Join us

आई म्हणाली लेकीला झालाय ‘नो मो’ आजार! डोकंदुखीनं तरुण मुलांना हैराण करणारा नवाच त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 18:41 IST

Mobile Addiction: ‘नो मो’ म्हणजे ‘नो मोबाईल’ आणि ‘फोबिया’ म्हणजे भीती. अर्थातच जोडून झालं “मोबाईल सोबत नसण्याची भीती”

ठळक मुद्देमनोदोषचिकित्सेत नोमोफोबिया हा इतर सगळ्या भीतीजन्य आजारातच समाविष्ट असला तरी जवळपास प्रत्येक दुसरा माणूस यानं बाधित आहे हे वास्तव बघता हे प्रकरण वाढत जाणारं असं दिसतंय!

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आताच एक मायलेकीची जोडी ओपीडीमध्ये आली होती. त्यांच्यापैकी लेकीच्या काही तक्रारी होत्या. डोकंदुखी, मानदुखी यासोबतच तिला थोडं अस्वस्थही वाटत होतं..सिस्टरनं पॅरामीटर्स तपासले, तिचं बीपी थोडंच वर असलं तरी हृदयाचे ठोके शंभरच्या वर होते आणि श्वसनगतीही अंमळ जास्त होती..“काही औषधं सुरूयेत का?” असं विचारलं तेव्हा समोरून नकार आला..“मोबाईल हरवलाय काल तिचा” तिच्या आईनं हसत माहिती दिली..जुजबी समुपदेशन करून लक्षणजन्य औषधं देत त्यांना रवाना केलं..

 

मुलीच्या आईनं गमतीनं माहिती पुरवली असली तरी शेवटी ती आई; तिनं मुलीचा आजार बरोबर  हेरला होता आणि इकडे मलाही चटकन क्लिक झालं इट वॉज ‘नोमोफोबिया’‘नो मो’ म्हणजे ‘नो मोबाईल’ आणि ‘फोबिया’ म्हणजे भीती. अर्थातच जोडून झालं “मोबाईल सोबत नसण्याची भीती” या अस्वस्थतेचा परिपाक शारिरिक स्तरावर रक्तदाब, हृदयगती आणि श्वसनगती वाढणे आणि मानसिक स्तरावर अस्वस्थपणा, नैराश्य आणि एकाकीपणा असा होतो.. तुम्ही सातत्याने फोन चेक करत असाल, क्षणभर फोन दिसला नाही की चिंतित होत असाल, काही सेकंदात फोन सापडला नाही तर अस्वस्थ होत असाल, फोनसाठी दैनंदिन कामे बाजूला ठेवत असाल तर तुम्हीही आणि तसे थोड्याफार फरकाने आपण सगळेच नोमोफोबियाच्या उंबरठ्यावर आहोत..

 

यावर लक्षणजन्य उपचारासोबत काही मानसोपचारही आहेत. जसं की फोनचा वापर हळूहळू कमी करत जाणे, वाचन करणे, संगीत ऐकणे वगैरे.. सोपा उपाय म्हणजे ‘फोन फ्री टाईम’. जसं जेवणाच्या वेळी, उठल्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत किंवा झोपण्यापूर्वी एक तास अशा वेळांना फोन हातात घेणं टाळावं. तसंच घरातला काही भाग ‘फोन फ्री झोन’ करावा. म्हणजेच किचन, डायनिंग एरिया, गार्डन अशा ठिकाणी फोन घेऊन जाणे टाळावे. तुर्तास मनोदोषचिकित्सेत नोमोफोबिया हा इतर सगळ्या भीतीजन्य आजारातच समाविष्ट असला तरी जवळपास प्रत्येक दुसरा माणूस यानं बाधित आहे हे वास्तव बघता हे प्रकरण वाढत जाणारं असं दिसतंय!

 

टॅग्स :मानसिक आरोग्यमोबाइल