सायली कुलकर्णी, सायकॉलॉजिस्ट
भूकंप, पूर, महामारी, युद्ध किंवा स्थलांतर… कधीही न विसरता येणाऱ्या या संकटांचा जगभरातील मानव जातीने अनेकदा सामना केलेला आहे. अशा आपत्तीजनक प्रसंगांमध्ये घरं तुटतात, माणसं हरवतात… या सगळ्यात मनालाही खोलवर जखमा होतात. यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त WHO ने “मानवी संकटांतील मानसिक आरोग्य” (Mental Health in Humanitarian Emergencies) ही संकल्पना विचारार्थ ठेवली आहे. ही संकल्पना वाचताक्षणीच मनात विचार आला की मानसिक आरोग्य हा विलास नव्हे, ती एक मूलभूत गरज आहे. हे आता जगभरात मान्य आहे. ह्युमॅनिटेरियन इमर्जन्सी म्हणजे अशी आपत्ती जिथं अनेक लोकांचे जीवन धोक्यात येते. जसे की पूर, भूकंप, युद्ध किंवा महामारी… अशा वेळी फक्त शरीराचंच नाही, तर मनाचंही संरक्षण गरजेचं असतं. म्हणूनच या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आपल्याला सांगते की मानवी संकटांमध्ये मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व द्या.
आपत्ती शरीराएवढाच आघात मनावरही मनातही करते
आपत्कालीन प्रसंगात तात्काळ शारिरीक मदत पोहोचते. अन्न, पाणी, आसरा मिळतो. पण मनातली भीती, गोंधळ, अपराधीपणा आणि असुरक्षितता मात्र बराच काळ शांत होत नाही. वाचलेल्यांच्या मनात सतत प्रश्न असतो मी का वाचलो?, आता पुढे काय? मग हे भावनिक धक्के हळूहळू नैराश्य, झोप न लागणे, घबराटीचे झटके किंवा पोस्ट- ट्रॉमॅटिक स्ट्रेस यामध्ये बदलताना दिसतात. म्हणूनच अशा प्रसंगी शारिरीक प्रथमोपचार जितका महत्त्वाचा असतो तितकाच मानसिक प्रथमोपचारही महत्त्वाचा ठरतो.
मानसिक प्रथमोपचार (Psychological First Aid) म्हणजे काय?
शारिरीक जखमांवर जशी प्रथमोपचाराची गरज असते, तशीच आपत्तीग्रस्तांना मानसिक प्रथमोपचाराची गरज असते. हा उपचार औषधांचा नसतो. तो संवादाचा आणि संवेदनांचा असतो. प्रथमोपचाराची छोटी छोटी पावलं देखील मोठ्या आघातांपासून वाचवू शकतात. कोणीतरी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, तुम्ही सुरक्षित आहात असं सांगणं, श्वासोच्छ्वास नियंत्रण, विश्रांतीचे उपाय शिकवणं, गरज असेल तर समुपदेशकांशी संपर्क साधून देणं.. अशा पद्धतीने मानसिक प्रथमोपचार होऊ शकतात.
भावनिक सुरक्षितता निर्माण करणे महत्त्वाचे!!
आपत्तीनंतर उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये “विश्रांतता कोपरे” म्हणजेच Calm Corners तयार केले जाऊ शकतात. विश्रांतता कोपऱ्यांमध्ये लोकांना मनातील बोलता येईल, रडता येईल आणि स्वतःच्या भावना मोकळ्या करता येतील. अशा प्रसंगात “तुम्ही एकटे नाहीत” अशी वाक्यंसुद्धा औषधाएवढीच उपयुक्त ठरतात. मानसिक आरोग्य हा केवळ वैयक्तिक मुद्दा नाही; तो सामूहिक पुनर्बांधणीचाही भाग आहे. आपत्ती नंतर गटचर्चा, सामूहिक ध्यान, चित्रकला, संगीत किंवा कहाणी सांगणे अशा उपक्रमांमुळे लोक परत जोडले जातात. त्यांच्यातील आशेचा भाव पुनर्जिवंत होतो. समुपदेशकांच्या मदतीने अशा कार्यक्रमांमधून “भावनिक पुनर्बांधणी” सुलभ होऊ शकते.
आपत्तीपूर्व मानसिक तयारीची ड्रिल्स का नसावीत?जसे आपण भूकंप सराव किंवा आपत्कालीन ड्रिल्स करतो, तसेच “मानसिक तयारी” कार्यक्रम शाळा समुदाय स्तरावर घेणे आवश्यक आहे. यामध्ये भीतीचे व्यवस्थापन, एकमेकांना आधार देणे आणि भावनिक संवाद वाढवणे ही आपत्तीपूर्व तयारीची महत्त्वाची पावले आहेत. त्याचा सराव नक्कीच करता येईल.आजपर्यंतच्या अनेक आपत्तींनी आपल्याला नक्कीच सांगितले आहे की, माणुसकी सर्वात महत्त्वाची. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवं की आपत्ती फक्त घरं उध्वस्त करत नाही, ती मनंही मोडते. म्हणून पुनर्बांधणी केवळ विटा- सिमेंटची न करता, भावनांचीही करणे तितकेच गरजेचे आहे.
सायली कुलकर्णी, सायकॉलॉजिस्ट सृजन सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग सेंटर, बावधन, पुणे 83299 63972
Web Summary : World Mental Health Day 2025 focuses on mental health in humanitarian emergencies. Disasters impact minds, causing distress. Psychological first aid, creating safe spaces, and community support are crucial for emotional recovery and resilience. Prioritizing mental well-being is essential during rebuilding efforts.
Web Summary : विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस 2025 मानवीय आपदाओं में मानसिक स्वास्थ्य पर केंद्रित है। आपदाएँ मन पर असर डालती हैं, जिससे संकट होता है। मनोवैज्ञानिक प्राथमिक चिकित्सा, सुरक्षित स्थान बनाना और सामुदायिक समर्थन भावनात्मक सुधार और लचीलापन के लिए महत्वपूर्ण हैं। पुनर्निर्माण प्रयासों के दौरान मानसिक कल्याण को प्राथमिकता देना आवश्यक है।