-अनन्या भारद्वाज व्हर्च्युअल सेक्शुअल हॅरॅसमेण्ट आणि मेण्टल हेल्थ अर्थात मानसिक आरोग्याचा काही संबंध असतो का? कोरोनाकाळानंतर हा प्रश्न मानसिक आरोग्याच्या जगात जास्त चर्चेत आलेला आहे आणि प्रत्यक्षात लैंगिक छळ न होताही व्हर्च्युअल सेक्शुअल हॅरॅसमेण्ट होणं आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यच हरवून बसणं हा सध्याच्या ऑनलाइन/सोशल मीडीया जगात महिलांचा मोठा प्रश्न आहे. त्यासंदर्भात अजून गुन्हे दाखलही होत नाहीत कारण महिला तक्रार करत नाहीत आणि अनेकदा तर तक्रार करुन काही सिध्द करता येईल इतपतही या छळाची व्याप्ती नसते मात्र त्यातून अनेकजणी नैराश्यात ढकलल्या जातात. सेल्फ एस्टिमसह आत्मविश्वासही हरवून बसतात. अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही मात्र बराच काळ सोशल मीडीयात ॲक्टिव्ह असलेली एखादी तरुणी एकदम गप्प होते. किंवा मधूनच भांडायला उठते, आपण ट्रोल होतोय असा कांगावा करत इतरांना ट्रोल करत सुटते. मुळात कळतच नाही हे सगळं कशामुळे होतं आहे, त्यातून मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो आहे आणि त्यावर उपचार घेण्याची गरज आहे की नाही. वय वर्षे १५ ते २५ या वयोगटातील तरुणी आणि पुढे चाळीशीपर्यंतच्या महिला या टप्प्यातून अनेकदा जातात. त्यांच्या कामावर, अटेंन्शन स्पॅनवर आणि लक्ष एकवटून काही उत्तम काम करण्याच्या क्षमतांवरही त्याचा परिणाम झालेला असतो. अभ्यासक सांगतात की, अनेकजणी कुठंतरी खोल आधी व्हर्च्युअल सेक्शुअल बळी पडलेल्या असतात किंवा त्यातून त्यांच्या स्व प्रतिमेला तरी तडा गेलेला असतो.
मानसशास्त्र तज्ज्ञ नेहा गायधनी यासंदर्भात सांगतात की, तरुण मुली यासाऱ्याला लवकर बळी पडतात. म्हणजे होतं काय तर, त्यांच्याच वयाचा कुणी त्यांना पटकन म्हणतो, यार तू एकदम बहनजी टाइप्स दिसते, यू आर नॉट हॉट कॅटेगरी. वरवर पाहिलं तर हा काही छळ नाही. पण त्या मुलीसाठी ही सेक्शुअल कमेण्ट आहे. त्यातून जर ती फारच भावूक असेल तर ती आपण हॉट कसे दिसू यासाठी प्रयत्न करू लागले. काही मुलींचे तर बॉयफ्रेण्डच त्यांना या वयात हॉट दिसणाऱ्या, सेक्सी लूक असलेल्या, फारच उफाड्याची शरीरमापं असलेल्या मुलींचे फोटो पाठवतात. सुरुवातीला हे सारं म्हणजे काही छळ आहे असं या मुलींना वाटत नाही. मात्र हळूहळू त्यांना तसे फोटो पाहूनही शिसारी यायला लागते आणि त्याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर थेट परिणाम होतो. काहींचा आत्मविश्वास हरवून बसतो तर काहीजणी अतीशय टोकाच्या नैराश्यात जातात. काहीजणी तर कपडे आणि मेकअपचं सामान यासाठी घरातून चोऱ्याही करायला लागतात.
याचसंदर्भात मानसतज्ज्ञ डॉ. मयुरा गांधी सांगतात, ‘ काही मुलींच्या फोटोंना हमखास ऑनलाइन सुंदर, हॉट, ब्युटीफुल अशा कमेणट्स येतात. त्याची त्यांना इतकी सवय होते की, त्या लाइक्सच्या चक्रात अडकत त्या स्वत:त इतके बाह्य बदल करतात की आपण मूळ कशा आहोत, आपल्या आवडीनिवडी नेमक्या काय याचाही विसर पडावा इतक्या त्या स्वत:पासून लांब जातात. पुढे भविष्यात मात्र त्यांचा स्वत:शीच असलेला संपर्क तुटतो आणि नैराश्याच्या दरीत त्या ढकलल्या जातात. मी तरुण मुलींना वारंवार सांगते की, बी युवरसेल्फ, दुसऱ्यासाठी स्वत:ला बदलू नका.’