत्र आले की हमखास कानावर पडतात. बरं मुलांचा हा हट्टीपणा खाण्यापिण्याच्या बाबतीत पण असतोच. वारंवार जंकफूडचा आग्रह, भाजी- पोळी असं व्यवस्थित जेवण्याचा कंटाळा या सगळ्या गोष्टींमुळे पालक वैतागतात आणि जोपर्यंत सगळं मनासारखं होत नाही, तोपर्यंत मुलं चिडत (stubborn kids) राहतात. मुलांमधला  हट्टीपणा वाढवण्यासाठी पालकांना असलेल्या काही सवयी कारणीभूत ठरत आहेत.(parenting tips)

 

१. अतिलाडआजकाल बऱ्याच घरात एक किंवा दोनच मुलं असतात. लहानपणी मुलांच्या मागण्याही कमी आणि पालकांना चटकन पुरविता येतील अशा असतात. त्यामुळे मग मुलं लहान असताना मुलांनी मागायचं आणि पालकांनी त्यांना लगेच आणून द्यायचं, असं बऱ्याच घरात दिसतं. लगेचच्या लगेच मुलांसमोर त्यांना हव्या त्या सगळ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या प्रमाणात आणून देण्याची सवय पालकांनीच त्यांना लावलेली असते. हीच सवय मुलं मोठी झाली की जड जाते. त्यामुळे मुलांनी जे मागितलं ते लगेच दिलं अशी तुमची सवय आधी सोडून द्या.

 

२. जबाबदारी न टाकणेअनके पालक आपल्या मुलांना अगदीच अलगद ठेवतात. खरंतर मुलांना त्यांच्या वयानुसार काही कामे सांगितली पाहिजेत आणि करूही दिली पाहिजेत. जेणेकरून त्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होत असतो. पण आजकाल पालक मुलांना कोणतेही काम सांगत नाहीत. काम सांगितले तरी त्याला स्वत:च्या मनाप्रमाणे ते करू देत नाहीत. प्रत्येक गोष्टीत त्यांना सूचना देतात. मुलांनी आपल्याप्रमाणे ते परफेक्ट करावं अशी त्यांची अपेक्षा असते. या अवाजवी अपेक्षांमुळे मग मुले वैतागतात आणि काम करणे टाळू लागतात. त्यामुळे मुलांना काहीतरी काम द्या आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने ते करू द्या. यातून त्यांना त्यांची जबाबदारी कळेल.

 

३. मुलांना वेळ न देणंआजकाल दोन्हीही पालक वर्किंग असतात. त्यामुळे आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही, हा गिल्ट आधीच त्यांच्या मनात असतो. हा गिल्ट घालविण्यासाठी मग ते मुलांच्या प्रत्येक अपेक्षा पुर्ण करण्याचा आणि मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. यातुनही मुलांचा हट्टीपणा वाढत जातो. त्यामुळे तुमचा गिल्ट घालविण्यासाठी मुलांच्या अनाठायी अपेक्षा पुर्ण करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ द्या. 

 

४. शिस्त लावामुलांना मोकळेपणाने वाढू देणे, त्यांना जे हवे ते करू देणे, मुळीच न रागवणे, हा नवाच ट्रेण्ड आता हल्लीच्या पालकांमध्ये दिसतो आहे. हा काही अंशी बरोबर असला तरी काही बाबतीत मुलांना शिस्त पाहिजेच. पालकच मुलांना शिस्त लावण्यात कमी पडले तर मुले त्यांना हवी तशी वाहवत जाणारच.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं