Join us
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या ‘घरपणा’साठी झटणाऱ्या गृहलक्ष्मीचा हक्काचा एकांत! एक दुपार... तिची स्वतःची!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 24, 2026 16:40 IST

गृहिणी आणि दुपार यांचं घनिष्ट नातं आहे, ही वेळ तिला कोणकोणते सुखद क्षण देते, ते या लेखातून वाचा. 

- ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी 

कोणाला सकाळ प्रसन्न वाटते, कोणाला धुंद करणारी सायंकाळ; कोणाला मिट्ट काळोखात बंदिस्त झालेली रात्र आवडते तर कोणाला झुंजूमंजू करणारी पहाट! मात्र गृहिणींना आवडते ती टळटळीत दुपार. बाहेर उन्हाचे तडाखे बसत असले तरी घरात एकांताचा गारवा त्यांना सुखावतो. कारण, त्या क्षणांवर त्यांचे स्वामित्त्व असते. एरव्ही घरात किलबिल आवश्यक असली, तरी दुपारची शांतता त्यांना हवीहवीशी वाटते.

सकाळी उठल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखी घरभर भिरभिरणारी ती, मुलांना शाळेत सोडून आल्यावर घरी येऊन विसावते. आपणच केलेला स्वयंपाक परत गरम करून वाढून घेण्याचेही तिच्यात त्राण नसतात. एकदाचे जेवण उरकून, पडदे टाकून, दुपारच्या वामकुक्षीसाठी ती सज्ज होते. अंथरुणाला पाठ टेकताच थकव्याने क्षणार्धात झोपी जाते. सेल्समन, पोस्टमन, फेरीवाले तिचे हितशत्रू असतात, पण सुदैवाने ते नाही आले तर खरीखुरी पॉवर नॅप मिळते. एखादी डुलकी झाली की गाणी ऐकत ऐकत चहाचे आधण ठेवले जाते. किसून टाकलेलं आलं, साय बाजूला सरकवून किंचित जास्त दूध घातलेला चहा घेतला की तिची बॅटरी फुल होते. संध्याकाळच्या नाश्त्याचे, रात्रीच्या जेवणाचे, उद्याच्या डब्याचे मनोमन बेत आखले जातात. बाजारसामानाची यादी केली जाते.

चारच्या सुमारास गहू, तांदूळ, भाज्या निवड, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घाल, फुलझाडांना पाणी घाल, भांड्यांचा पसारा आवर अशी हुडकून काढलेली कामं झाली की ती केरसुणीचा हात फिरवून घेते. बाळाला न्हाऊ माखू घालून तीट लावल्यावर ते जितके गोंडस दिसते, तसेच आवराआवर झाली की घरालाही बाळसे धरते. कारण घराच्या कानाकोपऱ्यावरून गृहलक्ष्मीचा वात्सल्यपूर्ण हात फिरलेला असतो. सगळं काही जागच्या जागी पाहून ती आपल्या गृहकृतदक्षपणाला दाद देते, तेव्हा चकाकणारी फरशीसुद्धा दर्पण होऊ पाहते. उन्हाचे कवडसे घरातून हळू हळू काढता पाय घेतात. त्या सोनेरी रंगात घर आणखीनच खुलून दिसते. ती समाधानने वास्तुकडे पाहते, तर वास्तूही तिच्याकडे प्रसन्नतेने पाहते. 

जीवापाड जपलेलं एक घर सोडून आलेली ती, दुसऱ्या घराची झालेली असते. आपल्या मनमिळावू स्वभावाने ती घराच्या आणि घरच्यांच्या मनात घर करते. त्या वास्तूमध्ये वीस-पंचवीस-तीस वर्षं सहज लोटून जातात. घराशी तिचे ऋणानुबंध घट्ट जुळतात.  पुढे मागे घर बदलण्याची वेळ आली की सगळ्यात जास्त ती हळवी होते. 'वास्तुदेवता सुखी भव' म्हणत जुन्या वास्तूला निरोप देत नव्या वास्तूलाही आपलेसे करते. तिथेही दुपार तिची एकटीची असते कारण, त्या एकांताच्या क्षणांवर फक्त तिचेच स्वामित्त्व असते...

English
हिंदी सारांश
Web Title : A Homemaker's Solitude: An Afternoon of Her Own!

Web Summary : A homemaker finds solace in the quiet afternoon. It's her time to recharge, plan, and care for her home, creating a space filled with love and warmth before evening arrives. This solitary time is precious.
टॅग्स :महिलासुंदर गृहनियोजन