संगीता लोंढे, समुपदेशक
एकेकटं वाटसं, कसंतरीच होतं.. ही समस्या महिलांमध्ये काही नवीन नाही. सतत डोकं दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, हे आजार छळतात.(Emotional health in women) त्याच त्या तक्रारी ऐकून घरचे म्हणतात की, तुझंच कसं काय रोज काही ना काही दुखतं? आणि हे दुखतं म्हणून कुणी झोपून राहतं, आराम करतं का तर नाही.(Causes of irritability in women) बरं असो नसो काम काही चुकत नाहीच आणि आपण सगळं रेटतो तरी कुणाला काही कदर नाही, या भावनेनं त्रास वाढतो तो कुणाला सांगितला की लगेच उत्तरं येतात, तू फार स्ट्रेस घेते...तू फार ओव्हरथिंक करते, चाळिशीत असं होतंच. मुलं मोठी झाली, आता स्वत:ला गुंतून घ्यायला हवं कशात तरी!(Hormonal imbalance and mood)
सल्ले तर अनेक मिळतात; पण उपाय चटकन सापडत नाही.मन हळवं होतं, शरीर कुरकूर करतं आणि मग कुणीतरी म्हणतंच की सारखं काय कुढायचं, याला अटेंशन सिकिंगचा आजार म्हणतात. खरंच अटेंशन मिळावं, मला भाव द्या, माझ्या कामाची कदर करा म्हणून कळत नकळत असं सतत काहीतरी दुखत असल्याची गाऱ्हाणी बायका करतात का?
एकीकडे सर्वत्र सतत सल्ले दिले जातात. ऑनलाइन तर सल्ल्यांना पूर आलेला दिसतो. तमाक पॉडकास्ट सांगत असतात असं जगा, तसं जगा. हेच चुकतं तेच चुकतं. प्रेरणादायी भाषणंही लहान बदल आयुष्य बदलून टाकण्याचे दावे करतात. आणि त्यातूनही असा समज होतो की जे इतरांना इतकं सोपं वाटतं, सहज जमतं ते आपल्याला का जमत नाही?कुणाशी बोलायला गेलं की मिळतात ते फक्त सल्लेच! आणि आपण किती बावळट आहोत असं वाटून न्यूनगंडच वाढतो. सगळीकडून कोंडी झाल्यासारखं वाटतं. बाहेर पडायचा मार्ग शोधला तरी सापडत नाही. जेवण आणि झोप, काही झडझडून काम करण्याची ऊर्जा, नवीन गोष्टी शिकण्याची ऊर्मी हे सगळं कमी होत जातं. आपण चारचौघात जायला बिचकतो, हे लक्षात येतं; पण कुणी नावं ठेवण्यापेक्षा कुठं न गेलेलं परवडलं, असं अनेकींना वाटतं!
कोंडलेलं एकाकीपण कशानं येतं?
१. कुणीतरी सहज मारलेला टोमणा, केलेली कमेंट जिव्हारी लागलेली असते.
२. वयानुरूप आपल्या मनाचं एक प्रकारचं कंडिशनिंग व्हायला लागतं, आपणही स्वत:कडे आणि जगाकडे एका विशिष्ट नजरेनंच पाहतो.
३. आपल्या मतांची झापडं आपल्याही डोळ्यांवर लागलेली असते, त्यापलीकडचं काही आपल्याला आवडेनासं होतं.
४. कुणाशी मनातलं बोललं आणि त्यानं/तिनं ते गावभर केलं तर काय, अशा भीतीने मनातलं कुणाशी बोलणंच हळूहळू कमी होतं. आणि सोशल मीडियात स्टेटसला गोड गोड आनंदी फोटो लावावे तसं फक्त ‘चांगलंच’ किंवा ‘शोपीस’ सारखंच जगाला दाखवणं सुरू होतं.
५. इतरांशी आणि स्वत:शीही कमी झालेला संवाद एकटेपणा वाढवतो आणि आत्मविश्वास कमी कमीच होत जातो.
६. त्यात घरच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक ताण वाढलेले असतील तर मानसिक कुचंबणा अधिक त्रासदायक ठरते.
काय करता येईल?
१. इतरांशी बोलण्यापूर्वी स्वत:शी बोला. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय करायचं आहे, काय आवडतं नाही, काय करणं शक्य आहे असा संवाद स्वत:शी वाढवायला हवा.
२. आपल्या जवळच्या माणसांशी बोलणं, कुणाशीतरी मनातलं बोलणं, विश्वास ठेवणं फार आवश्यक.
३. आपल्यावर प्रेम करणारी माणसं जगात आहेत, आपणही कुणावर तरी मनापासून प्रेम करताे ही भावना जगणं आनंददायी करते, जगण्याला एक ध्येयही देते.
४. छान आवडेल ते खाणं, वेळेवर जेवण, झोप, व्यायाम हे विषय कितीही गुळगुळीत वाटत असले तरी ते सगळं लायनीवर आणणं फार आवश्यक आहे.
५. सतत इतरांचं काय चाललं आहे. त्यांचं कसं छान, ते कसा भास मारतात, ते कसे शो ऑफ करतात, त्यांचा पैसा, त्यांच्या चुका हे सारं आपण फार बारकाईने पाहतो. आपण स्वत:कडेही बघायला शिकू की आपल्या आयुष्यात आनंददायी काय काय घडतं आहे, ते किती मोलाचं आहे.
६. इतरांवर फुल्या मारणे, नाते तोडणे, अपमानास्पद बोलणे म्हणजे आपण जशास तसे वागतो असे नव्हे. जी नाती काचतात त्यापासून लांब जाणं चूक नाही; पण प्रत्येक नातं तोडण्यापूर्वी विचार करणं आवश्यक. नंतर पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही.
..तर काय होईल?
आता अनेकजण विचारतात की, हे सारं करणं इतकं काही अवघड नसतं; पण केलंच आणि नाहीच फायदा झाला तर? आपल्या मनाचे दुखरे कोपरे नाहीच बरे झाले तर?
त्याचं उत्तर एकच, आपल्या मनाचे दुखरे कोपरे बरे करणं दुसऱ्या कुणाच्याच नाही तर आपल्याच हातात असतं. आपण इतरांना दोष देऊच शकतो, त्यांच्या चुका असतातही; पण इतरांच्या चुका आणि वागणं आपण काही केलं तरी बदलू शकत नाही. आपण बदलू शकतो ती केवळ आपली प्रतिक्रिया आणि आपली कृती.
ती बदलण्यासाठी मात्र खरंच आपण स्वत:साठी वेळ काढावा लागतो. इतरांवरचा फोकस कमी करून स्वत:वर फोकस करावं लागतं.
आपलं काम, आपला वेळ, खाणंपिणं, आरोग्य, पैसाअडका हे सारं आपण कसं करतो, ते महत्त्वाचं!
याचा अर्थ आपण स्वार्थी, स्वकेंद्री आयुष्य जगायचं का?
स्वत:ची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नव्हे उलट आपण आपली काळजी घेता घेता इतरांच्याही त्याच गोष्टींची आपूसक काळजी घेतो. मानवीय मूल्यांचा सन्मान करत इतरांचा सन्मान अधिक चांगला करू शकतो. प्रेम, आदर, सन्मान, सहानुभूती या साऱ्या गोष्टी आपलं स्वत:बरोबरच इतरांशी नातं सुधारलं की जगणं अधिक अर्थपूर्ण करतात!