Join us

आज तुम्ही कोणतं स्वप्न पाहिलं? हरवलं ते स्वप्न जगण्याच्या गलक्यात, तर कसं शोधाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 15:02 IST

प्रभात पुष्प ३ : आपण जे स्वप्न पाहतो, त्यात रमलो तर जगावर न चिडता, माफही करता येतात बऱ्याच गोष्टी, बऱ्याच जणांना..

ठळक मुद्देजॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर म्हणतो तसं, रडत बसण्यापेक्षा मी काम करणं पसंत केलं.

अश्विनी बर्वे

स्वप्नांना चिमटीत पकडता येत नाही हेच खरं आहे. तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट स्वप्नांवर कुठे आले. पण तुम्हीच सांगा मला,आपण नेहमी स्वप्नं बघत नसतो का? जरा रोजचा दिवस आठवून बघा. कधी कधी एकदम भारीतले चहाचे कप आपल्याला हवे असतात,तर कधी उठल्याउठल्या आपल्या हातात आयता चहा मिळावा असं साधं स्वप्न सुद्धा आपण बघत असतो. क्षणोक्षणी स्वप्नं आपल्या समोर येतात आणि आपण त्यांच्या मागे गेलो की पळत सुटतात. ती एका जागी मुळीच थांबत नाहीत, कारण त्यांना भारंभार पाय फुटलेले असतात. त्यांच्या जवळ जाण्यासाठी आपल्याजवळ मेहनतीचा पक्का दोरा असावा लागतो. तरच ती आपल्याजवळ थांबतात. अशी ही स्वप्नं वास्तवाच्या दगडावर चांगली घासून घेतली की त्यांना जी चकाकी येते ती मात्र आश्चर्यकारक असते. पण पूर्ण झालेल्या स्वप्नांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मात्र आपलंच आपल्याला हसू येतं. ते असतं आपण एवढी मेहनत करू शकतो या विश्वासाचं.

(Image : Google)

आज आपण कोणतं स्वप्नं बघतो आहोत? याला फारसं महत्व नाही. ते बघत आहोत की नाही याला फार फार महत्व आहे. कारण त्यातूनच तर मिळते जगण्याची नवीन उर्जा. स्वप्नांची आपली अशी धावपळ सुरु झाली की जीवनात एक सूर सापडतो,जीवनाला एक वेगळाच नाद मिळतो. मग आपणच आपल्यात रमत जातो, स्वतःवर खुश असणारी व्यक्ती जगाकडे पण आनंदाने बघायला शिकते. चुका पोटात घ्यायला शिकतो. क्षमेची नजर आली की फारशी चिडचिड होत नाही. आजच्या विचित्र अशा काळात आपली चिडचिड खूप होते हे मला मान्यच आहे. एका जागी, एका ठिकाणी किती काळ आपण थांबायचं, हे कोणालाच माहीत नाही. पण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर म्हणतो तसं, रडत बसण्यापेक्षा मी काम करणं पसंत केलं.

(Image : Google)

स्वस्थ बसणं ही खूप अवघड गोष्ट कोरोना काळात आपण साध्य केली आहे. बघा तुमचा स्वतःचा ध्यान करतांनाचा अनुभव असेल, पाच मिनिटं सुद्धा आपण डोळे मिटून स्थिर बसू शकत नाही. सतत विचारांची मालिका आपल्या डोक्यात चालू असते. हे मनाने स्थिर होण्याचं स्वप्नं आपण बघितलं तर? हं त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार,पण करून तर बघूया. पाच मिनिटं बसल्यानंतर दोन मिनिटं तरी आपल्या हाती स्थिर मनाची पडतील. काय म्हणता? तुम्ही करून बघितलं आहे. छानच. आत्ता तुमच्याशी बोलता बोलता मी हेच स्वप्नं बघत होते.आणि तेच मला आता स्थिर होण्यासाठी ओढून नेत आहे.चला तर मग....

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइल