Join us  

सोशल मीडियात मित्रमैत्रिणी हजार, पण मनातलं बोलावं असं कुणीच नाही आयुष्यात? -असं का होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 4:50 PM

New year resolution : आपण मनातलं सारं शेअर करावं आणि विश्वास ठेवावा असा एकही जीवाभावाचा मित्र किंवा मैत्रिण आपल्याला का असू नये?

ठळक मुद्देजीव कासाविस होतो पण जीवाभावाचं बोलायला कुणीच नाही अशी भावना का मूळ धरते?

तुम्हाला फेसबूकवर नाही, खऱ्याखऱ्या आयुष्यात किती सच्चे मित्रमैत्रिणी आहेत? याप्रश्नाचं उत्तर अनेकजण भरपूर असं उत्तर देतील. व्हॉॅट्स ॲप ग्रुपमध्ये तर लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. ऑफिसमध्येही अनेकांशी चांगली मैत्री होते. सतत भेटणं, एकत्र जेवण, पार्टी, पिकनिक असं सगळं आपण करतोच. पण मग तरी अनेकदा एकेकटं का वाटतं? बोलायलाच कुणी नाही अशी भावना मनात घर का करते? जीव कासाविस होतो पण जीवाभावाचं बोलायला कुणीच नाही अशी भावना का मूळ धरते?

सतत कनेक्टेड असूनही कायमचा डिसकनेक्ट आहे असंही वाटतं. आपल्या मनात छळणारं, डाचणारं बोलावं कुणाशी विश्वासानं असं कुणीच कसं नाही अवतीभोवती? आणि बोललं समजा मनातलं तर आपली गुपिते सुरक्षित राहतील की ते गावभर करतील, आपल्याविषयी सोशल मीडियात काही लिहितील, लोकांना सांगत टिंगल करतील की आपल्याला ब्लॅकमेल करतील? आपण त्यांच्यासमोर एकदम गरीब बिचारेच होऊन जाऊ का?असं सगळं आपल्या मनात का येतं? आणि त्यामुळे आपल्याशीही कुणी मनातलं बोलत नाही याचा आपल्याला विसर पडतो का?आज मैत्रीत केलेले शेअरिंग उद्या मैत्री तुटली तर सेफ राहील का ही भीती असते ना मनात?

(Image :google)

असं का व्हावं?कुणाला सांगताच येणार नाहीत, अशी खरोखर कोणतीच दुःखे असतात? हळूहळू मनातले बोलायची सवय करायला लागते त्यासाठी. इतरांवर विश्वास ठेवावा लागतो. असं काय आहे आपलं सिक्रेट की ते इतरांना कळलं तर आपल्याला खाली पहावं लागेल? आपण जितके मनातले बोलायची/मांडायची सवय करू, तितके एकटेपण दूर जाईल. मैत्र जोडले जाईल. त्यासाठी एकदम पन्नास फ्रेंड्स असायची देखील गरज नाही खरेतर. आपले हळवे कप्पे समजून घेणारा एखादाच कोपरा पुरेसा असतो.

एक नियम आपणही पाळू. कुणी विश्वासाने आपल्याकडे त्याचे मन मोकळे केले, तर तो विश्वास ते नाते बरे राहो की वाईट, आपण जपू. म्हणजे, आपलीही कुणाकडे बोलणे सुरक्षित राहील, ही भीती कमी होत जाईल.

मित्रमैत्रिणी जीवाभावाचे असावे तसे मैत्र आपणही आपल्या बाजूने जपायला शिकले पाहिजे.

टॅग्स :सोशल मीडियामानसिक आरोग्य