lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > स्ट्रेस, चिडचिड, संताप आणि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय ?

स्ट्रेस, चिडचिड, संताप आणि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय ?

शरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 12:26 PM2021-05-11T12:26:23+5:302021-05-11T15:49:06+5:30

शरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. 

woman mental health in corona, stress & workload, problems and solutions | स्ट्रेस, चिडचिड, संताप आणि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय ?

स्ट्रेस, चिडचिड, संताप आणि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय ?

Highlights. तुम्ही एकट्या तर नाहीतच आणि हे प्रश्न देखील अनंत काळ सुटणारच नाहीत, असं देखील नाही. एकट्याच ताण घेऊ नका, कुठल्यातरी कोपऱ्यात रडत बसू नका, एकटं वाटून घेऊ नका...मन मोकळं करायला शिका.  मदत मागायला शिका..  

प्राची पाठक

कोरोना हा काय प्रकार आहे, तो खरा की खोटा, वगैरे सर्व उलटसुलट बातम्या, माहिती येऊन आता वर्ष पार पडलं आहे. आपल्याकडे भारतात काय परिस्थिती आहे, जगात काय सुरु आहे, ह्याबद्दल बरीच जाणीव आता आपल्याला झालेली आहे. कोरोना हे प्रकरण खरं की खोटं ह्याच्या चर्चा पुष्कळ होऊ शकतात. कोरोनाबद्दल येणारी आणि रोज बदलणारी भारंभार माहिती खरीखोटी मानत ती फॉरवर्ड करत राहणं तर आणखीन वेगळंच प्रकरण. परंतु, त्यामुळे आपल्या आजूबाजूला अचानक दगावणाऱ्या लोकांचं सत्य बदलू शकत नाही, हे आपल्याला एव्हाना कळलं आहे. आपली प्रतिकार शक्ती वाढवा, अमुक घरगुती उपाय करा, काढे प्या, वाफ घ्या, स्वच्छता पाळा, मास्क घाला वगैरे अनेक गोष्टी आपण केल्या, करत आहोत. त्या करून किंवा न करून आजूबाजूला कोरोना साथ पसरल्याचं देखील आपण पाहतोय. आपल्या आजूबाजूला आणि आपल्या घरात देखील कोरोना होऊन बरे झालेले उदाहरणं आपण पाहिले. त्यावर चर्चा केली. त्याचबरोबर ज्यांची कल्पना देखील केली नव्हते असे अनेक लोक ओळखीपाळखीत किंवा घरातच दगावलेले आपण पाहिले.

तुम्हाला कोरोना झाला असो की नसो, तुम्ही लस घेतलेली असो किंवा नसो, काही गोष्टी आता आपल्याला आणखीन काही काळ तरी पाळाव्या लागतील. त्यांना आपण कोरोनाशी सुसंगत अशी जीवनशैली आत्मसात करणं आणि ती स्वीकारणं म्हणू. ह्यात केवळ आपल्या शरीराच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी नसतील. तर, आपल्या मनाच्या आरोग्याचं भान देखील आपल्याला ठेवावं लागणार आहे. कारण, जगभर सुरु असलेली ही महामारी कधी संपणार, ह्याबद्दल कोणीच काही खात्रीने सांगू शकत नाही. सर्वत्र अनिश्चितता पसरलेली आहे. आर्थिक घडी विस्कटतांना दिसते आहे. उद्या काय होईल आणि आपलं भविष्य कसं असेल असे प्रश्न आजूबाजूचे कुटुंबच्या कुटुंब बाधित होतांना आपल्याला पडणं अगदी स्वाभाविकच आहे. चिंता करू नका, सकारात्मक राहा, काळजी घ्या हे सगळे शब्द अशा वेळी पोकळ वाटायला लागतात, इतकं काही वेदनादायक आजूबाजूला आणि आपल्याच मनात सुरु आहे. शरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. वेगवेगळी साधनं वापरून, टेस्ट्स करून ती समजून घेता येतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, हे आपण ह्या लेखमालेतून समजून घेऊ या.  

कोरोनाच्या या संपूर्ण काळात आरोग्य सुविधांवर, यंत्रणेवर पडलेला ताण चर्चिला गेला. त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. पण घरोघरच्या स्त्रियांवर पडणारा प्रचंड ताण मात्र तितक्या प्रकर्षाने समजून घेतला जातोच असं नाही. साधं प्रतिकार शक्ती वाढवा, अमुक काढे प्या आणि तमुक वाफ घ्या, अमक्याच पद्धतीने ढमका स्वयंपाक करा याचं फॉरवर्ड उडतउडत आलं, ते करायचं म्हंटलं, चांगलं पौष्टिक खायचं म्हणलं तर ते करायचं कोणी? घरातल्या बाईनेच ते सर्व करायचं असतं, असं अनेक ठिकाणी गृहीत धरलेलं असतं. एरवी तरी स्त्रीला इतर घरगुती मदतनीसांची सोय असायची. याकाळात अधूनमधून ती सोय देखील मिळेनाशी होतांना आपण अनुभवत आहोत. त्यामुळे, नवीन निघालेली कोणतीही आहार विषयक टूम खासखरून घरोघरच्या स्त्रियांच्या जोरावरच सुरु असते, असं दिसतं. त्यात आधीचे असलेले नातेसंबंधातले बरेवाईट पैलू आणि सतत सोबत राहून, जास्त काम एकावरच पडल्याने निर्माण झालेले नवीन प्रश्न, असं सगळं? ताणाचं, थकव्याचं वातावरण तयार झालं आहे. स्वतःची तब्येत, आपले आधीच असलेले मनोशारीर प्रश्न ह्यांना सोबत घेऊनच घरातले लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या नोकरी-व्यवसायातले आव्हानं, अशा अनेक पातळींवर घरोघरच्या स्त्रिया लढत आहेत. त्यात नात्यात, शेजारीपाजारी कोणी? बाधित झालं तर त्यांना काय हवं नको ते ही पाहत आहेत. त्यांच्यासाठी केवळ टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केल्याने काहीच होणार नसतं, हे ही त्यांना माहित आहे. आपलं काम आणि ताण हलका होण्यासाठी काही सपोर्ट मिळतोय का, हा खरा प्रश्न उरतो. आपलं आपण स्वतः  म्हणून असलेलं बरंवाईट पॅकेज, आपल्या स्वतःकडून आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षा-स्वप्नं एकीकडे आणि उद्या काय होईल, कधी संपेल हे सगळं, ही अनिश्चितता दुसरीकडे. त्यात आपलं काही बरंवाईट झालं तर काय, हा तर मन पोखरून टाकणारा प्रश्न असतो. कसं हाताळायचं हे सगळं? आपलं डोकं शांत ठेवत ह्या समस्यांना सामोरं कसं जायचं? आपलं आरोग्य त्यात कसं जपायचं, हे कळीचे प्रश्न आहेत. 

कसा ओळखायचा आपल्या मनावरचा ताण? 

- उद्या काय होईल, ह्या विचारांमध्ये तुम्ही खूपच रेंगाळत असाल, तर सावध व्हा. आपल्याला आधी किमान आपला वर्तमान नीट पार पाडायचा आहे, ह्याचं भान ठेवता येतंय का, ते बघा.
- सतत मूड बदलणं, चिडचिड होणं, काहीच करावंसं न वाटणं 
- झोपून तर झोपूनच राहावंसं वाटणं किंवा झोपच न येणं
- माझ्याचबाबत का असं घडतंय, असं वाटून आयुष्यच नकोसं होणं
- पुढे काय होईल, आपल्या घरातल्या लोकांचं, पोराबाळांचं काय होईल की काळजी.. त्या काळजीमुळे झोप उडणं 
- माझ्यामुळेच इतरांना किंवा इतरांमुळेच मला कोरोना झाला, असं घडलं म्हणूनच तसं घडलं हे मनातले विचार थांबतच नसतील तर
- रोजच्या दिनचर्येच्या चक्रात झालेला आमूलाग्र बदल
- भूक उडणं किंवा खात तर खात सुटणं
- कमालीचा थकवा, कशातच लक्ष न लागणं, कोणतेच निर्णय घ्यावेसे न वाटणं 
- स्वतःविषयी, आपल्या आजूबाजूच्या जगाविषयी कमालीचे नकारात्मक विचार.

असं  काही होतंय का?

असं काही दिवस दिवस वाटत असेल, त्याला दोन आठवड्यांच्या वर काळ उलटून गेला असेल, तर तातडीने मनाच्या आरोग्याबद्दल मदत घेतली पाहिजे. कोरोना होऊन गेल्यावर मनात येणारे प्रश्न, भीती, थकवा आणि कोरोना झालेला नसतांना तो होईल, तर कसं होईल ह्या दोन्ही गटांमध्ये वेगवेगळे मानसिक ताण आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. एकाच घरात ह्या दोन्ही गटातले लोक असू शकतात. आजूबाजूला किंवा घरातच त्यामुळे मरण पावलेले लोकही असू शकतात. सध्या क्वारंटाईन असतांना आजूबाजूच्या लोकांनी मदत करणं किंवा कोणी आपल्याला टाळणं, असे अनुभव देखील आलेले असूच शकतात. 
या सर्वांचा आणि आपल्या आधीच्या अशा काही मूलभूत प्रश्नांचा प्रचंड ताण आपल्यावर आला असेल, तर तातडीने मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पावलं उचलायला हवीत. तुम्ही एकट्या तर नाहीतच आणि हे प्रश्न देखील अनंत काळ सुटणारच नाहीत, असं देखील नाही. एकट्याच ताण घेऊ नका, कुठल्यातरी कोपऱ्यात रडत बसू नका, एकटं वाटून घेऊ नका...मन मोकळं करायला शिका.  मदत मागायला शिका..  

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
prachi333@hotmail.com

Web Title: woman mental health in corona, stress & workload, problems and solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.